ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातील एल्गार : कुळंबीण

37

साहित्य हा समाज मनाचा आरसा असून समाजात प्रतीत होणारे चित्र साहित्यात प्रतिबिंबित होत असते .म्हणून साहित्य आणि समाज हा अत्यंत महत्वाचा घटक आहे . आज या भूतलावर अनेक साहित्य निर्माण झालेलं आहे . कथा , कविता , नाटक ,कादंबरी , स्वकथन , गाथा ,अभंग , पोवाडे या मधूनच आपल्याला आपल्या समाजाचं चित्र दिसून येत आहे.म्हणून साहित्याची निर्मिती होणं अत्यंत महत्वाचे आहे . कारण आपल्या भावना जो पर्यंत आपण अधोरेखित करीत नाही तो पर्यंत आपलं दुःख इतरांना समजणार नाही , याच माध्यमातून जेव्हा आपण आपल्या दुःखाचा आणि संकटाचा व गुलामगिरीचा टाहो जगासमोर मांडतो तेव्हा हे वास्तव असणारं लेखन जगाचं हृदय हेलावून टाकते व यातूनच माणसाच्या माणूसपणाच्या साहित्य निर्मितीची प्रक्रियेला सुरुवात होते .असंच माणसं जोडणारं साहित्य समता, न्याय , स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असते या साहित्याला कोणी कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी ते दडपून न राहता नव्याने उगवत असते अंकुरत असते हीच आंबेडकरी साहित्याची विचारधारा आहे म्हणूनच जगाच्या पाठीवर आंबेडकरीचळवळीची व साहित्याची चर्चा केली जाते कारण ते माणुसमनाचं व माणुसपणाचं साहित्य आहे त्यात माणसाच्या वेदनेच्या टाहो पासून ते समता ,न्याय ,स्वातंत्र्य आणि बंधुत्वा साठीचा एल्गार असणारी धडपड अखिल माणसाच्या हितासाठी आहे . या मुळे मराठी साहित्याला आंबेडकरी साहित्याने प्रगल्भ केल्याचे आपल्याला दिसून येते.

१९५६ नंतर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून परिवर्तनवादी विचार प्रवाह , प्रवाहित झाले. त्यात कथा ,कविता , नाटक , कादंबरी ,स्वकथन ,वैचारिक लेखन मोठ्या ताकदीने उदयास आले यांचा आदर्श डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत . कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ” चंद्र ,सूर्य , तारे जर माझे भविष्य घडवीत असेल तर माझ्यामेंदू आणि मनगटाचा काय उपयोग ” हा विचार डोळ्यासमोर ठेऊन , शिका ! संघटित व्हा !! आणि संघर्ष करा !!! या महान विचाराने आंबेडकरीचळवळीला व साहित्याला बळ मिळाले.या मधूनच महाराष्ट्रात साहित्यिकांची एक पिढी उदयास आली या मध्ये म.ना.वानखडे , राजा ढाले , यशवंत मनोहर , रावसाहेब कसबे , गंगाधर पानतावणे , नामदेव ढसाळ , बाबुराव बागुल , अविनाश डोळस , दया पवार , अर्जुन डांगळे , ज.वि.पवार , प्र.ई.सोनकांबळे , शंकरराव खरात , केशव मेश्राम , अरुण कांबळे , बंधू माधव , रा.ग.जाधव , दत्ता भगत , जनार्दन वाघमारे , वामन ओहाळ , वामन निंबाळकर , नरेंद्र जाधव , भि .शी.शिंदे , प्रेमानंद गज्वी , रुस्तुम अचलखांब , योगीराज वाघमारे , योगेंद्र मेश्राम , सुखराम हिवाराळे , माधव कोंडविलकर , शांताबाई कांबळे , बेबी कांबळे , शरणकुमार लिंबाळे , लक्ष्मण माने , लक्ष्मण गायकवाड या मध्ये अनेक नावे आपल्याला घेता येतील पण या मध्ये जी नावे सुटली असेल त्यांची माफी मागतो असो या पिढीने मोठ्या ताकदीने लिखाण केल्याचे आपल्याला दिसून येते याच परंपरेतील एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे नाटककार प्रकाश त्रिभुवन आहे.

त्यांच्या थांबा राम राज्य येतंय या नाटकाच्या लेखनाने मराठी साहित्यात ते सुपरिचित आहेत . त्यांचं साहित्य हे ऐतिहासिक दस्तऐवज असून ऐतिहासिक नातं जोडणारं त्यांचं साहित्य अत्यंत महत्वाचं आहे त्यांनी अनेक एकांकिका , आणि नाटक ,कादंबरीचे लेखन केले असून एक चांगल्या प्रकारचे कलावंत व दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे . त्यांची नव्यानेच स्वरूप प्रकाशन ने कुळंबीण ही कादंबरी प्रकाशीत केलेली आहे .
मुळात नाट्यकाराचा पिंड असलेले प्रकाश त्रिभुवन आंबेडकरी चळवळ आणि साहित्य विचारधारेतील एक महत्वाचे लेखक , विचारवंत आहेत . थांबा राम राज्य येतंय १९८२ , एक होता राजा १९८३ , धन नको वन हवे १९९३ , अडीच फुटाचा राक्षस २००१ , जातक कथा १९९४ , सत्ते मेव जयते २०१५ , बाळकडू २००६ , गणनायिका आम्रपली २००५ , दिग्विजय आणि इतर एकांकिका २०१४ , नागार्जुन २०१८ , ही त्यांची ग्रंथ संपदा असून त्यांचे अनेक लेखन वृत्तपत्र मासिकातून प्रसिद्ध झालेले आहेत . त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत .असे हे प्रतिभावंत नाटककार यांनी कुळंबीण ही कादंबरी लिहुन ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातील विद्रोहाचा मर्मस्पर्ष असणारी कुळंबीण रेखाटून महिलांच्या भावनेचा उद्रेक आणि इथल्या व्यवस्थे विरुध्द चा एल्गार मांडून मराठी साहित्याला प्रकाश त्रिभुवन यांनी प्रगल्भ केले आहे .त्यांची लेखनाची भाषा सूट सुटीत असून मनाला भेदून जाते .

कुळंबीण ही कादंबरी वाचतांना सर्वप्रथम काळ ,स्थळ आणि वेळ यांचा मिलाफ वाचकांनी नजरे समोर ठेऊन वाचावीत कारण हा काळ प्रखर जातीयभेदाचा काळ आहे . माणसाला , माणसाचा विटाळ मानणाऱ्या कर्मठ लोकांचा काळ आहे . याच काळात क्रांतीबा जोतीराव फुले , सावित्री माई फुले , सत्यशोधक चळवळ चालवीत असतांनाचा हा काळ असून महात्मा फुलेंचा हा समकालीन काळ आहे .नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कामगार चळवळीचा हा काळ आहे . या काळात स्रि शिक्षणाला व अस्पृश्याना शिक्षणाची बंदी होती याच काळात व्यवस्थेने नाकारलेल्या माणसाला माणूस म्हणून जगता यावे या साठी क्रांतीबा जोतीराव फुले , सावित्रीमाई फुले यांनी जो संघर्षात्मक विद्रोह केला या काळातीलच कुळवाडी येथील एका शेतकरी कुटुंबातील परित्यक्त्या स्रि ची ही कुळंबीण जिवंत कथा प्रकाश त्रिभुवन यांनी रेखाटलेली आहे . या कादंबरीचे मूळ रेखाटन हे महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी विचारांच्या झालेल्या बदलावर आपल्याला दिसून येते. ही कथा कुळवाडी येथील सीता , तारा , राधा , कृष्णा , आणि रवी या प्रमुख व्यक्ती पात्रांची आहे . कर्मठ जातियवादयाच्या खलवृत्ती माणसाचं विदारक चित्रण प्रकाश त्रिभुवन यांनी रेखाटलेले आहे .

सांगायचे तात्पर्य म्हणजे व्यवस्थेने नाकारलेल्या माणसाला माणूस म्हणून जगता यावं या साठी महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांची धडपड यांचे विचार यातून दिसून येतात . आणि या कादंबरीतील सिताची मुलगी तारा व्यवस्थे विरुद्ध कशी बंड करून उठते याचं ही भन्नाट चित्रण प्रकाश त्रिभुवन यांनी समर्पकपणे मांडले आहे . या मधून शिक्षण , समाज आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयीचं आंदोलन तसेच परिस्थितीने हताश करणाऱ्या व्यवस्थेवर ताशेरे ओढल्याचे आपल्याला दिसून येते . ज्यांना व्यवस्थेने नाकारले तेच पुढे महामानवांच्या विचाराने जीवन उद्धाराचे कार्य करतात . म्हणून कुळंबीण ही कादंबरी दिशा दर्शक आहे. कुळंबीण ही कादंबरी महिला संघर्षांचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे . या मध्ये महिलांचा एल्गार दिसून येतो . या कादंबरीला ऐतिहासिक टच असल्यामुळे ती वाचकांच्या मनाचा ठाव घेते व व्यवस्थेच्या कपटीपणाचा पर्दाफाश करते.

या कादंबरीचा शेवट सुध्दा अत्यंत महत्वाचा आहे . कारण ज्या महापुरुषाने आपलं अख्य जीवन समाज उद्धारासाठी खर्ची केलं त्याचे उत्तर दायित्व म्हणून तारा आणि रवी परिवर्तनाच्या दिशेने मार्गक्रमण करतांना आपल्याला दिसून येतात . या कादंबरीचा शेवट प्रकाश त्रिभुवन यांनी फारच छान केलेला आहे . ” तारा एक कुळंबीण स्वतः शिकते व कापड गिरणीतील महिलांनाही शिकविते म्हणजे महात्मा फुले यांच्या शिकवणुकीचा हा प्रभाव आणि परिणाम असून नंतर रवी आणि तारा यांना ज्या वाड्याने नाकारले त्याच वाड्यात ते राहायला येतात आणि त्याच वाड्यात ते एक शाळा सुरू करतात . त्या शाळेला नाव देतात सावित्रीबाई फुले विद्यालय “ही जी क्रांती आपल्याला दिसून येते ही क्रांती महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या समकालीन असलेल्या काळातील परिवर्तनाची नांदी आहे . म्हणून आज रोजी तर आपण महामानवांच्या विचाराने भक्कम मजबूत झालेलो आहोत. आज आपल्याला महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले , राजर्षी शाहू महाराज , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आज आपण समता , न्याय ,स्वातंत्र्य आणि बांधुत्वाच्या मार्गाने मार्गक्रमण करीत आहो.

म्हणून आजच्या या आधुनिक युगात रवी आणि तारा निर्माण होऊन माणसाच्या शिक्षणासाठी माणूस म्हणून मार्गक्रमण करूया हेच या कुळंबीण कादंबरीतून प्रकाश त्रिभुवन यांना सांगायचे आहे.या कादंबरीला थोर विचारवंत , प्रसिध्द साहित्यिक मा.वासुदेव मुलाटे सर यांची अभ्यासपूर्ण दीर्घ अशी प्रस्तावना आहे या प्रस्तावणेतूनच या कादंबरीचे महत्त्व सुद्धा आपल्याला दिसून येते साहित्य क्षेत्रात नक्कीच कुळंबीण या कादंबरीचे स्वागत होईल . पुढील वाटचाली साठी प्रकाश त्रिभुवन यांना शुभेच्छा !

■ कुळंबीण 【कादंबरी】
■ प्रकाश त्रिभुवन
■ संवाद : 9403637576
■ स्वरूप प्रकाशन , औरंगाबाद
■पृष्ठे : २४० ■ किंमत : २५०₹

✒️ देवानंद पवार(9158359628)