महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा- जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

34

🔸उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलडाणा(दि.6ऑगस्ट):-प्रशासनात विविध विभाग कार्यरत असतात. कार्यरत विभागांमध्ये महसूल विभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे महसूल विभागाला प्रशासनाचा कणा संबोधल्या जाते. शासन कुठलीही नवीन योजना आखताना सुद्धा महसूल विभागाला गृहीत धरूनच कार्यवाही करावयास लावते. त्यामुळे विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सर्व सामान्य जनतेशी निगडीत कामे विहित कालावधीत निकाली काढावी, असे प्रतीपादन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 5 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी प्रमुख उपस्थितीमध्ये होते. महसूल दिनानिमित्त 1 ऑगस्ट 2020 ते 31 जुलै 2021 या महसूली वर्षामध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी / कर्मचारी तसेच कोवीड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन एका योद्ध्याप्रमाणे आपात्कालीन परिस्थिती हाताळणी अशा कोवीड योद्ध्यांचा सन्मान, गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. चावरीया यांनी महसूल विभाग व पोलीस विभाग व आरोग्य विभाग यांनी कोवीड 19 करीता अहोरात्र काम केले असल्याने या विभागाचे कौतुक केले. या कार्यक्रमामध्ये उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, मेहकर यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी व डॉ. संजय गरकल यांना तहसिलदार, मेहकर यांना उत्कृष्ट तहसिलदार म्हणून गौरविण्यात आले. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी अभिजीत नाईक यांनी अत्यंत साधेपणाने व कोरोना संसर्ग टाळण्याच्या अनुषंगाने शासनाव्दारे वेळोवेळी विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन पार पाडला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, अव्वल कारकुन, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, तलाठी, वाहनचालक, कोतवाल व पोलीस पाटील उपस्थित होते