बिनमेंदूचे माणसं

28

✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००

“भारत हा एक तऱ्हेवाईक देश आहे आणि तेथील राष्ट्रभक्त व देशभक्तही तऱ्हेवाईक लोक आहेत.भारतीय राष्ट्रभक्त व देशभक्त असा आहे की जो आपल्या देश बांधवांना माणसापेक्षा नीच वागणूक मिळत असतांना देखील उघड्या डोळ्यांनी पाहातो तो परंतु त्याची मानवता त्या विरूध्द कधीच निषेध करत नाही.पुरूष आणि स्त्रीयांना काहीही कारण नसतांना मानवी अधिकार नाकारण्यात आले आहेत.हे या देशभक्ताला माहीत असते . परंतु कृतीशील मदत करण्याच्या दृष्टीने त्याची नागरी संवेदना जागृत होत नाही.”
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
खंड १८ ,भाग १, पान नं.२४९

भारतीय समाजव्यवस्थेत जीवंत असलेला माणूस हा बिनमेंदूचा होता.शरीर बलाढ्य होतं पण मनं गुलाम होतं.बनावट ग्रंथानी त्याची ताकत पंगू केली होती.आपल्या पायरीनं चालणं हाच त्याचा नित्य काम होतं.उच्चवर्णीय समाजासोबत जगू नये यासाठी अनेक बंधने लादलेली होती.साऱ्या व्यवस्थेवर ब्राम्हणी विचारांचे प्राबल्य होते.हजारोवर्षापासून या माणसाचा मेंदू बिनकामाचा करून ठेवला होता.बुध्द धम्माचा कालखंड व सम्राट अशोकाचा कालखंड सोडला तर हा देश सातत्याने गुलामीतच जगत राहिला.बुध्दाच्या विचारावर प्रहार करून विकृत व्यवस्थेने देशातील बांधवाना लाचार व पंगू केलं होतं.

अठराव्या शतकाच्या प्रबोधनयुगाने जगात नवे वारे वाहू लागले.देशातील बनावट ग्रंथाची पोलखोल होऊ लागली.शिक्षणाच्या संधीचा पुरेपुर फायदा करून बहुजन लोकांनी आपले गुलामीचे कारण हेरले व परिवर्तनाची नवी ऊर्जा समाजाला दिली.महात्मा जोतीराव फुले ,क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज,सयाजीराव गायकवाड,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांनी आपल्या प्रबोधनातून व ज्ञानक्रांतीतून नवे आत्मतेज बहुजनात पेरले.बहुजनाच्या गुलामीचे खरे कारण ब्राम्हणी ग्रंथ हे आहेत.आपली सांस्कृतिक गुलामी नष्ट केल्याशिवाय बहुजन लोकांना हक्क मिळणार नाही हे वास्तव हेरून या समाजाला लढाईसाठी तयार करण्याचे काम महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले.

ब्राम्हणी धर्म ग्रंथातील बनावटगिरीचे पोस्टमॉर्टम करून सत्य इतिहास मांडला.नवी संविधानात्मक संरचना निर्माण करून देशाला समाजवादी लोकशाहीवादी विचार क्रांतीची महाऊर्जा दिली.पण आज ही लोकशाही आयसीयुत बंद करून वर्तमान देशनेतृत्व भारतीय लोकशाहीचे वस्त्रहरण करत आहे.साम, दाम, दंड, भेद या न्यायाने लोकशाहीचे सारे खांब जमीनदोस्त करत आहे.

बिनमेंदूची माणसं निर्माण करून देशाला भांडवलदारांच्या हाती विकल्या जात आहे.बिनमेंदूची माणसं ही रोबोटीक स्वरूपाची झाली आहेत.जेवढं सांगितलं तेवढच करत आहेत.माणसाचे ब्रेनवाश करून मेंदू निकामी केला जात आहे.यंत्रवत झालेला हा माणूस स्वतःचे स्वातंत्र्य दुसऱ्याच्या हवाली करत आहे.तो इतका अंधभक्त झाला आहे की त्याला त्याचे गुलामपण दिसू नये म्हणून फसव्या मायाजालाची व्यवस्था निर्माण करून त्याला इतिहासापासून दूर ठेवल्या जात आहे.आपल्या राजकिय फायद्यासाठी बिनमेंदूचे दंगलग्रस्त मेंदूत रूपांतर केले जात आहे.धार्मिक व जातीय दंगली करण्यासाठी हे मेंदू कामी आणल्या जात आहेत.

देशातील आजचा तरूण बेराेजगार आहे.कोरोनाने तर साऱ्या लोकांचा रोजगार हिरावला आहे तर काही भांडवलदार पैसावर पैसा कमवत आहे.नौकरी बंदीने तर तरूणाचा फार भ्रमनिराश केला आहे.फुकटच्या जीयो डाटाने आमची तरूणाईची वाट लागत आहे.आँनलाईन शिक्षणाने विद्यार्थी व पालकाचे कंबरडेच मोडले आहे.परिवर्तनाचा खरा शिल्लेदार मोबाईलच्या वेडात गुरफुटून गेला आहे.वास्तव व भ्रम याचा त्यांना थांग लागत नाही.गरीब विद्यार्थ्याचे आयुष्य उध्दवस्त व काळोखमय झाले आहे.लोकांना ध्येयशुन्य बनवून नवी मनुव्यवस्था अभावग्रस्त लोकांवर आपली मायाजालात फसवत आहे.नवीन प्रपोगण्डा तयार करून बिनमेंदूची नवी फौज उभी केली जात आहे.देशाला गुलाम करून देश भांडवलदारांच्या हाती विकल्या जात आहे.तरूणांना कावडयात्रा,दंगल,जातीयता,धार्मिकता,कट्टरता,कुंभमेळा , सांस्कृतिक रूढी,यामध्ये तल्लीन ठेवून सारा देश अंधाऱ्या काळोखात ढकलल्या जात आहे.

मित्रांनो अशा कावेबाजापासून देशाची सुटका करून या.आपल्या धडावर आपलाच मेंदू ठेवू या.संविधानात्मक महाऊर्जा घेऊन गुलाम करणाऱ्या पुनरुज्जीवनवादी तत्वांना मुळासकट उखळून फेकून या.बिनेमेंदूचे माणसं तयार करण्याऱ्या फँक्टरीला आग लावू या.सम्यक ज्ञानाची नवी पेरणी करू या.नव्या आंदोलनासाठी तरूणानों आवाज बुलंद करू या. तरूणांनों ,”काळोख पेलण्यासाठी आधी उजेड व्हावे लागते आणि उजेड सतत राहावा म्हणून सैनिक व्हावे लागते”चला तर मित्रांनो आपल्या देशाला बिनमेंदूचा होण्यापासून वाचवू या.सर्व भारतीयांनी सरकारच्या बनावटगिरीचा बुरखा फाडून नव्या राजकिय,सामाजिक,सांस्कृतीक,शैक्षणिक ,परिवर्तनवादी विद्रोहाची मशाल प्रज्वलीत करू या.देशात बिनमेंदूची माणसं निर्माण करणाऱ्या मूलतत्ववाद्यांना हिमालयावरून कडेलोट करू या.पहा क्रांती आपली वाट पाहात आहे.चला सारे मिळून नवा एल्गार करू या . बिनमेंदूची माणसं तयार करणाऱ्या अमाणुषतेवर प्राणपणाने प्रहार करू या .पहा विजय आपली वाट पहात उभा आहे.उद्याचा सूर्य आपल्याला क्रांतीतेज देत आहे.तूर्ताश थांबतो..!