दोन आयएसओ शाळा घडविणारे आदर्श मुख्याध्यापक – मदन लांडगे

32

दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक आज सेवानिवृत्त

शेती असो वा शिक्षण आज प्रत्येक क्षेत्रातच आधुनिकतेची कास धरून चालणाराच यशस्वी होतो.वयाने ज्येष्ट असूनही अशीच काळाची गरज ओळखून आधुनिकता जोपासून सर्वांना सोबत घेत मुख्यापध्यापक पदाची धुरा सांभाळून आपली शैक्षणिक यात्रा पूर्णत्वाकडे नेणारे एक उत्कृष्ट प्रशासक म्हणजे मदन नामदेवराव लांडगे.दिव्यांग असूनही कमालीची मनाची दिव्यता आणि कामातील भव्यता त्यांच्या अंगी दिसून येते.बीड तालुक्यातील दोन साधारण शाळांना आपला परिसस्पर्श करून आयएसओ दर्जा मिळवून देणारे एक यशस्वी मुख्याध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे.वडगावगुंधा आणि शहरी भागात असलेली अशोक नगरची केंद्रीय प्राथमिक शाळा अशा दोन्ही शाळा आंतर्बाह्य बदलून तेथे गुणवत्तेची ज्ञानगंगा आणणारे मुख्याध्यापक म्हणजे मदन लांडगे होत.केंद्रीय मुख्याध्यापक पदासाठी आवश्यक असणारी काम करण्याची जिद्द,चिकाटी आणि सर्वांना हाताळण्याची त्यांच्याकडे असलेली अंगभूत हातोटी त्यांचे व्यक्तीमत्व एक मुख्यध्यापक पदासाठीच जणू बनले असावे असा आभास निर्माण करते.नोव्हेंबर १९८६ साली परळी तालुक्यातील बेलअंबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आपली शिक्षक म्हणून सेवा त्यांनी सुरू केली.

एक उत्कृष्ट सहशिक्षक म्हणून त्यांनी येथे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.काही वर्षांतच गुंदेवाडी येथील मूळ रहिवासी असलेले व एका शेतमजूराचा मुलगा एक उत्तम मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळू लागले.१९९८ साली बदलीने बीड तालुक्यातील वडगाव गुंधा येथे लांडगे सर रुजू झाले.त्यावेळी या शाळेची परिस्थिती अतिशय बिकट होती.शाळेला इमारत नसल्याने मंदीरातच मुलांना शाळेचे धडे गिरवावे लागत असत.मदन लांडगे यांना शाळेची ही दुरावस्था पाहावली नाही.त्यांनी आपल्या चांगल्या कामामुळे येथील लोकांचा विश्वास संपादन केला आणि लोकसहभागाच्या माध्यमातुन शाळेसाठी एक एकर जागा दान स्वरूपात मिळवली.जागा उपलब्ध झाल्याने सर्वशिक्षा अभअभियांनातर्गत दर्जेदार वर्गखोल्या त्यांनी बांधून घेतल्या आणि शाळेसाठी एक भव्य इमारत उभी राहीली.प्रभारी मुख्याध्यापक असलेले लांडगे सर २००४ साली पदोन्नतीने पदाचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक बनले आणि वडगाव गुंधा केंद्राचा कारभार पुढे त्यांनी २०१६ पर्यंत विना तक्रार सांभाळला.

या दरम्यान त्यांनी शाळेच्या गुणवत्ता विकासाठी अनेक प्रयोग केले.भिंती आकर्षक रंगसंगतीत रंगवल्या.सात शिक्षकांची ही शाळा त्यांच्या काळात तेरा शिक्षकांपर्यंत नेली.शाळा परिसरात वृक्षारोपन करून परिसर हिरवागार केला.अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले.नवोदय आणि शिष्यवृत्ती अशा स्पर्धा परीक्षांमध्येही येथील विद्यार्थी यशस्वी होऊ लागले.सर्व शिक्षकांच्या मदतीने शिस्तबध्द नियोजन करून त्यांनी या शाळेला आयएसओ दर्जा प्राप्त करून दिला.शाळेतील विद्यार्थ्यांचा आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यांनी विद्यर्थ्यांमधील कलेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले.केवळ स्वतःची शाळा आयएसओ करून लांडगे सर थांबले नाहीत.त्यांच्या केंद्रांतर्गत येणार्‍या १२ शाळा समाजसहभागातून आयएसओ दर्जाच्या बनल्या.

२०१६ साली प्रशासकीय बदलीने ते बीड शहरातील अशोक नगर या शाळेत रूजू झाले.या शाळेत त्यांना सुरवातीला अनंत अडचणींचा सामना करावा लागला.येथील समस्या वेगळ्याच होत्या.शाळा शहरी भागात असली तरीही येथील पालक अत्यंत गरीब परिस्थिती असलेले होते.शाळेचे हे आगळे वैशिष्ट्य! त्यामुळे येथे लोकसहभाग मिळणे केवळ अशक्य होते.या वस्तीत शिक्षक – पालक समन्वयाचाही अभाव होता.मदन लांडगे यांनी आपला प्रशासकीय अनुभव वापरून शिक्षक – शिक्षक आणि शिक्षक – पालक समन्वय घडवून आणला.त्यासाठी त्यांनी आपले कौशल्य पणाला लावले आणि शाळा आयएसओ मानांकीत करून दाखवली.प्रमाणिकपणे काम करण्याची त्यांची पद्धत आणि मुख्याध्यापक पदाचा दांडगा अनुभव यांच्या बळावर येथील सर्व अडचणींवर त्यांनी मात केली.

शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून पारधी समाजाच्या ५० विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देत त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले.त्यामुळे शाळेचा पटही वाढला.रंगरंगोटीमुळे अशोकनगरची ही शाळा आता या भागात शोभून दिसू लागली.सन २०२० – २१ साठी ही शाळा मॉडेल स्कूल म्हणून निवडण्यात आली.त्यांच्या या कार्याची दखल घेत अनेक अधिकारी आणि पदाधिकारी यांनी या शाळेस आवर्जून भेटी दिल्या आणि त्यांच्या कामाचे तसेच उत्कृष्ट नियोजनाचे कौतूक केले.दोन शाळा आयएसओ केल्याबद्दल विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी त्यांना प्रशस्तीपत्र देवून त्यांचा सन्मान केला.संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अतिउत्कृष्ट आणि उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनीही प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला.शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाबद्दलही बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांतर्फे त्यांना सन्मानपत्र देण्यात आले आहे.बीडच्या भारत स्काउट – गाइड कार्यालयातर्फेही त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

अशाप्रकारे दिव्यांगत्वावर मात करुन अत्यंत बिकट परिस्थितीतही अखंड सेवाव्रत स्विकारलेले मुख्यध्यापक तथा दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक आज ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत.निश्चित त्यांचे हे कार्य बीडच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.सेवानिवृत्तीनंतरही त्यांना असेच आरोग्य आणि मान सन्मान मिळत रहावो.अशा आदर्श व्यक्तीमत्वास शासनमान्य दिव्यांग कर्मचारी संघटना बीड च्या परिवरातर्फे हार्दिक शुभेच्छा..!!!

✒️लेखक:-राजेंद्र लाड(मो.९४२३१७०८८५)जिल्हाध्यक्ष – शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना बीड