धरणगाव येथे फोटोग्राफी दिनानिमित्त ऍड.भोलाणे यांच्या हस्ते कॅमेराचे पूजन

26

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.19ऑगस्ट):– येथे जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने कॅमराचे पूजन करून फोटोग्राफी दिवस साजरा करण्यात आला.तत्पूर्वी जागतिक फोटोग्राफी दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ऍड. व्ही. एस. भोलाणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास माल्यार्पण करण्यात आले. याकार्यक्रम प्रसंगी ऍड.भोलाणे यांनी सांगितले की, दि. १९ ऑगस्ट १८३९ या दिनी जागतिक स्तरावर फोटोग्राफी दिवस म्हणून घोषणा करण्यात आली. पूर्वीच्या काळात कॅमेरे नसल्याने ग्रामीण भागातील लोकांना दूरपर्यंत शहरात जावे लागत असायचे. आता तर प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने प्रत्येक जण मोबाईलद्वारे आपले फोटो काढतो.

तरीही आपल्या सर्वांना फोटोग्राफर किंवा दुकानावर जावेच लागते. यामुळे फोटोग्राफर हा आपल्या सर्वांच्या आठवणी कॅमेरात साठवून ठेवतो. फोटोग्राफीच्या छंद जोपासणाऱ्या सर्व बांधवांना मी तालुका पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा देतो. कार्यक्रम प्रसंगी ऍड.भोलाणे यांचे स्वागत तालुका असोसिएशनचे अध्यक्ष मा.अमित पाटील यांनी गुलाबपुष्प देऊन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार धरणगाव असोसिएशनचे अध्यक्ष मा.शैलेश भाटिया यांनी मानले. यावेळी सचिव नरेंद्र चौधरी, युवराज महाजन, भारमल पाटील, अनिल महाजन, राज शिंदे, गजानन चौटे आदी फोटोग्राफर बांधव उपस्थित होते.