सडोली खा येथे सुपर आर्मी च्या चिमुकल्यांची व्यसनमुक्ती प्रबोधन दिंडी

32

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.20जुलै):-सडोली खा येथील श्री संत गोरा कुंभार तरुण मंडळ गेली 13 वर्षे तंबाखू विरोधी अनेक उपक्रम घेऊन व्यसनमुक्ती अभियान राबवत आहे. हिंदूंच्या सर्व सणांचा उपयोग या अभियान साठी केला जातो. आषाढी वारीला तर प्रतिपंढरपूर नंदवाळ येथे पोस्टर व चित्र प्रदर्शन लावून लाखो लोकांचे प्रबोधन दरवर्षी केले जाते. पण कोरोनाच्या महामारी मुळे दोन वर्षे यात खंड पडला आहे.या वर्षी केंद्र शाळा सडोली खा व संत गोरा कुंभार तरुण मंडळ यांच्या संयुक्त विध्यमाने सुपर आर्मी ची व्यसनमुक्ती प्रबोधन दिंडी सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरवातीस उपस्थितांना ग्रामपंचायत सदस्य श्री जयसिंग कुंभार यांच्या हस्ते मास्क चे वाटप करण्यात आले.मास्क, स्यानिटायझर व सुरक्षित अंतर हे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला.अध्यापक श्री श्रीकांत चव्हाण यांनी उपस्थितांना आजीवन व्यसनमुक्त जीवनाची शपथ दिली. यावेळी सुपर आर्मीच्या सर्व मुलांनी तंबाखू विरोधी संदेश देणारी प्रबोधनात्मक चित्रे हातात घेतली होती.काही चिमुकल्या मुलींनी संदेश लिहिलेली तुळशी वृंदावन डोक्यावर घेतली होती.सर्वजण परंपरागत पोशाखात उपस्थित होते.

अध्यापक कृष्णात कुंभार यांनी कोरोनाच्या पासून बचावासाठी करावयाच्या उपाय योजना विशद केल्या.कार्यक्रमाचे संयोजक व म. गांधी व्यसनमुक्ती राज्य पुरस्कार प्राप्त अध्यापक श्री एकनाथ कुंभार यांनी तंबाखू विरोधी घोषणा देऊन उपस्थितांना सहभागी करून घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री सुरेश कांबळे,सिद्देश कुंभार,जयराम धनवडे, अमोल खाडे, आनंदा पाटील, कृष्णात मगदूम, धनाजी दिंडे,संजय पाटील,शिवाजी बेलेकर यांनी विशेष प्रयत्न केले.