घुंघुरवाळा कादंबरीकार : इंदिरा संत !

29

(शिक्षिका इंदिरा संत स्मृती दिन)

इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथालेखिका होत्या. त्यांचे पूर्णनाव इंदिरा नारायण संत असे होते. त्यांच्या अपत्याचे नाव प्रकाश इंदिरा-नारायण संत होय. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संत यांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. इ.स.१९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या आदी नात्यांतून दिसून आलेले भारतीय स्त्रीचे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. एका उमद्या आणि जीवनाचा भरभरून आस्वाद घेत त्याच्याशी दोस्ती करण्याच्या त्यांच्या या स्वभाव धर्मामुळेच आपल्याला त्यांच्या कवितांतून गहिऱ्या, अंतरंग व्यापणाऱ्या आणि तरीही नवोन्मेश शालिनी अशा कवयित्रीचे दर्शन घडते. त्यांची ‘नको नको रे पावसा’ कविता बघा-

“नको नको रे पावसा,
असा अवेळी धिंगाणा।
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली…”

इंदिरा संत आणि त्यांचे पती नारायण संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा काव्यसंग्रह ‘सहवास’ या नावाने सन १९४०ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने पती नारायण मा.संत यांचे सन १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. महान साहित्यकार रमेश तेंडुलकर यांनी त्यांच्या निवडक कविता ‘मृण्मयी’ नावाने इ.स.१९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या. कारण त्यांचे काव्य ‘किती दिवस मी’ खुणावत होते-

“किती दिवस मी मानित होतें,
या दगडापरी व्हावे जीवन;
पडो उन वा पाउस त्यावर थिजलेलें अवघें संवेदन…”

पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संत यांचा जन्म दि.४ जानेवारी १९१४ रोजी कर्नाटकातील इंडी या गावी झाला. कोल्हापूर व पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बीए, बीटीडी व बीएड या पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये अध्यापिका म्हणून काम पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. या कॉलेजात त्यांनी सन १९५६ ते सन १९७४ या कालावधित प्राचार्यपद देखील भूषवले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधील सहाध्यायी नारायण संत यांच्याशी त्या इ.स.१९३५साली विवाहबद्ध झाल्या. गर्भरेशीम या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत वासंती मुजूमदार यांनी त्यांच्याविषयी सांगितले आहे, “आपला आनंद अक्का (इंदिरा संत) स्नेहीजनांना सुंदर भेटवस्तू देऊन जरी साजरा करत तरी त्या स्वतः मात्र या सर्वांतून अलिप्त असत. ही अलिप्तता त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या खडतर अनुभवांनी मिळवून दिली होती. मात्र त्या खुल्या मनाने बदलांचं आणि नव्या गोष्टींचं स्वागत करत. यश आणि अपयश त्या एकाच मापाने तोलत असत.” एक कविता ‘ऋणमुक्त’ अशी-

“झुंजु मुंजु धुक्यातुन कधीच का फिरला नाहीस?
जांभळ्या फुलाच्या शामलीजवळून कधिच का गेला नाहीस?
त्या फुलावरच्या दवाचा थेंब कधीच का पाहिला नाहीस?”

इंदिरा संत यांच्या प्रकाशित झालेल्या साहित्यात- कवितासंग्रह : (१) इंदिरा संत यांच्या समग्र कविता- पॉप्युलर प्रकाशन-२०१४. या पुस्तकाला अरुणा ढेरे यांची प्रस्तावना आहे. (२) गर्भरेशीम- पॉप्युलर प्रकाशन-१९८२. (३) निराकार बाहुल्या-१९७२. (४) मरवा मालनगाथा : मालन नावाच्या बाईच्या ओव्यांचा संपादित संग्रह-भाग १ व २. (५) मृगजळ-१९५७. (६) मेंदी-१९५५. (७) रंगबावरी-१९६४. (८) वंशकुसुम शेला-१९५१. कथासंग्रह : १) कदली, २) चैतू, ३) श्यामली. ललितलेख संग्रह : मृद्गंध-१९८६- मेहता पब्लिशिंग हाऊस, फुलवेल-१९९४. आणि कादंबरी : घुंघुरवाळा आदींचा समावेश आहे. त्यांची वेदना ‘इथे वेदना’ हे काव्य दर्शविते-

“इथे वेदना लालतांबडी;
इथे बधिरता संगमरवरी!
इथे उकळते रक्त तापुनी,
बेहोषी अन येथे काळी!”

त्यांचे दि.१३ जुलै २००० रोजी वयाच्या ८६व्या वर्षी बेळगाव येथे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे इंदिरा संत यांना व त्यांच्या काव्य कल्पकतेला स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !!


✒️संकलन व लेखन:-श्री निकोडे कृष्णकुमार जी. गुरूजी(सारस्वत व दै.रयतेचा वाली- जिल्हा प्रतिनिधी,मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी.तह. आरमोरी, जि. गडचिरोली.मधुभाष- ७४१४९८३३३९