कोरोना विषाणू महामारी–संपुर्ण जगाच्या पुनर्रचनेची नांदी – प्रा. संदिप गायकवाड

29

जागतिक रंगमंचावर कोरोना विषाणू म्हणजे कोविड-१९ या राेगाने थैमान माजवलेले असून समग्र जगात जीवशास्त्रीय युध्दजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.हे युध्द् दोन देशासोबत ,दोन माणसासोबत नसून अतिसृक्ष्मजीव असलेल्या कोरोना विषाणू सोबत आहे.या महामारीने सारे देश उध्वस्त होण्याच्या दहलीजवर असून सामान्य देशाचे कंबरडेच मोडले आहे. जागतिक स्तरावरील सामाजिक,राजकिय,आर्थिक,व वैद्यकीय परिवेशाला मोठे आव्हान मिळाले आहे.भौतिक साधनांनी युक्त असलेल्या माणसाला हैरान करून सोडले आहे.
मानवाच्या इतिहासातील महामारीचा मागोवा घेतला तर असे लक्षात येते की,मानवाने अनेक महामारीला तोंड दिले आहे.इ. स.पुर्व ४३०. मध्ये प्लेग ऑफ एथेंस ला टाइफाइड तापाची महामारी आली होती.

त्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले होते.इ. स.१६५ ते१८० दरम्यान एंटोनीम प्लेग इतालवी प्रायव्दीप मध्ये चेचक रोगानी हैदोस घातला होता.इ.स.५४१-७५० दरम्यान प्लेग ऑफ जस्टिनियन या रोगाची सुरवात मिस्र या देशात झाली होती.यामध्ये प्रत्येक दिवशी १०,०००लोक मृत्युमुखी पडत होते.इ. स.१३०० मध्ये ब्लँक डेथ या रोगानी ७५ लाख लोक मरण पावले होते.इ. स.१३६१-१४८० दरम्यान जनप्रकोप महामारीने थैमान घातले होते.१३७० ला या महामारीत इग्लंडची लोकसंख्या ५०%कमी झाली होती.इ.स.१८४८ -४९ मध्ये खसरा,काळी खासी , आणि इन्फ्लुएंजा या रोगानी ७,५०,००० लोक मृत्युमुखी पडले होते.इ. स. १८९६-९७ मध्ये प्लेगने मोठे थैमान घातले होते.भारतात या रोगानी मोठी जीवीतहानी झाली.यावेळी भारतात ब्रिटीशांचे राज्य होते.प्लेगला आटोक्यात आणण्यासाठी सरकारने साथ रोग निवारण कायदा -१८९७ पारित केला.या कायद्याला मोठ्याप्रमाणात विरोध झाला तरी या कायद्याने प्लेग वर नियंत्रण मिळवले.

या कायद्यान्वये केंद्र सरकारने व राज्य सरकारने कोरोना विषाणू वर मात करण्यासाठी काही अनुच्छेदाचा उपयोग करून या कायद्याची उपयुक्तता किती महत्वाची आहे हे आज दाखवून दिले आहे.१८९७मधील महामारीत सत्यशोधक समाजातील सदस्य व क्रांतिज्योती -सावित्रीमाई फुले यांनी समाजाची मोठी सेवा केली ,या महामारीतच त्यांचे निधन झाले.या महामारीत छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरला लाँकडाऊन करून राज्याला वाचवले होते.जेव्हा जेव्हा जगावर मोठे संकट येते तेव्हा तेव्हा जगातील मानवप्रेमी आपआपल्या कुवती प्रमाणे जनतेला सहकार्य करतात .आज कोरोना विषाणुच्या लाँकडाऊनमध्ये भारतात सामान्य लोकांनी धर्म,जात,पंथ , वर्ण,लिंग यामध्ये भेद न करता तन-मन-धनाने मदत करीत आहेत हे भारतासाठी मोठी उपलब्धी आहे.

२६ जानेवारी १९५० पासून भारत गणराज्य बनला व भारतात लोकशाहीचा महासूर्य उजाडला .या उजेडानी अंधकारमय असलेल्या भारतीय नागरिकांना आपले जीवन प्रकाशित करता आले.त्याचे नैसर्गिक अधिकार मिळाले ही किमया भारतीय संविधानाची आहे.यामुळे भारतात एक सैंवधानिक अभिसरणाची प्रक्रिया काही प्रमाणात यशस्वी झाली हे म्हणने अतिशोयक्ती ठरणार नाही.पण आजही या संविधानात आमच्या धर्माचे काही नाही आहे,म्हणून हिनवणारे अनेक महाभाग आहेत त्यांनी जागतिक महामारीतही आपला राज्यघटना इतर देशाहून कशी सर्वश्रेष्ट ठरली यासाठी भारतीय संविधानाचे आभार मानावे.

भारतीय परीपेक्षातून या रोगाचा विचार केला तर १३० करोड भारतीय जनतेला मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.प्रधानमत्र्यानी लाँकडाऊनची घोषणा केली,ती भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार म्हणून भारतात लाँकडाऊन बहूप्रमाणात यशस्वी झाला असे म्हणता येईल तर काही देशात अध्यक्षीय प्रणाली असल्यामुळे लाँकडाऊन लावायला उशीर झाला आहे.भारतातील लाँकडाऊनमुळे श्रमजीवी वर्ग , सामान्य जनता यांचे अतोनात हाल होत आहेत.याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकारचे नियोजनशुन्य कारभार आहे.देशातील कोणतीही समस्येला उखळून फेकायचे असेल तर नियोजन केले पाहिजे नाही तर सावळागोंधळ होण्याचा धोका असतो . नोटबंदीमध्ये जसे लोकाचे हाल झाले तेच हाल लाँकडाऊनमध्ये होत आहे.योग्य पाऊल केंद्र सरकारने उचलले असते तर श्रमजीवी वर प्राण गमाविण्याची वेळ आली नसती.

युध्द् जन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आपले संविधान काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानवर भाष्य करताना म्हटले होते की,”मसुदा समितीने जे संविधान तयार केले आहे ते या देशासाठी आरंभ करण्यासाठी उत्तम असचे आहे.मला वाटते हे संविधान कार्यप्रवण आहे.लवचिक आहे आणि या देशाला एकसंघ ,एकात्म ठेवण्यासाठी समर्थ आहे.शांतता काळात आणि युध्दजन्य परिस्थितीत हे संविधान या देशाला एकसंघ,एकात्म ठेवण्यास समर्थ आहे.”भारतीय संविधानाच्या जोरावर लाँकडाऊनला सर्व देशबांधवानी साथ दिली तीला जगात तोड नाही.भारतीय संघराज्य हे आगळेवेगळे वैशिष्ट असून देशाला एकात्म ठेवणारा प्राण आहे.आजही कठीण काळातही काही अंधःभक्त धर्माचे पिल्लू सोडून देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न करतात , त्यांचे हे राजकिय डावपेच भारतीय सच्चे नागरिक यशस्वी होऊ देणार नाही.अशा देशद्रोही धर्म कावेबाजापासून सावध राहून स्वतःची व देशाची काळजी डोळ्यात तेल टाकून केली पाहिजे.

कोरोना विषाणुने दाखवून दिले की,माणुस श्रेष्ठ आणि कनिष्ट नसतो . माणूस हा समाजशील प्राणी आहे.समाजावर आलेल्या संकटावर माणूसच धावून जातो हे अधोरेखित झाले आहे,म्हणून सोशल डिस्टन्सिंग हा शब्द न वापरता फिजीकल डिस्टन्सिंग या शब्दाचा वापर करावा .कारण हजारोवर्षापासून मनुस्मृतीने बहुजन समाजाला क्वोरंन्टाईन करून ठेवले होते .
भारत सरकारने जर जानेवारी-फेब्रुवारी मध्ये परदेशातील येणा-या नागरिकंचे थर्मल स्क्रिनिंग केले असते किंवा विलगीकर कक्षात ठेवले असते तर भारतातील ९९%जनतेची जी आज होरफळ सुरू आहे ती झाली नसती.तसेच भारताची आर्थिक स्थिती इतर देशापेक्षा चांगली राहली असती ,पण आलेल्या संकटाला ओळखण्याची क्षमता नसल्याने फाजील आत्मविश्वास नडला आणि भारतीय समाजावर कोरोना विषाणूच महाभयंकर संकट कोसळलं. काही महाभाग या महामारीतही धर्म- जात-पंथ याचे अवैज्ञानिक दर्शन दाखवितात त्याच्या बुध्दिची कीव करावीसी वाटते.काही सेलिब्रिटी मदत करताना रोज बातम्यामध्ये दिसतात पण आमचे सामान्य कार्यकर्ते स्वतःचा जीव धोक्यात घालवून सहकार्य करतात त्यांना कुणी विचारत नाही , पण त्यांनी केलेले कार्य देशभक्तीच्या पानात दर्ज झाले आहे ,हे निर्विवाद सत्य आहे.

डॉक्टर,नर्स,वार्डबाय,पोलिस ,सरकारी अधिकारी,कर्मचारी ,समाजसेवक स्वतःच्या घरदाराची पर्वा न करता या साथीत अहर्निश सेवा देत आहेत हेच खरे देशभक्त आहेत. धर्माच्या नावाने,जातीच्या नावाने राजकिय वायरस पसरविणारेच खरे देशद्रोही आहेत.अशा वायरस पासून देशाला वाचवणे आपले कर्तव्य आहे.ही जी परिस्थिती निर्माण झाली त्याला माणूसच जबाबदार आहे.बुध्द सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी म्हणतो की,”विश्वात एक सुव्यवस्था आहे आणि पृथ्वीवरील सुव्यवस्था ही मानव प्राण्याच्या हातात आहे.”या वचनामुळे माणसाने आज वागायला हवे तरच विश्वबंधुता नांदेल.

आज भारताला मोठी संधी मिळाली आहे यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील पत सुधारणे महत्वाचे आहे.खाजगीकरण झालेली सर्व क्षेत्रातील बँका, मोठे दवाखाणे,कंपन्या,उद्योगधंदे यांचे राष्ट्रीयकरण करावे.देशावरील आलेल्या आर्थिक संकटावर खरी उपाययोजना ठरेल ,कारण लाँकडाऊन असतानाही अंबानी कसे काय श्रीमंत बनतात हे एक कोडच आहे . त्यासाठी खाऊजा धोरणावर पुनर्रविचार व्हावा हे काळाची गरज आहे. सर्व भांडवली वर्गाची मालमत्ता गोठवून भारतीय राजकोषात परिवर्तित करावी.कोरोना विषाणूने जगाला एक संदेश दिला की ,पर्यावरणाचा समतोल ठेवून काम करावे.सर्वांनी एकोप्याने राहावे.माणसामानसातील विषमता,धर्मातील भांडण,अणुशस्त्राची स्पर्धा,या पृथ्वीला नष्ट करणा-या बाबींचा बिमोड केला पाहिजे,समानतेचे नवे विश्व झाले पाहिजे.त्यासाठी कोरोना विषाणू संपूर्ण जगाच्या पुनर्रचनेची नांदी ठरेल यात शंका नाही.