लाल दिव्याच्या उजेडात बावन टक्के हडप !

30

ओबीसी हा शब्द आता सर्व व्यापी झाला आहे. आणि व्हायलाही हवा. कारण भारतात ओबीसींची संख्याच तेवढी मोठी आहे.आपल्या प्रजासत्ताक भारत देशाने लोकशाही प्रणाली स्वीकारलेली असल्यामुळे संख्याबळाला खूप महत्त्व आहे. संख्या बळाच्या आधारावरच कारभारी ठरत असतात.आणि खरं म्हणजे या देशाचे नेतृत्व करण्याइतपत संख्याबळ ओबीसींचे आहे.पण…पण परंतु, जर तर या गोष्टींमुळे जे नुकसान होते त्याचा अंदाज बांधणे कठीण आहे.अलिकडे भारतात दरवर्षी वृक्षारोपणाचा उरुस भरवला जातो.कोट्यावधी रुपयांची उधळण झाडं लावण्यासाठी केली जाते. तरिही वनक्षेत्र काही केल्या वाढत नाही.कारण जंगलं नष्ट होऊन वरचेवर सिमेंटच्या जंगलांनी अधिकाधिक जमीन व्यापत आहे.विशेष म्हणजे जंगल तोडीसाठी जंगलातील झाडांची लाकडेच वापरली जातात. म्हणून तर “कु-हाडीचा दांडा गोत्यात काळ” ही म्हण पडली असावी असे वाटते. लेखाची सुरुवात आणि उदाहरणावरुन एव्हाना विषयाचा संदर्भ आणि उद्देश सूज्ञांच्या लक्षात आला असावा.

ओबीसींची संख्या नेतृत्व करण्याइतपत असूनही स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजतागायत ओबीसींना कायमचे सत्तेपासून दूर ठेवण्याचे धाडस,साधा ग्रामपंचायतीचा एक सदस्यही स्वबळावर निवडून आणायची ताकद नसलेला साडे तीन टक्के संख्या असलेला समाज कसा काय करु शकतो याचेच उत्तर म्हणजे “कु-हाडीचे दांडे” होय.नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रचंड मोठा विस्तार पार पडला.सगळे निर्णय स्वतः घेऊनही सध्याच्या स्थितीत कुणीही विरोधात बोलण्याची शक्यता नसताना, “नाकापेक्षा मोती जड”अशा परिस्थिती असूनही मोहन भागवत देखील मोदींना दुखवायचं धाडस करण्याच्या स्थितीत नसताना मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याची युक्ती आणि गरज मोदींच्या डोक्यात का आली असावी हे समजून घेणे गरजेचे आहे. सेहचाळीस टक्के मंत्रिमंडळ नवीन आहे. त्यात एक नव्हे दोन नव्हे तब्बल सत्तावीस ओबीसींना मंत्रीमंडळात घेतले आहे हे ऐकूनच क्षणभर छातीत धस्स झाले.

कारण या आधीचा संसदेच्या पायरीवर आणि भर सभागृहात भारताच्या संविधान वर शेठजींनी माथा टेकल्याची आठवण आली.ओबीसींची गरज पडली म्हणून जुन्यापैकी किमान डझनभर मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला गेला आहे. ओबीसींचे जे मंत्री नव्यानं जोडले गेलेत त्या मंत्र्यांचे अभिनंदन करायचीही संधी मिळाली नाही. कारण सत्तावीस मंत्र्यांच्या बदल्यात पुढच्याच दिवशी अख्ख्या ओबीसींच्या आरक्षणाला जलसमाधी दिल्याची माहिती सर्वत्र झळकली.मग कोणत्या तोंडाने नवीन मंत्र्यांचे अभिनंदन करायचे ?अजून हळद ओली होती ओबीसींचे आरक्षण रद्द केल्याबरोबर नव्या मंत्र्यांनी बोहल्यावरुन पाय उतार व्हायला हरकत नव्हती.असे झाले असते तर अख्खा समाज त्यांना बेहोश होऊन डोक्यावर घेतला असता.ते ओबीसींच्या गळ्यातील ताईत बनले असते.पण…ओबीसी भारतातील बहुसंख्य असूनही हाती सत्ता का नाही.याचे उत्तर म्हणजे नव्याने केंद्रीय मंत्रीमंडळात गेलेल्या सत्तावीस मंत्र्यांसारखी मानसिकता.मग परत आठवते ती म्हण “कु-हाडीचा दांडा…”

केंद्र सरकारला म्हणजेच मोदींना ओबीसींना घाईघाईने मंत्रीमंडळात घेण्याची गरज का पडली याचे उत्तर आहे.महाराष्ट्रात “लोकजागर अभियान” ने दिलेला अकरा सूत्री कार्यक्रम आणि “ओबीसी मुख्यमंत्री ! बहुजन सरकार” चा नारा होय. महाराष्ट्रात लोकजागर अभियानामुळे ओबीसींना जाग आली आहे. महाराष्ट्रातून निघालेल्या ओबीसींच्या जागृतीच्या ज्योतीचे संपूर्ण भारतात झंझावात निर्माण व्हायला वेळ लागणार नाही हे ओळखून आणि हे थोपवायचा केविलवाणा प्रयत्न म्हणजेच सत्तावीस ओबीसी मंत्री होय.मंदिर बांधकामाचा मुद्दा भावनिक बनविल्यामुळे देव देऊळाच्या मानसिक गुलामीत अडकलेल्यांनाही ‘रामा’ला साक्षी ठेवून पाचच मिनिटांत अडीच कोटींचे अठरा कोटी कसे झाले हे कळून चुकले आहे आणि ‘राम’ बाण निष्प्रभ ठरल्यामुळे दूर जात असलेल्या ‘ओबिसी’चे मन वळवायचा प्रयत्न म्हणजे सत्तावीस ओबीसी मंत्री होय !

भाजपा आणि मोदींचे पूर्वीसारखे मोकळ्या आकाशात असलेले पर्व संपण्याच्या मार्गावर आहे. पूर्वीचे दिवस आता राहिले नाहीत याचा दस्तुरखुद्द मोदींनीही धसका घेतला आहे.कवी प्रदीप यांच्या इशा-याप्रमाणे ‘भाजपाच्या चिरागांनीच भाजपाला आग लावत असल्याची’ भीती मोदींना वाटत आहे.पक्षामध्ये नाराजीचे स्वर वाढत आहेत.कमी रिस्टरचे का असेनात पण हादरे बसत आहेत हे मात्र नक्की. सत्तेचे शिखर गाठेपर्यंत मोदींना संघाची नितांत गरज होती.आणि बिनधास्त मोदी संघाची धोरणंच राबवतात म्हणून संघालाही मोदींची गरज होती.आता दोन्ही कडूनही “गरज सरो वैद्य मरो” अशी स्थिती निर्माण झाली आहे.संघाला आता मोदींच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी मोदींचा चौफेर उधळलेला घोडा पुन्हा नागपूरच्या तबेल्यात आणून बांधण्यासाठी गडकरी, योगींसारखे पर्याय उपलब्ध झाले आहेत.मोदीही मोठमोठ्या उद्योग व्यवसायिकांच्या ओळखीतून बैठकीतून बरेचसे “आत्मनिर्भर” झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी कुणीही कुणालाही सहजासहजी नमणार नाहीत संधी मिळाली की एकमेकांचे हिशेब केल्याशिवाय राहणार नाहीत.

म्हणून संकटकाळी ओबीसींची ताकद आपल्यामागे असावी यासाठी ही सत्तावीस ओबीसी मंत्र्यांची ताकद.
समस्त ओबीसींच्या इतक्या प्रचंड ताकदीची किंमत जर मोदींसह भागवत आणि सोनियांपासून पवारांपर्यंत सर्वांनाच जाणवत असेल,त्याची प्रचिती त्यांना येत असेल तर स्वतः ओबीसींना आपली ताकद आणि क्षमता याचे मोल का कळू नये ?
मोदींचे प्रतिस्पर्धी अशी प्रतिमा तयार होत असल्याने गडकरींची मेट्रोच्या माध्यमातून उजळत असलेली प्रतिमा फोडण्यासाठीच मंत्रिमंडळ विस्तारात मोदींनी मेट्रोचे इंजिन त्यांच्याकडून काढून सायडींगला नेऊन ठेवले आहे.सगळ्यांचीच कुंडली मोदींनी तयार करून ठेवली आहे,तयार आहे.भोळ्या भाबड्या जनतेच्या आस्था आणि विश्वासाचा फायदा घेऊन पंडित पुजारी यांच्या कायम रोजगाराची सोय करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या जागेच्या सौदेबाजीत दोन कोटींची जमीन अठरा कोटींना आणि ते ही अशा व्यवहारासाठी सर्वसामान्यांना महिनोन्महिने लागत असताना मंदिराच्या ट्रस्टींनी एकाच जागेची पंधरा मिनिटांत दोन वेळा पंजीकरण करून घेतले यातील प्रामाणिकता जनतेच्या मनात संशय निर्माण करणारी आहे.

विशेष म्हणजे ऐन कोरोनाचा कहर शिखरावर असताना कुणालाही न जुमानता मोदींनी मोठ्या थाटामाटात या मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे राम आणि रामभक्त ही आपल्या मदतीला धाऊन येणार नाहीत याचा धोकाही मोदींची बेचैनी वाढवणारा आहे.म्हणून गडकरींच्या नंतर या जागेच्या माध्यमातून दुसरे प्रतिस्पर्धी योगींचा पत्ता कट करायचा घाट त्यांनी घातला आहे. पण मोदींनी शिफारस करुन राज्यात पाठविलेल्या शर्माला नाकारल्यामूळे योगी सध्यातरी त्यांना जुमानताना दिसत नाहीत. मोदींची झोप उडायचं हे देखील एक कारण आहे.एकूण मोदींच्या अशा घरघर अवस्थेला सावरण्यासाठी ओबीसींचे पाठबळ असण्याची आवश्यकता मोदींनी ओळखली आहे.म्हणूनच त्यांच्या नव्या सरकारची पायाभरणी करण्यासाठी त्यांचे काही पाळीव वृत्तवाहिन्या आणि फुटकळ पुढा-यांकडून ओबीसींच्या एकगठ्ठा मतदानाची तजवीज म्हणून ‘अबकी बार.. ओबीसी सरकार’ अशा फसव्या घोषणेची उजळणी केली जात आहे.मोदी शहा आदींनी सीएए एनआरसी ची भीती दाखवल्यानंतर बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम यांनी ‘डीएनए’ ला प्रमाण मानून याचा निर्णय केला जावा अशी मागणी जोरदारपणे लावून धरल्यामुळे मोदी शहांची तर झोप उडालेली आहे आणि मोहन भागवतांच्याही पायाखालची वाळू सरकली आहे.त्यामुळे ‘भारतातील सर्वांचा डीएनए एकच’ असल्याचा कधी नव्हे असा अद्भुत साक्षात्कार त्यांना झाला आहे. याला सहजगत्या घडलेला योगायोग म्हणता येणार नाही.

सगळ्यांचा डीएनए एकच असेल,भारतात राहणारे सगळे हिंदूच असतील तर मग ‘हिंदू खतरेमे है..’ यासारख्या दंगली घडविणारे,मुसलमानांना लक्ष्य करून त्या समाजाची नकारात्मक प्रतिमा तयार करणारे आगलावी नारे कशासाठी दिल्या जात होत्या ? त्यांच्या बायका आणि मुलांच्या संख्येवरून रान पेटविले जात असेल तर संख्या बळावर त्यांना सत्तेत सहभागाची संधी न देता हेतुपुरस्सर मुस्लिमांना दूर ठेवण्यामागं
काय लॉजिक आहे ?मोहन भागवत म्हणतात तसे सगळेच जर हिंदू आहेत तर मग हिंदूतील सर्वात मोठी संख्या असलेल्या ओबीसींच्या आरक्षणाला संघाचा विरोध का आहे ? ओबीसींची जात निहाय जनगणना करण्याला संघाचा, भाजपचा विरोध का आहे ? सर्वांचा डीएनए जर सारखाच असेल तर सर्वोच्च संवैधानिक पदावर असलेल्या राष्ट्रपतींसारख्या व्यक्तीला देखील मंदिरात प्रवेश का मिळत नाही ?रामाच्या नावावर तर सत्ता मिळवली पण रंगवलेले ‘रामराज्य’ त्यांना आणता आले नाही. कोरोना मुळे सगळेच उघडे पडले आहेत.अंधभक्तांची टोळी देखील आता तोंड लपवतांना दिसत आहे. बोटावर मोजता येण्या जोगे वृत्तपत्र आणि पत्रकार सोडले तर गोदी मीडियावर आता कुणाचाच विश्वास राहिलेला नाही. कुणाची नोकरी गेली, कुणाचा उद्योग बंद पडला, कुणाचा व्यवसाय मातीत गेला तर कुणाचा नातेवाईक तडफडून मेला.

यांची राफेल मधील दलाली लोकांना फारशी बोचली नाही,कोरोना काळात सुरू असलेली राजरोस लूट मात्र लोकांच्या नजरेतून सुटली नाही. एक पैसा खर्च न करता जणू काही लस स्वतःच निर्माण केली आहे, असा देखावा निर्माण करण्याचा मोदींचा कावा लोकांच्या लक्षात आला आहे. वरून सगळं काही ठीक ठाक आहे असे भाजपचे लोक कितीही आव आणत असले, तरी त्यांनाही देशाच्या बर्बादीच्या झळा लागल्या आहेत.तेही अस्वस्थ आहेत.बंड करण्याची अथवा प्रथम कोण सुरू करतो याच्या प्रतिक्षेत सर्वजण आहेत.या सर्व गोष्टींचा आणि संभाव्य धोक्याचा विचार करून वा-याची दिशा ओळखूनच रामाची साथ सोडून ओबीसींची संगत करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणजेच सत्तावीस ओबीसी केंद्रीय मंत्री होत.आणि याच मंत्र्यांना हाताशी धरून ओबीसींसाठी खड्डा तयार केला जात आहे.आता निर्णय समस्त ओबीसींच्या हातात आहे. सावध होऊन तो खड्डा चुकवायचा की, ओबीसींच्या हिताचे सर्वात मोठे मारेकरी असलेले,स्वार्थासाठी जे कुणालाही केव्हाही आपला बाप मानायला तयार असतात. पण काम आटोपलं की त्याच बापाचा मुडदा पाडायला देखील मागं पुढं पहात नाहीत हा ज्यांचा आजवरचा इतिहास आहे अशांना त्या खड्ड्यात गाढायचे. 

आज त्यांच्यावर बाका प्रसंग ओढवल्यामुळे ओबीसी,ओबीसी करत नारा देत असले तरी.. हे लोक कधीच ओबीसींचेच नव्हे तर कुणाचेही नसतात हे त्यांच्या कळपातील साऱ्या बैताड ओबीसींनी लक्षात घेतलं पाहिजे ! स्वार्थासाठी ज्यांनी प्रभू रामचंद्रांना न्याय दिला नाही, शपथ घेतलेल्या संविधानप्रती एकनिष्ठ निष्पक्ष राहिले नाहीत ते ओबीसींच्या प्रती प्रमाणिक राहणार नाहीत हे आरक्षण रद्द करून त्यांनी स्वतःच सिद्ध केलेलं आहे.तेव्हा… एवढेच म्हणावेसे वाटते की,ओबीसींनो ! सावधान ! दाना दिया, पानी दिया, बडे प्यारसे पाला था
ये वही शख़्स है, जिसने मुर्गोंका मोर्चा सम्हाला था
चौकीदार था, रहनुमा था, मसिहा था, मशहूर था..
आज जाहीर हुवा की, अरे,वो तो..’नॉनव्हेज धाबेवाला’ था !

 

✒️लेखक:-विठ्ठलराव वठारे(निमंत्रक पश्चिम महाराष्ट्र
लोकजागर अभियान)मो:-8087535296
joshaba1001@gmail.com