आर. टी. ई.(RTE) 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शुक्रवार पासून सुरु करण्यात येत आहे

26

🔸योग्य मुदतीत प्रवेश करून घेण्याचे आव्हान – प्राथमिक चे शिक्षण संचालक द. गो. जगताप

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.9जून):- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया शुक्रवार (दि. 11) पासून संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत दि. 7 एप्रिल 2021 रोजी काढली आहे. ज्या विद्यार्थ्यांची आरटीईअंतर्गत निवड यादीत सोडत लागली आहे, त्या पालकांनी शाळेत जाऊन विहित मुदतीत प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन प्राथमिकचे शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी केले आहे. सर्व शाळांनी सन 2021-22 या वर्षाची आरटीई 25 टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दि. 11 जूनपासून सुरू करावी. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा निर्णय आपल्या स्तरावरून घेण्यात यावा व तशा सूचना प्रसिद्ध करण्यात याव्यात.

निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता 20 दिवसांचा कालावधी देण्यात यावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करू नये. शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे, त्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा दिनांक आरटीई पोर्टलवर द्यावा. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. बरेच पालक शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आरटीई प्रवेश फॉर्म भरताना चुकीचे अंतर दाखवतात. त्यामुळे रहिवासी पत्त्याचा पुरावा इ. कागदपत्रांवरून शाळा व निवासी पत्त्याच्या अंतराची पडताळणी करावी. निवड यादीतील बालकांबाबत चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देऊ नये.

अशा पालकांना तालुकास्तरीय समिती, शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यास सांगावे. पड़ताळणी समितीने त्यांच्याकडे आलेले अर्ज व तक्रारीची शहानिशा करून प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेश सुरू होण्याआधी प्रवेश द्यावा किंवा देऊ नये याबाबतचा आदेश शाळेला द्यावा. त्या आदेशाप्रमाणे शाळेने कार्यवाही करावी. शुक्रवार, दिनांक ११ जूनपासून शाळांनी पालकांना प्रवेशाकरिता पोर्टलवर दिनांक द्याव्यात. आरटीई ऑनलाइन प्रवेश सुरू झाले आहेत, अशा सूचना शाळेच्या प्रवेशद्वारावर लावाव्यात.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन या कारणांमुळे जे पालक प्रत्यक्षरीत्या शाळेत प्रवेशासाठी येऊ शकत नाहीत, अशा बालकांच्या पालकांनी विहित मुदतीत दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे, व्हॉट्सअॅपद्वारे शाळेत संपर्क करून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल. सविस्तर सूचना आरटीई पोर्टलवर दिल्या जातील, असे शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी कळविले आहे.