पुनः पुन्हा जग पाहुया !

26

(जागतिक नेत्रदान दिन)

डोळे म्हणजेच नेत्र ही सजीवांना त्यातही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. मात्र सर्वांनाच ही देणगी मिळालेली नाही. जन्मजात आंधळे असणे किंवा अपघाताने अंधत्व येणे यामुळे अशा व्यक्ती सृष्टीच्या सौंदर्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. तरीही आज विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या आधारे आपण एका व्यक्तीची दृष्टी अर्थात नेत्र दुसर्‍या एका अंध व्यक्तीला देऊन त्याचे जीवन प्रकाशित करू शकतो. नेत्रदानासाठी जगभरातील विविध सामाजिक, रुग्णालयीन संस्था पुढे येत आहेत. लोकांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच नेत्रदानाबद्दल माहिती देण्यासाठी या संस्थांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयॊजन करण्यात येते. त्यासाठी दरवर्षी संपूर्ण विश्वात १० जून रोजी ‘जागतिक नेत्रदान दिन’ साजरा केला जातो.

परमेश्वर निर्मित निसर्गात विविध आकारांची, रंगांची आणि चवींची फळे आहेत. रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकारांची फुले आहेत. उंच उंच डोंगर, खोल दरीखोरी, रुंद व विस्तीर्ण खळखळणाऱ्या अवखळ नद्या आहेत. निळागर्द, शांत व क्षितिजाला भिडलेला अथांग समुद्र आहे. हिरवीगार वनराई, विविध आकारातील व रंगातील प्राणी, पक्षी, किटक आहेत. तसेच चित्र व शिल्प, प्रिय व्यक्तींचे सुंदर सुंदर चेहरेमोहरे आदी आहेत, त्या सर्वांना भरभरून बघून हृदयात साठवून ठेवणारे इंद्रिय म्हणजेच डोळे होत. मानवाच्या शरीराची पंच इंद्रिये त्यांना नेमून दिलेली कार्ये करणारी असतील तर त्यांचा उपयोग आहे. अन्यथा शरीरास नुसती पंचेंद्रिये असून काय फायदा? ती सशक्त, सुदृढ व कार्यरत नसतील तर व्यर्थच! तसेच अगदी सुंदर रेखीव मासोळीदार काळेभोर टपोरे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत तर त्यांचा काय उपयोग? दैनंदिन जीवनात पदोपदी डोळ्यांची आवश्यकता भासते.

प्रत्येक गोष्ट बघण्याची क्रिया डोळ्यांनी होते पण तेच कमकुवत किंवा पूर्ण दृष्टीहीन असतील तर जीवनच अंधारमय! म्हणूनच आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध नेत्रविशारद डॉ.आर.ए.भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नेत्रदान दिनाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने नेत्रदानासाठी इच्छूक सर्वांनी जवळील एका नेत्रपेढीत जाऊन नावाची नोंदणी करावी. मृत्यूनंतर नेत्रदान होत असल्याने अंधाला नेत्रदान करून आपण त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणू शकतो. दृष्टीविकार प्रतिबंधक आणि अंधत्व नियंत्रण कार्यक्रम हे पूर्णपणे केंद्र पुरस्कृत कार्यक्रम आहेत. त्यांत अनेक नेत्रपेढ्या आणि फिरती नेत्रपथके यांचा समावेश आहे. त्यामुळे जनसामान्यात दृष्टी दानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी केंद्र सरकारसुद्धा प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. राज्यात नऊ लाखांपेक्षा जास्त लोक नेत्रहीन आहेत, ही आकडेवारी फारच चिंताजनक आहे. सन १९७९पासून राज्यात अंधत्व निवारण आणि दृष्टिहिनांच्या मदतीसाठी विविध नेत्रशिबीर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व येत आहेत.

कवितेत किंवा लेखात निसर्गाचे वर्णन सोप्या शब्दांत कितीही सुंदर व रसाळ वर्णन केलेले असेल वा कितीही सुंदर चित्र असेल तरी एखाद्या अंध व्यक्तीने ती गोष्ट आपल्या डोळ्यांनी जन्मताच बघितली नसेल, अनुभवली नसेल त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडतच नाही. तर मग त्या वर्णनाला, लिखाणाला काय अर्थ? ज्या व्यक्तीला दिसत होते पण अपघातात किंवा एखाद्या असाधारण आजारात दृष्टी गेली तर त्या व्यक्तीला रोजचे जीवन जगताना त्या आठवणीने आणि यातनेने जीव किती दु:खी होईल? याचा विचारच करवत नाही. पाच मिनिटे विद्युतप्रवाह खंडित झाला तर आपली काय अवस्था होते? हे आपण सर्वजण अनुभवत असतोच! आपल्या देशात आज कोट्यावधी अशी बालके, स्त्री व पुरुष आहेत की जे जन्मत:च अंध आहेत. कोणाला थोडे तर काहींना अजिबात दिसत नाही. म्हणजे ते निसर्गाच्या विलोभनीय दृष्यांपासून वंचित आहेत. त्यांचा वैयक्तिक, सामाजिक व आर्थिक विकास म्हणावा तसा झालेला नाही. का? तर त्यांना दृष्टी नाही, ते हे सुंदर जग पाहू शकत नाहीत.

ते सगळे भौतिक दृश्य गोष्टींपासून वंचित आहेत. परंतु आपली इच्छाशक्ती असेल तर आपण अशा अंध व्यक्तींना डोळस बनवू शकतो. पण त्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल.
जसे आपण जिवंतपणी रक्तदान किंवा एखाद्या आपल्या जवळच्या नातलगाला किडणी दान करतो, तसेच आपण मरणोत्तर आपले नेत्र दान करू शकतो. यासाठी अगोदर आपली लेखी परवानगी द्यावी. ती एका विहित नमुन्यातील अर्जात भरून आपल्या नजीकच्या सरकारी किंवा खाजगी अधिकृत नेत्र पेढीशी संपर्क साधून द्यावी लागते. एखादा असाध्य आजार जडला असल्यास त्या व्यक्तीस नेत्र दान करता येत नाही. नेत्रदानाविषयी लोकांमध्ये कमालीचे समज गैरसमज असल्याचे आपण पाहतो. त्यामुळे नेत्रदान, नेत्रपेढी, तिचे कार्य याविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. १ वर्षांवरील व्यक्तीचे नेत्रदान होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीने जिवंतपणी नेत्रदानाची लेखी इच्छा व्यक्त करणे गरजेचे आहे. त्यानंतर व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याचे नातेवाईक, मित्रमंडळींनी त्याच्या इच्छेचा मान राखत त्या व्यक्तीचे नेत्रदान करणे महत्त्वाचे आहे.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर ६ तासांच्या कालावधीत नेत्रदान होणे गरजेचे आहे. तेव्हा व्यक्तीच्या नातेवाईकांनी तात्काळ नेत्र पेढीत संपर्क साधून नेत्रदानाविषयी कळवले पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर लवकरात लवकर डॉक्टरांना पाचारण केल्यास त्या मृतव्यक्तीचे डोळे डॉक्टर घराच्या घरी १५ ते २० मिनिटात काढू शकतात. वरील गोष्ट करणे जमत नसेल तर १९१९ हा नंबरावर फोन करावा. हा नंबर आपण ज्या एरियात राहत असाल त्या क्षेत्राचे काम बघणाऱ्या स्वयंसेवकाचा असेल. त्याला पूर्ण पत्ता दिल्यास तो विनामुल्य आपल्या राहत्या घरी एक तासाच्या आत स्वखर्चाने डॉक्टरांना घेऊन येईल व मृत व्यक्तीच्या डोळ्यांचा कार्निया अथवा पूर्ण डोळे अर्ध्या तासाच्या आत काढून नेईल. आपल्याला कुठलाही खर्च करण्याची आवशकता नाही. या नंबरची शहानिशा आपण आधीही करून घेऊ शकतो.
आपण जागतिक नेत्रदान दिनी आपले मित्र, मैत्रिणी, शेजारी व नातलग यांना नेत्रदानाचे गांभीर्य पटवून सांगून त्यांना यात सहभागी करून घेतले पाहिजे. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला मुहूर्त बघावा लागत नाही.

म्हणून आज जागतिक नेत्रदान दिनी आपण सर्व असा निर्धार करू की आपण आपले डोळे मरणानंतर आपल्या अंध देशबांधवांसाठी दान करू. परमेश्वराने आपल्याला डोळस जन्माला घातल्याचे व समाजाचे आपल्यावरील ऋण या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन फेडता येण्यासारखे आहे. आपल्या नेत्र दानाने देशातील दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. दृष्टिहीनांना मागणीनुसार या नेत्र पेढीतून नेत्रदान करण्यात येते. विशेष म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मा वापरत असलेल्या व्यक्तीही नेत्र दानास पात्र ठरतात. नेत्रदानात संपूर्ण डोळ्याचे रोपण न करता केवळ डोळ्याच्या बाहुलीच्या पडद्याचे रोपण केले जाते.

त्यामुळे डोळ्याच्या बाहुलीच्या पडद्यात दोष असणार्‍या व्यक्तींना या शस्त्रक्रियेचा खूप लाभ होतो. त्यामुळे दृष्टिहिनांच्या जीवनाला नवी दृष्टी प्राप्त होते. आपण नेहमीच अन्नदान, रक्तदान आणि विविध प्रकारचे दान करून समाजाप्रति आपले कर्तव्य पार पाडत असतो. मात्र अवयव दानाबाबत आपण तेवढे जागरुक दिसत नाही. नेत्रदान, रक्तदान व अवयवदानाने आपण गरजूला जीवनदान देऊ शकतो. तेव्हा आजच्या नेत्रदानाच्या निमित्ताने आपण सर्वांनी नेत्रदान करण्याविषयी प्रतिज्ञा करूया.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जागतिक दृष्टी दान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.(हिंदी-मराठी साहित्यिक व इतिहास अभ्यासक.)रा. पिसेवडधा, पो. देलनवाडी.ता. आरमोरी, जि. गडचिरोली.मोबा. ७४१४९८३३३९.