ड्रोन हल्ले रोखा

28

पाकिस्तान सीमेतून ड्रोनद्वारे होणारे हल्ले आणि आणि हेरेगिरीचे प्रकार सध्या भारतासाठी चिंतेची बाब बनली आहे. पाकिस्तान पुरस्कृत जिहादी अतिरेक्यांनी भारतावर ड्रोन द्वारे हल्ला करण्याच्या घटना मागील काही दिवसात सातत्याने घडत आहे. २७ जूनला जम्मूच्या वायुदलाच्या तळावर तसेच रत्नचाक – कुलुचाक लष्करी तळांवर अतिरेक्यांनी ड्रोन द्वारे क्षेपणास्त्र हल्ला घडवून आणला. त्यानंतर पुन्हा दोन ड्रोन द्वारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा रक्षकांनी ड्रोनवर गोळीबार करून हल्ला परतवून लावला. यानंतर सलग चार दिवस ड्रोनद्वारे टेहळणी करून शुक्रवारी अतिरेक्यांनी जम्मूमध्ये पुन्हा हल्ला केला. जम्मू वायुदल आणि सैनिक तळावर गेल्या काही दिवसांत ९ ड्रोन टेहळणी करताना आढळले. भारताने या प्रकाराची पाकिस्तानकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केला असून या मागे लष्कर ए तोयबा या संघटनेचा हात असल्याचा संशय भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ड्रोनद्वारे टेहळणी करून भारताच्या प्रमुख सैनिक तळांवर व वायुदलाच्या मुख्यालयांवर हल्ला करण्याचे अतिरेक्यांचे मनसुबे आहेत. अतिरेक्यांचे हे मनसुबे वेळीच उधळून लावायला हवेत. सध्या या ड्रोन आक्रमणाचे अन्वेषण करण्याची जबाबदारी राष्ट्रीय अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. हा विभाग सीमेपलीकडून येणाऱ्या ड्रोनवर लक्ष ठेवून आहे. ड्रोन हल्ल्यासारख्या राष्ट्रविघातक कारवाया वेळीच रोखायला हव्यात अन्यथा त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल. जम्मू काश्मीरमधील आतंकवादाचा नायनाट करण्यासोबतच या ड्रोन आक्रमणाच्या सुत्रधारांना धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलावीत. भारतावर ड्रोनद्वारे झालेला हा पहिलाच हल्ला आहे. याआधी असे हल्ले पाश्चिमात्य देशात करण्यात आले आहे. चीन अमेरिका रशिया यासारख्या मोठ्या देशांकडे हे हल्ले परतवून लावण्याचे तंत्रज्ञान आहे.

भारतानेही हैद्राबाद येथील डीआरडीओ या संस्थेत ड्रोन पडण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम यापूर्वीच सुरू केले असले तरी त्याला आणखी काही काळ जावा लागेल. अशावेळी परदेशातून हे तंत्रज्ञान तसेच ड्रोन पाडण्याचे साहित्य मागवण्याची तयारी देशाला करावी लागेल. ड्रोन हल्ला ही युद्धाचा नवा प्रकार आहे. भविष्यात असे आणखी हल्ले होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन भारताने स्वसंरक्षणासाठी सक्षम अशी ड्रोन विरोधी यंत्रणा विकसित करायला हवी.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५