अंतर्मुख स्त्रीमनाची आविष्कारक !

19

(काव्यप्रतिभा- पद्मा गोळे जयंती विशेष)

शालेय जीवनापासूनच पद्मा गोळे यांच्यात नाट्यलेखनाची उर्मी संचरली व त्यांची तशी प्रतिभा साकारू लागली. त्यांच्यात नाट्यलेखनाची विशेष आवड निर्माण झाली. पन्नादाई हे त्यांचे नाटक वार्षिक संमेलनात सादर करण्यात आले होते. याशिवाय स्वप्न, समिधा- अप्रकाशित ही दोन पुरुष पात्रविरहित नाटकेही त्यांनी लिहिली. प्रीतिपथावर, नीहार, स्वप्नजा व आकाशवेडी हे त्यांचे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. स्वप्नजा या त्यांच्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले, तसेच त्यांच्या रायगडावरील एक रात्र, नवी जाणीव व इतर नाटिका या बालनाट्यांच्या पुस्तकांनाही महाराष्ट्र राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले आहेत. त्यांची ही लेणी कविता-
“समोर, धुकं पांघरुन, कोवळं ऊन खात बसलेला हा लोहगड रोज पहातो माझ्याकडे रोखून, आणि नजरेनंच विचारतो, विसरलीस? आपणच उत्तर देतो, हो विसरणारच. मी पुटपुटते, दगड शुद्‍ध दगड! असं सगळं विसरता येत असतं, तर तुझी ही भाषा कळली असती का मला? अन हे भोळं मन भळभळलं असतं का?…”

आधुनिक मराठी कवयित्री व ‘पद्मा’ या नावाने काव्यलेखन करणाऱ्या पद्मा गोळे या महान साहित्यिक होत. त्यांच्या पतीचे नाव विष्णू गोळे तर त्यांचे पूर्णनाव पद्मावती विष्णू गोळे असे होते. त्यांचा जन्म दि.१० जुलै १९१३ रोजी महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात पटवर्धन राजघराण्यात तासगाव येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तासगाव येथेच झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण पुणे येथे पूर्ण केले. तसेच पुण्यातील एरंडवणा येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयातून त्या एम.ए.झाल्या. प्रितिपथावर या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर भा.रा.तांबे यांचा प्रभाव असला, तरी अनुकरणाचा हा टप्पा लवकरच त्यांनी ओलांडला. त्यांच्या कवितेने पृथगात्म रूप धारण केले. स्वतःच्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. एका संवेदनाशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. त्यांच्या रसिक, चिंतनशील आणि स्वप्नदर्शी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांतून येतो. स्निग्ध सूर, संपन्न निसर्गप्रतिमा आणि शालीन संयम ही त्यांच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये आढळून येतात. अभ्यासुया त्यांचे हे एक काव्य :

वाटा-“हरवलेल्या वाटा…. चुकलेल्या वाटा… रुळलेल्या वाटा…
पहिली धरते एक हात, दुसरी धरते दुसरा;
पाय ओढून तिसरी म्हणते आता इथेच पसरा!”

त्यांचे काही प्रकाशित साहित्यप्रकार- १) इ.स.१९४७मध्ये मराठी कवितासंग्रह- प्रीतिपथावर, २) इ.स.१९५४मध्ये मराठी कवितासंग्रह- निहार, ३) इ.स.१९५५मध्ये मराठी नाटक- स्वप्न, ४) इ.स.१९६२मध्ये मराठी कवितासंग्रह- स्वप्नजा, ५) इ.स.१९६८मध्ये मराठी कवितासंग्रह- आकाशवेडी आदी आहेत. महाराष्ट्राच्या मराठी मनावर अधिराज्य प्रस्थापित करणाऱ्या ख्यातनाम कवयित्री पद्मा गोळे यांचे देहावसान दि.१२ फेब्रुवारी १९९८ रोजी पुणे येथे झाले. कविता काय सांगताहे बघा-
“सकाळी उजाडता उजाडता उठले,

पाहिलं… आणि कमालच!
एक वीट निखळलेली.
मी उचलून लावली ती जिथल्या तिथे.”
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जयंती निमित्त त्यांच्या अविस्मरणीेय आठवणींना शतदा विनम्र अभिवादन !!

✒️संकलक व शब्दांकन:-श्री एन. कृष्णकुमार जी. गुरूजी.
(संत-लोक साहित्य अभ्यासक तथा म. रा. डि. शै. दै. रयतेचा वालीचे लेख विभाग प्रमुख व गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी)मु.- वंद. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, रामनगर, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली, मोबा. ७४१४९८३३३९.