ऑगस्ट क्रांती दिन

22

देशभरात आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा होत आहे. इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झाली होती.८ ऑगस्ट १९४२ रोजी भारताला स्वातंत्र करणार असल्याचे इंग्रजांनी म्हटले होते.मात्र,ऐनवेळी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र देणार नसल्याचे सांगितले.त्यामुळे महात्मा गांधींनी देशभर ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा केली.या आंदोलनाला ‘भारत छोडो’ असे नाव देण्यात आले होते.’करो या मरो’ अशी या आंदोलनाची घोषणा होती.

इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट,अर्थात क्रांती दिन! स्वातंत्र्यलढय़ाची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणा-या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस,पण स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस अनोळखी झाला आहे.सर्वाच्या हृदयात क्रांतिवीरांची ती मशाल आठवणीच्या रूपाने धगधगत राहणे अपेक्षित असले तरी ती मशाल केव्हाच विझली आहे.एवढेच काय या दिवसाचे महत्त्व आता औपचारिकतेपुरते शिल्लक आहे.

ऑगस्ट क्रांती दिनाला आज ७९ वर्ष पूर्ण होत आहेत.९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी केलेली ‘छोडो भारत’ची गर्जना आणि दिलेला ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र ९ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता.त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली.देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरुवात झाली.प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता.ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती.हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता.गांधीजींच्या केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळाल्याने ब्रिटिशांची धाबे दणाणले.देशातील आंदोलनाची ब्रिटिशांना आदल्या रात्री बातमी मिळाल्याने पहाटे पाच वाजताच महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बिर्ला हाऊसमधून ताब्यात घेण्यात आले.

आता प्रत्येकजण पुढारी होईल,असा संदेश यावेळी गांधीजींनी दिला.ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती.या सर्व नेते मंडळींना पुण्यात हलवण्यात आले.चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी,कस्तुरबा गांधी,महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवण्यात आले आणि त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली.मात्र ब्रिटिश सरकारने गुप्तता पाळूनही या घटनेची माहिती वा-याच्या वेगाने पसरली.गांधीजींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू,पटेल,आझाद यांना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आल्याची माहिती पसरली.
नेत्यांची धरपकड झाल्याने शांत होईल,अशी अपेक्षा ब्रिटिशांना होती.मात्र घडले भलतेच.नेत्यांच्या अटकेमुळे आंदोलन लोकांच्या ताब्यात गेलं.देशभर जागोजागी आंदोलने,मिरवणुका,मोर्चे यांना ऊत आला.सरकारने जमावबंदी लागू केली.पण लोक आता आदेशांना भीक घालत नव्हते.पोलिसांच्या लाठी हल्ल्याला,गोळीबाराला जुमानत नव्हते.

जाळपोळ,पोलिसांचे खून,टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले.देशातील जनतेने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारल्याची परिस्थिती होती.संपूर्ण देश पेटून उठला होता.दंगल,जाळपोळ,गोळीबार,रेल्वेचे अपघात,सरकारी कार्यालयांना आगी लावणे,सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते.ब्रिटिशांकडून दडपशाही सुरू होती.पाहिजे त्याला विनाचौकशी अटक केली जात होती.सारा देश गोंधळलेल्या स्थितीत होता.सरकारने या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार ठरवले.गांधीजींनी याचा इन्कार केला आणि सरकारच्या निषेधार्थ २१ दिवसांचे उपोषण केले.पण याचवेळी जगभरातील परिस्थितीही बदलत होती.युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकत होते.अमेरिका नावाची महासत्ता उदयास येत होती.अमेरिकेच्या मदतीने ब्रिटिशांनी मुसंडी मारली.त्यामुळे दुस-या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.

महायुद्धाच्या आघाडीवर दिलासा मिळाल्याने ब्रिटिशांनी सर्व यंत्रणा भारतातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वापरली आणि क्रांतीची तीव्रता हळूहळू कमी झाली.भारतावर दीडशे वर्षे राज्य करणा-या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती.त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांती लढय़ाची आठवण म्हणून ९ ऑगस्टला ‘क्रांती दिन’ पाळला जातो परंतु आज या दिवसाचे महत्त्व नवीन पिढीलाच नाही,तर नेते-पुढा-यांनाही राहिलेले नाही,हे आपले दुर्दैव आहे.

✒️लेखक:-राजेंद्र लाड(आष्टी)मो.९४२३१७०८८५