आ.बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली मग्रारोहयो योजना गावागावात राबवणार – रोहयो ता.अध्यक्ष जगन्नाथ ढोबळे 

28

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.9ऑगस्ट):-तालुक्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी  योजनेअंतर्गत सर्व विभागानी कामे तत्काळ सुरू करून खऱ्या गरजवंतांना या योजनेचा फायदा झाला पाहिजे.उद्दिष्टानुसार मागणी येणाऱ्या कामांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी.सर्वसामान्य लोकांपर्यंत ही योजना पोहोचणे गरजेचे आहे.गाव तिथे एम.आर.इ.जी.एस.योजना अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी राबवली पाहिजे.आपण आ.बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावत या योजनेतून कसलाही भेदभाव न करता पारदर्शक कामे केली जातील असे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कमिटीचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ ढोबळे यांनी सांगितले.

सोमवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी आष्टी तहसील कार्यालय येथे महात्मा गांधी रोजगार हमी कमिटीची बैठक घेण्यात आली.या बैठकीस तहसीलदार श्रीम.शारदा दळवी,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे,समिती तालुकाध्यक्ष जगन्नाथ ढोबळे,इंजि.प्रल्हाद तळेकर,रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्याम शिरसाट,लागवड अधिकारी सुदाम मुंडे,कृषी प्रतिनिधी जी.एस.तरटे,ज्येष्ठ कमिटी सदस्य सुभाष वाळके,संतोष साप्ते,सचिन थोरवे,संतोष वाघमारे,आजिनाथ गोल्हार,श्रीम.उज्वला कर्डिले,श्रीम.उषादेवी ससाने यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता बैठक घेण्यात आली.यावेळी तालुका कृषी विभाग,पंचायत समिती विभाग,सामाजिक वनीकरण विभाग लागवड अधिकारी कार्यालय विभाग,जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या कामाची माहिती देण्यात आली.

यावेळी बोलतांना समिती अध्यक्ष जगन्नाथ ढोबळे म्हणाले की,कृषी विभागांतर्गत शेततळे,कांदा चाळ,फळबाग लागवड यासाठी गावस्तरावर कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माहिती द्यावी तर सामाजिक वनीकरण अंतर्गत रोपवाटिका वृक्ष लागवड बाबत गावागावात जागृती करावी तर पंचायत समिती अंतर्गत सध्या सुरु असणाऱ्या सिंचन विहिरी,शेततलाव,वृक्ष लागवड,पांदण रस्ते तसेच जिल्हा परिषद अंतर्गत छोटे-छोटे तलाव व बांधबंदिस्ती,वन खाते अंतर्गत वन तलाव ही सर्व कामे मागणीनुसार तात्काळ सुरू करावेत.कामे करत असतांना कोणत्याही अधिकाऱ्याने हेवेदावे करू नयेत.आम्हीसुद्धा या योजनेत कसलेही राजकारण करणार नाही.

ज्यांचा प्रस्ताव येईल ते कामे तात्काळ सुरू झाली पाहिजेत.मग तो कोणत्याही पार्टीचा असो किंवा नसो त्याचे काम होणे महत्त्वाचे आहे.प्रत्येक गावातील लोकांना या योजनेचा फायदा कसा करून घेता येईल यासाठी मी व आम्ही सर्व सदस्य मिळून आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक कामे कशी केली जातील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.आमदार आजबे यांनी आमच्यावर दिलेली जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे कमिटी अध्यक्ष जगन्नाथ ढोबळे यांनी यावेळी सांगितले.तहसीलदार श्रीम.शारदा दळवी,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी सर्वांच्या सहकार्याने व समन्वयाने लवकरच सर्व विभागाची कामे टप्प्याटप्प्याने सुरू करणार असल्याचे सांगितले.