दुध डेअरीसाठी पत्नीचा छळ करीत दिला तलाक

28

🔺दुध डेअरी चालू करण्यासाठी माहेरून पैसे आण म्हणत पतीचा पत्नीला तलाख १३ लोकांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

✒️गेवराई तालुका,प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.16जून):- दूध डेअरी सुरू करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करीत छळ करणाऱ्या पतीने बेकायदेशीरपणे तलाक दिल्याप्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात सासरकडील १३ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई शहरातील कोरबू मोहल्ला येथील फळविक्रेते सय्यद खालेद अहमद यांची मुलगी मुस्कान हिचा विवाह काही वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील इंदिरानगर गारखेडा परिसरातील शेख हारूण शेख अलाउद्दीन याच्यासोबत थाटात झाला होता. आम्हाला काहीही नको, तुम्ही द्याल त्यात समाधानी म्हणत मुलाकडील मंडळींनी हा विवाह लावला. शहरातील तैय्यबनगर येथील तैय्यबऊलुम ( दारूल उलूम) मध्ये धर्मगुरूंच्या उपस्थितीत विवाह झाला होता.

लग्न झाल्यावर काही महिन्यानंतर पती शेख हारूण शेख अलाउद्दीन, सासरा शेख अलाउद्दीन शेख युसुफोद्दीन, सासू शेख मेहरुन्निसा शेख अलाउद्दीन, दीर शेख हाफिजोद्दीन शेख अलाउद्दीन, शेख समियोद्दीन शेख अलाउद्दीन, शेख इतर शेख अलाउद्दीन, शेख रजियोद्दीन शेख अलाउद्दीन, नणंद सय्यद शबाना सय्यद मोईन, शेख आईशा शेख अलाउद्दीन, शेख फातेमा शेख मोइन, कुलसुम शफी फुलारी आणि जाऊ शेख शहनाज शेख हाफिजोद्दीन यांनी संगनमत करून विवाहिता शेख मुस्कान हिला त्रास देण्यास सुरुवात केली.

तिला उपाशी ठेवून मारहाण करणे, शिव्याशाप देणे, टोमणे मारू लागले. जोपर्यंत माहेराहून दूध डेअरी टाकण्यासाठी पाच लाख रुपये आणत नाही, तोपर्यंत तुला माफी नाही, असे म्हणत जाच करू लागले. तसेच पतीने बेकायदेशीरपणे तलाक, तलाक, तलाक म्हणत तलाक दिला. अखेर पीडिता मुस्कान हिने आपले माहेर गाठले. सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक त्रास देऊन छळ केल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक अर्चना भोसले या तपास करत आहेत.