१५ जुलै २०२१ पासून राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्यास परवानगी

24

🔸पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरु

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.7जुलै):- सन २०२० या वर्षात राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यानंतर शासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती काही कालावधीनंतर सुधारल्याने राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने प्रथमत, दि. १० नोव्हेंबर, २०२० च्या शासन परिपत्रकान्वये इ. ९ वी ते १२ वी चे वर्ग काही अटी-शर्ती निश्चित करुन दि. २३ नोव्हेंबर, २०२० पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर दि. १८ जानेवारी, २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये इ. ५ वी ते ८ वी चे वर्ग दि.२७ जानेवारी, २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. तथापि, त्यानंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट टप्याटप्याने वाढत गेली. त्यामुळे राज्य शासनाने दि. १५ एप्रिल, २०२१ पासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यातील लॉकडाऊन उठविण्यात आले.

त्यामध्ये राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थिती टप्याटप्याने वाढविण्यात आली आहे. तसेच इतर आस्थापना देखिल सुरु करण्यास टप्प्याटप्प्याने मान्यता देण्यात आली आहे.मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने त्यांच्या दि. १४ जून, २०२१ च्या पत्रान्वये विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात दि. १५ जून, २०२१ पासून व विदर्भात दि.२८ जून, २०२१ •पासून शैक्षणिक वर्ष सुरु करणेबाबत जाहिर केले होते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा उल्लेखदेखिल सदर पत्रात करण्यात आला होता.

तसेच सदर पत्रान्वये वरील दिनांकापासून शिक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्देश देण्यात आले आहे. मागील वर्षभरात विविध माध्यमातून प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी बसली आहेत व त्यामुळे त्यांच्यावर शारिरीक, मानसिक (psychological) तणाव येऊन दुष्परिणाम होत आहेत. या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पुढे जस जसा कालावधी जाईल, तस-तसे सदर नुकसान भरून काढणे कठीण जाईल. काही शाळा मध्ये विद्युत पुरवठा व इंटरनेट सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. गतवर्षी बऱ्याच कालावधी टाळेबंदी पाळली गेल्यामुळे अध्यापन व अध्ययन प्रक्रियेमध्ये खंड पडला. त्यामुळे बाल विवाह, बालमजुरीचे वाढते प्रमाण, मुलींचे/मुलांचे गळतीचे प्रमाण (drop-out) व घर-शेती कामात ठेवणे इ. मोठया प्रमाणावर सामाजिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

इयत्ता १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थी करिता इयत्ता ९ वी व ११ वी हा पाया असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी कोविङ मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आली.या शासन परिपत्रकानुसार दिनांक १५ जुलै २०२१ पासून राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. ग्रामपंचायतीनी ठराव करुन खालील निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरु करण्यास शासनकडून मान्यता देण्यात येत आहे.
१) ग्रामीण भागात कोविड-मुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा. .ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे समिती गठीत करावी, असे शासनाने निर्देश दिले आहेत.

१. सरपंच – अध्यक्ष,
२. तलाठी – सदस्य
३. अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती – सदस्य
४. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र – निमंत्रीत सदस्य
५. ग्रामसेवक – सदस्य सचिव
६. मुख्याध्यापक – सदस्य
७.केंद्रप्रमुख – सदस्य
शाळा सुरु करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी,
शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित गावात कोविड रुग्ण आढळून आला नसावा,
शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करणे बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व शिक्षण अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा, विद्यार्थांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये, विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करून घ्यावी व विद्यार्थीचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.
शाळा सुरू करताना मुलांना टप्या-टप्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.

कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फुट अंतर एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.
संबंधीत शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.