विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक प्रभावीपणे कसा रुजवावा

93

● पार्श्वभूमी-

यावर्षीच्या उन्हाळ्यात कडक एप्रिलमध्ये तसाच कडक पॅन्डेमीक कोविड 19 चा लॉक डाउन सुरू होता. माझा 7 वर्षाचा भाचा- सोहम, घरी आलेला होता.एव्हाना आम्ही सगळेच घरी होतो.कुठे जायचे नाही,काही विशेष काम नाही,असे रिकामे-रिकामे काम चालू होते.आता ‘काम’ म्हणणे म्हणजे हास्यास्पद होईल.असो! दुपारचे 2 वाजले असतील, “थंड काहीतरी टेस्टी टेस्टी प्यावे वाटायले!” असे सोहम सारखे पुटपुटत होता.त्याची आई झोपली असल्याने आता मामा म्हणून मीच त्याची मागणी पूर्ण करणार होतो.सर्व कोल्ड ड्रिंक्स ची दुकाने बंद असल्यामुळे बाहेरून काही पूर्ववत तयार आणण्याचा प्रश्नच नव्हता.मग,मी काय करू? असा विचार करू लागलो.तितक्यात घरगुती,थंडगार व मस्त गोड लिंबू सरबत बनवता येईल,हे मला सुचले.सोहम आणि मी एकत्र बसून छानपैकी लिंबू सरबत बनविले.

हे सर्व करत असताना सोहमची निरीक्षणाची प्रक्रिया सातत्याने सुरू होती. दोघांनी लिंबू सरबत प्यायल्यानन्तर सोहमचा निरीक्षणातून आलेला प्रश्न माझ्यासमोर उभा टाकला होता .त्याने मला विचारले,” मामा,हे लिंबू सरबत तयार करण्याचे तुला कसे काय सुचले?” पुढे,दुसरा प्रश्न तयारच! “सर्वप्रथम लिंबू सरबत कोणी बनवले असेल?” पुढे,” त्या व्यक्तीला कसे माहीत लिंबू,पाणी,साखर एकत्र मिळविल्यावर असा काहीसा छान व प्यावा वाटणारा पदार्थ तयार होतो ते?” अशी त्याची प्रश्नांची सरबत्ती सुरू होती.मी सरबत बनविण्यापेक्षा त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊनच जास्त मेटाकुटीला आलो होतो.

आता दुसरे एक उदाहरण ऐका! माझ्या मोठ्या बहिणीचा छोटा मुलगा अंश,जो सोहमपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. ( वय – 10 वर्षे ) तो आपल्या भावाला सांगत होता की,पंखा स्विच दाबले की लगेच का सुरू होतो?,तसेच टीव्ही पण कसा सुरू होतो,मोटारसायकल मध्ये पेट्रोल टाकले की ती कशी धावते,मिक्सर मिश्रण बारीक कसे करते….वैगरे,वैगरे! बऱ्याच गोष्टी त्याच्या वयोमानानुसार समजावून सांगत होता.

आता या वेगवेगळ्या वयांच्या दोन्हीही भावंडांचे मी निरीक्षण केले.त्यांना समजावून घेतले.त्यांचे विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केला.मी पण नेहमी निरीक्षण करून त्याचे विश्लेषण करत असतो.लेखक होण्यासाठी, मुळात लेखक असण्यासाठी सभोवताली घडणाऱ्या बाबींचे बारकाईने निरीक्षण हे करावेच लागते.असो! विश्लेषण केल्यानन्तर माझ्या लक्षात आले की,दोघांचे वय व त्यानुसार त्यांचा बुध्यांक हा वेगवेगळा आहे.तरीसुद्धा त्यांच्या वयोमानानुसार जो तो त्याच्या जागी विचार करायला बरोबरच होता.अंश, वैज्ञानिकांनी केलेले संशोधन समजावून सांगत होता.जी प्रॅक्टिकली पूर्ण होऊन,आपण त्याची फळे चाखत होतो.तर सोहम ,एखादया संशोधकाची नेमकी संशोधनाची प्रक्रिया सुरू होते कशी? हे तो सांगत होता.जे कदाचित त्यालाही समजत नसेल की तो किती गहन विचार व निरीक्षण नोंदवत आहे ते.

● प्रास्ताविक-

वाचक हो! काळजी करू नका! मी आपल्या लेखनाचा विषय अजिबात भरकटू देणार नाही.मी एक शिक्षक म्हणून आपल्या लेखाच्या मुख्य विष्याचीच प्रस्तावना सांगत आहे. प्रस्तावनेतुन विषय उलगडला तर तो विषय समजायला सोपा जातो.असे आम्हाला अध्यापनाच्या शिक्षणक्रमात शिकवण्यात आले होते.मी एक शिक्षक तथा विद्यार्थी म्हणून त्याचेच पालन करत आहे.काय आहे विषय आपल्या लेखनाचा? तर तो आहे, ‘विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक प्रभावीपणे कसा रुजवावा ? ‘ बरोबर? आता हे वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांत रुजवण्यासाठी आधी तो मला समजणे अगत्याचे आहे.नाहीतर, मी त्यांना तो कसा समजावून सांगू शकेल! नाही का? आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काही पुस्तकांची पाने चाळून समजावून घेता येत नाही.म्हणजे,ते कसे होईल- ‘उत्कृष्ठ कवी होण्यासाठी अमुक-अमुक पुस्तक वाचा’ यासारखे! किंवा आपले विज्ञानच पहा न,’ तुम्ही आशा प्रकारच्या स्थळाला भेट दिली की,संशोधक होऊ शकता’ नाहीतर ,’ चांगला स्वयंपाक येण्यासाठी गृहिणीने खालील पदार्थ चाखावे,ती उत्कृष्ट गृहिणी होईल’ वैगरे ,वैगरे! बरेच उदाहरणे देता येतील.

परंतु,उपरोक्त उदाहरणातून जे आपल्याला अपेक्षित आहे,ते साध्य होईल का? तर नाही! साध्य झाले तर अर्धवट आणि अर्ध कच्चेपण! कारण हे सर्व जमण्यासाठी आपल्या आतमध्येच तशी जिज्ञासा असावी लागते. तरच ध्येयाप्रती आपल्या मनात उत्कंठा राहील आणि ते कार्य समजून घेण्याची तशी तयारीपण! पण, तुम्हाला अमुक असे करा, म्हटल्यावर तुम्ही ते करू शकणार नाही.वैज्ञानिक दृष्टीकोनाचे तसेच आहे.तो शिकून समजावून घ्यायचा भागच नाही मुळात. आपल्या आतमध्येच ती स्वयंप्रेरणा व स्वयंशक्ती असावी लागते.

आता माझ्या भाच्यांमधील दुसऱ्या उदाहरणाला ( अंशच्या ) जे ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ समजले,ते 100 % चुकले आणि जे पहिल्या उदाहरणाला ( सोहमच्या ) ‘ वैज्ञानिक दृष्टिकोन ‘ म्हणतात ते पण 100% बरोबर नाहीत.परंतु,ते 100% च्या आसपास आहेत.कदाचित 99% बरोबर आहेत.हे सांगण्याचे कारण हे की, विज्ञान असो की कुठले इतर शास्त्र तुम्ही 100% बरोबर आहात हे नेमके सांगता येत नाही.आणि जे संशोधन आधीच पूर्ण झाले त्यावर बोलणे काय! आणि तशा एक सारख्या अनेक वस्तू तयार करणे काय! ते वैज्ञानिक दृष्टिकोन होऊ शकत नाही.फक्त ती एक नक्कल होईल.ज्यात बुध्दीचा फारसा कस लागणार नाही.पण हे असेच का? जेव्हा हा प्रश्न मनात निर्माण होतो,तो असतो ‘वैज्ञानिक दृष्टिकोन!’

आता तुम्ही म्हणाल की,जर वैज्ञानिक दृष्टिकोन पुस्तकातून शिकता येत नाही,तशी स्वयंशक्ती व जिज्ञासा असावी लागते,तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण करावा? मग हे विषयच चुकला का? ( जो लेखनाचा आहे. ) तर, नाही! मी एक सोपे उदाहरण देतो आपल्याला- एखादयाने जिलेबीची चवच नाही चाखली तर त्याला वेगवेगळे गोड पदार्थ खावे कसे वाटतील,किंवा रस्ता हा खराब असतो! हे सांगण्यापेक्षा,व्यक्ती जेव्हा स्वतः निरीक्षण करेल तेव्हाच तो ठरवेल न ,की काही रस्ते खराब तर काही चांगले पण असतात. ( म्हणजे तसे पृथक्करण करून ) मग,त्यासाठी 1-2 रस्ते हे आधी दाखवावे लागतील न!

एक गुरुजी सर्व विद्यार्थ्यांना सारखा वाटत नाही, आणि सगळे गुरुजी अध्यापनात सारखे नसतात.हे समजण्यासाठी आधी मुळात 4-2 गुरुजी विद्यार्थ्यांसमक्ष उभे करावे लागतील न! सांगण्याचे तात्पर्य हे की,वैज्ञानिक दृष्टिकोन पुस्तकातून शिकण्याची संज्ञा नसली, तरी तशी अनुभूती देऊन नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये तो निर्माण करता येईल.त्यासाठी एक सुजाण पालक व तितकाच निष्ठावांत शिक्षक म्हणून तशा अनुभूती आपल्या पाल्यांपुढे/विद्यार्थ्यांपुढे निर्माण कराव्या लागतील.तरच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊ शकेल.स्वयंशक्ती किंवा जिज्ञासा असेल तर त्याला तोडच नाही.

● मुख्य गाभा-

मित्रांनो आता प्रस्तावना संपून मुख्य विषयाला सुरुवात झालेली आहे,एव्हाना आपल्या हे लक्षात आलेच असेल. 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेत भाग 4 ए जोडण्यात आला. त्यामध्ये कलम 51 क नुसार 10 प्रकारची ‘मूलभूत कर्तव्ये’ राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.(2002 ला 86 वी घटनादुरुस्ती करून 11 वे कर्तव्ये जोडण्यात आले.) आता या 11 कर्तव्यामध्ये एक विज्ञानाशी,विज्ञान निष्ठेशी संबंधित आहे.ते कर्तव्य म्हणजे,’प्रत्येक भारतीयांचे कर्तव्ये असेल की,मानवतावाद, समतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून , ज्ञान घेऊन सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करावा.’ आता याचा अर्थ असा की,आपण वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून त्याचा प्रचार व प्रसार करावा.तसेच 1986 च्या सुधारित शैक्षणिक धोरणानुसार ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष’ हे मूलभूत गाभाघटकात अंतर्भूत करण्यात आले. मूल्यशिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन महत्वपूर्ण मानले गेले. म्हणजे,व्यवस्थेने वैज्ञानिक दृष्टीकोनाचे महत्व ओळखले व ते भावी पिढीसाठी किती महत्वपूर्ण आहे या दृष्टीने शिक्षणक्रमात तथा भारतीय राज्यघटनेत त्याचा सामावेश करून दिशादर्शक वाटचालीस सुरुवात केली.

आता ही संकल्पना मुळात सुरुवात झाली कधी? यामध्ये बरेच तर्कशास्त्री ,विचारवन्त,संशोधक यांच्यामध्ये मतभेद आहेत.तरीसुद्धा साधारणपणे 450 वर्षांपूर्वी हा दृष्टिकोन उदयास आला असेल,यात बऱ्याच अंशी मतप्रवाहात एकवाक्यता दिसून येते.( मग,त्यापूर्वी वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हता का? होता! परंतु,कोणी कार्यकारणभाव मांडण्याची हिम्मतच केली नाही. ) आता हे सांगण्याचे कारण हे की,सन 1530 ते 1543 दरम्यान ‘निकोलस कोपर्निकस’ या थोर पोलिश खगोलशास्त्री तथा गणितज्ञ यांनी त्यांच्या पुस्तकात एक महत्वपूर्ण सिद्धांत मांडला.त्याला फक्त तर्काचा आधार नसून तसे संशोधन पुराव्यानिशी करण्यात आले होते.आता हे नवीन सिद्धांत असा होता,ज्याने सगळ्या जुन्या संकल्पना आणि आजपर्यंतच्या सर्व साचेबद्ध रचनेत बदल घडवून आणला होता. त्याच्यानुसार ,पृथ्वी ही सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरते,पृथ्वीसह सर्वच ग्रह स्थिर अशा कक्षांमधून सूर्याभोवती फिरत असतात, ही कल्पना मांडली. इतर ग्रहांप्रमाणेच पृथ्वीसुद्धा चंद्रासह सूर्याभोवती एका वर्तुळाकार कक्षेत फिरत असते आणि तिला स्वत:भोवती फिरण्यासाठी २४ तास तर सूर्याभोवती फिरण्यासाठी एक वर्ष लागते. यामुळे टॉलेमी यांचा ‘भुकेंद्री’ सिद्धांत कायमचा मोडीत निघाला.

आता हे सर्व तेव्हाच्या व्यवस्थेने सहज स्वीकारले नव्हते.त्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागला होता. गॅलिलिओ ला तुरुंगवारी पण भोगावी लागली होती. तेव्हा आपली सभ्यता कशी असेल? याचा विचार न केलेला बरा! आता हे स्वतःच्या डोळ्यासमोर पाहण्याचे भाग्य कोपर्निकस ला काही मिळाले नाही.

मुळात कोपर्निकस मुळेच वैज्ञानिक दृष्टिकोन उदयास आला,हे सांगण्याचे कारण हे की त्याने जे पूर्वीचे सिद्धांत वर्षानुवर्षे आपल्याकडून खरे म्हणूनच स्वीकारण्यात आले होते, याचा त्याने स्वीकार केला नाही. स्वीकार न करण्याचे कारण हे की,काही गोष्टींचा कार्यकारणभाव त्याला पटला नाही. जसे,टॉलेमी यांच्यापासून चालत आलेली विश्वाची ‘भूकेंद्री’ म्हणजेच पृथ्वी संपूर्ण विश्वाच्या मध्यभागी असून सूर्यासह इतर ग्रह तिच्याभोवती फिरतात ही कल्पना कोपर्निकस यांना चुकीची वाटत होती.कारण, या कल्पनेनुसार सूर्य, चंद्र आणि ग्रह यांच्या गतीसंबंधीचे नियम व त्यांची दिलेली स्पष्टीकरणे सुसंगत नव्हती. ही सुसंगती येण्यासाठी काही तरी वेगळी कल्पना मांडायला हवी, असे कोपर्निकस यांना वाटत होते.दुसरी बाब ही की,जुन्या लॅटिन ग्रंथांच्या वाचनातून बुध व शुक्र सूर्याभोवती फिरत असल्याचे उल्लेख त्यांच्या लक्षात आले. या कल्पनेला व्यापक रूप देऊन त्यांनी पृथ्वीसह सर्वच ग्रह स्थिर अशा कक्षांमधून सूर्याभोवती फिरत असतात, ही कल्पना मांडली. म्हणजे,झालेली संशोधन खरीच आहेत हे डोळे लावून स्वीकारणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन होऊ शकत नाही.अर्थात सर्वच संशोधने चुकीची नसतात.किंबहुना पूर्वीच्या संशोधनाचा उपयोग हे नवीन संशोधनाच्या गृहितकासाठी होत असतो.हेही तितकेच सत्य आहे.याला आपण नाकारू शकत नाही.

आता या माझ्या सर्व बोलघेवडेपणातून आपल्या काय लक्ष्यात येईल? प्रत्येक घटना होण्यामागे काहीतरी कारण हे असतेच! दोन वेगवेगळ्या घटनांतून एखादी नवीन बाब निर्माण होत असेल तर त्या दोहोंमध्ये काहीतरी संबंध हा दडलेला असतोच! म्हणजेच कार्यकारणभाव हे वैज्ञानिक दृष्टिकोन असण्यामागचे एक महत्वपूर्ण अंग आहे. या कार्यकारणभावावरूनच एक नवीन गृहीतक मांडले जाते,जे अगोदर केलेल्या निरीक्षणातूनच निर्माण होते.जुन्या सिद्ध प्राथमिक उपपत्तीपासून नव्या सुधारित उपपत्ती मांडल्या जातात.यासाठी तर्क व पुराव्याचे अधिष्ठान हे असतेच. ही संशोधनाची किंवा आपले अंदाज व तर्क यांना विशिष्ट पायऱ्यानिशी मांडण्याची एक पद्धत आहे.या सगळ्यांचा पाया हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि जो निरीक्षणातून सुरू होत असतो.

थोडक्यात वैज्ञानिक दृष्टीकोनाची सोपी व सुटसुटीत व्याख्या अशी करता येईल,

” कुठल्याही घटनेमागचा कार्यकारणभाव समजून घेणे , दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन होय.”

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावीपणे रुजूवायचा असेल तर आपल्याला अगोदर वैज्ञानिक दृष्टिकोणात स्विकार्य काय आणि अस्वीकार्य काय आहे? हे तपासून पाहिले पाहिजे.नाहीतर आपण चुकीच्या दिशेने जाऊ…

निरीक्षण,तर्क,अनुमान,प्रचिती व प्रयोग या मार्गांनी ज्ञान मिळविण्याची ही एक विज्ञानाची पद्धत आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन ‘शब्दप्रामाण्य’ मानत नाही- म्हणजे कोणी एखादया मोठया व्यक्तीने सांगितले म्हणून डोळेझाक करून स्वीकारत नाही.

ग्रंथप्रामाण्य मानत नाही- पुस्तकात लिहिले म्हणून चिकित्सा न करता स्वीकारत नाही.

कोणताही चमत्कार हा कार्यकारणभावाशिवाय होत नसतो,हे वैज्ञानिक दृष्टिकोनात स्पष्ट होते.चमत्कारामागे हातचलाखी किंवा विज्ञान या दोहोंपैकी एक हे असतेच!

आजवर माणसाची झालेली प्रगती ही विज्ञानामुळेच झाली,हे सर्वमान्य म्हणून स्विकार्य आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करताना सर्वप्रथम ‘छद्म विज्ञान’ पासून सदैव सावध राहायला हवे.उदा- वास्तुशास्त्र,ज्योतिषशास्त्र.या शास्त्रांचे महत्व सांगताना बऱ्याचवेळा विज्ञानाचे कारण सांगून स्पष्टीकरण दिले जाते.जे पूर्णपणे चुकीचे आहे.त्या गोष्टी विज्ञानाच्या आधारेच तशा आहेत का? हे वैज्ञानिक दृष्टिकोणावरून ठरवावे.

आत्मा,परमात्मा,प्रारब्ध,संचित,नशीब,मोक्ष हे वैज्ञानिक दृष्टिकोन नाकारते. आपल्या जीवनात आज वर्तमानात जे काही आहे, ते पूर्वजन्मातील संचित आहे.हे स्पष्टपणे चुकीचेच आहे.

धर्मशिवाय माणसाच्या विवेकातून नीती निर्माण होऊ शकते,हे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगते.

विज्ञानाला आज सर्वच गोष्टींची कारणे माहीत नाहीत,पण वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे ती समजू शकतात.

वैज्ञानिक दृष्टिकोन- ‘मी सांगतो हे अंतिम सत्य आहे!’ ,हे कधीच सांगत /मानत नाही.

आता, मी वैज्ञानिक दृष्टिकोणातील एक महत्वपूर्ण बाब आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.वैज्ञानिक दृष्टिकोन म्हटले की बऱ्याच जणांना वाटते की याचा संबंध केवळ विज्ञान-तंत्रज्ञान या विष्यवस्तूशीच निगडित असावा.अर्थात आहे! परंतु,केवळ वैज्ञानिकच वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवतात असे नव्हे! संशोधन हे इतिहास,भूगर्भशास्त्र ,मानसशास्त्र,भूगोल,गणित,एव्हाना भाषा विषयांचे व्याकरण यात होत नसेल असे वाटते का? ( या उल्लेखित विषयात वैज्ञानिक दृष्टिकोणामुळेच संशोधन होऊ शकले,व त्या विषयांना एक आयाम प्राप्त झाले.) तर्कशास्त्रात पण वैज्ञानिक दृष्टिकोन हा ठेवावाच लागतो.तत्वज्ञानी असाच तत्वज्ञान मांडत नसतो.त्यामागेही वैज्ञानिक दृष्टिकोन हा असतोच.मुळात वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या ज्या उपरोक्त पायऱ्या सांगितल्या हे ज्या-ज्या विषयांना लागू होतात,तिथे वैज्ञानिक दृष्टिकोन हा वास करतच असतो.त्यामुळे मराठी किंवा इतिहास शिकवणाऱ्या गुरुजींना असे वाटू नाही की,’मी माझ्या विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण करू ?’ आपापल्या विषयांच्या शाखा असतात,त्या-त्या विषयानुरूप संदर्भ आणि सिद्धांत असतात,जे कुठलाही वैज्ञानिक दृष्टिकोन नाकारू शकत नाही.आता हे अचूक ओळखणे ही त्या शिक्षकाची कलाच! कला,म्हणण्यापेक्षा शिक्षकाने हा दृष्टिकोन कितपत समजून घेऊन आत्मसात केला हे महत्वाचे.

आपले विद्यार्थी व पाल्ये यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी, काही गोष्टी शिक्षक म्हणून आपल्याला जाणीवपूर्वक कराव्या लागतील.त्याचे विवरण असे-

विद्यार्थ्यांना निरीक्षण करायची सवय लावणे,त्यासाठी छोटेखानी प्रयोग त्यांच्यापुढे सादर करणे.

विद्यार्थ्यांना स्वतः आपल्या मार्गदर्शनाखाली प्रयोग करण्यास प्रवृत्त करणे.काही सोपे प्रयोग व ज्यात विद्यार्थ्यांना कुठलीही हानी होणार नाही असे प्रयोग त्यांना त्यांच्या घरी करावयास लावणे.

निसर्ग सहली,वारसा स्थळांना भेटी (ऐतिहासिक वास्तू),आठवडी बाजारातील भटकंती आयोजन करणे.ज्यातून त्यांच्या निरीक्षणाला उत्तेजन मिळेल.

एखाद्या बाबीची पर्यायी बाब ते करू शकतात का? यासाठी त्यांच्यासमोर तसा प्रसंग उभा करून त्यांना विचारशील बनवणे.

शेतीकामे,घरकामे,त्यांचे वडील छोटे व्यावसायिक,कारागीर असतील तर त्यांना ( विद्यार्थ्यांना) जमेल तसे सहकार्य करण्यास सांगणे.ज्यामुळे त्यांना व्यवसायातील बारकावे लक्षात येतील.

बोलणाऱ्या वक्त्यांची भाषणे,संगीत ऐकावयास प्रवृत्त करणे.ज्यामुळे भाषा विषयातील आरोह-अवरोह याचा अभ्यास होऊन त्यांच्या भाषनशैलीत सुधारणा करू शकतील.संगीतातून सूर,ताल,लय समजू शकतील.नंतर त्यांच्यातील कलेविषयीची अभिरुची लक्ष्यात येईल.

चित्रकार चित्रं काढताना प्रत्यक्ष पाहणे हे महत्वाचे, ज्यामुळे रंगसंगती कळेल,चित्रातील उभार ध्यानात येईल.त्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन शाळा स्तरावर करता येईल.

एखादी गणिती क्रिया सोडवताना त्याच-त्याच पारंपरिक पद्धतीने गणित सोडवण्यापेक्षा विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या पद्धतीने गणित सोडवू शकतात का,यासाठी त्यांना संधी देणे.काही विद्यार्थी असे हरहुन्नरी असतात.पण,पाठ्यक्रम संपवण्याच्या नादात त्यांच्या सृजनशील कल्पनेकडे आपण ध्यानच देत नाही.

शाळेमध्ये आठवड्यात एकदातरी प्रत्येक विषय शिक्षकांनी नवोपक्रमाचे आयोजन हे करावेच! विद्यार्थ्यांना यामुळे नवनिर्मितीचा आनंद मिळेल.

महिन्यात एकदातरी शिक्षकाने एखाद्या व्यावसायिकाला भेट देण्यासाठी सम्पूर्ण वर्गाला त्या स्थळी घेऊन जाऊन,व्यावसायिकांकडून माहिती घेऊन विद्यार्थ्यांना सांगावी.व्यावसायिक म्हटले की त्यात वेगवेगळे कारागीर हे आलेच.

भूगर्भातील हालचाली स्पष्ट करण्यासाठी त्यानुरूप प्रात्यक्षिकांचे आयोजन हे शाळास्तरावर सातत्याने करत राहावे.तसे 3 -डी विडिओ च्या माध्यमातून त्या संकल्पना स्पष्ट करून घ्याव्यात.

इतिहास संशोधक,वैज्ञानिक,गणितज्ञ यांसारख्या व्यक्तिमत्वाची चरित्रे वाचण्यास द्यावीत.ज्यामुळे विद्यार्थी प्रेरणा घेऊ शकतील.

यु ट्यूब वर बरीच अशी चॅनेल्स आहेत जे नवनिर्मिती शिकवतात.जे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना पहावयास लावणे.समजण्यास क्लिष्ट बाबी लगेच स्पष्टीकरण देऊन स्पष्ट कराव्यात.

विद्यार्थ्यांना गाईड मधून रेडिमेड उत्तरे सर्व्ह न करता,पुस्तकातील संदर्भाचा मुद्देसूद अभ्यास करून स्वतः प्रश्नांची उत्तरे तयार करण्यास सक्षम बनवावे.यातच खरी नवनिर्मिती आहे.

विद्यार्थ्यांमधील कुठलीही कला किंवा त्याची विलक्षण रुची ( मग ती कुठल्याही विषयात असो) याकडे कधीच दुर्लक्ष करू नका.त्यांना नेहमी गुरुजींचा भरसक आधार वाटला पाहिजे.त्यांच्यामागे खंबीरपणे उभे रहा.

शिक्षणातून नवनिर्मितीचा उद्देश असावा,ना की पोपटपंची करणारे पोपट!

आनंदासाठी शिक्षण ज्यावेळेस विद्यार्थ्यांसहित सर्व व्यवस्थेला वाटेल,तेव्हा कुठे वैज्ञानिक दृष्टिकोणाचा पाया घातला जाईल.

शिक्षण तथा अध्यापण हे वास्तवतेकडे कलणारे असावे,ना की भूतकाळात रमणारे.

महत्वाचे हे आहे की,आपण कसे व कोणत्या आधारावर शिकवतो,ना की दिलेला पाठ्यक्रम रट्टा मारून शिकवतो.

अध्ययन-अध्यापना हे दूतर्फी व्हावे.ज्यात विद्यार्थी केंद्र असून शिक्षक व विद्यार्थ्यांत आंतरक्रिया व्हायलाच पाहिजे.

विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे ही त्यांना मिळायलाच हवीत.मग,तुम्हाला माहीत नसेल तर पुस्तक वाचा,तज्ञांशी बोला,संदर्भ ग्रंथ पहा,वाट्टेल ते करा! पण अडचणींचे समाधान हे व्हायलाच पाहिजे. नाहीतर वैज्ञानिक दृष्टीकोनाची सुरुवात होण्यापूर्वीच अंत व्हायचा.

सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल याची शिक्षक,मार्गदर्शक,समन्वयक म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागेल.आपल्याला सर्व समाज परिपूर्ण व सुधारित करायचा आहे,ना की वर्गविशिष्ठ समुदाय.

शासनाचे पण एक काम आहे,नवोदित उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे.वेळप्रसंगी त्यांना शिष्यवृत्ती बहाल करणे.

● समारोप-

‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ निर्माण होण्यासाठी अगोदर तसा ‘दृष्टीकोन’ असावा लागतो.’दृष्टीकोन’या शब्दातच ‘दृष्टी’आणि ‘कोन’ हे शब्द समाविष्ट आहेत.त्यासाठी दृष्टी आणि ती पण एका विशिष्ट हेतूने उद्दिष्ट ठेवून असावी लागते.त्याचबरोबर एका खोलीचा कोपरा हा कोपराच असतो.पण,जेव्हा आपण तो कोपरा गणिती भाषेत घेतो,तेव्हा त्याला अर्थ प्राप्त होऊन ‘कोन’ होतो.म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोनासाठी लक्षपूर्वक निरीक्षण करून उद्देशात्मक दृष्टी असेल तर वैज्ञानिकता म्हणता येईल.

पं.जवाहरलाल नेहरू यांनी लोकसभेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे, ” वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार व कृती करण्याची पद्धती आहे,सत्यशोधनाचा मार्ग आहे, जीवनाचे दिशादर्शन आणि व्यक्तीला जाणिवांचे स्वातंत्र्य वैज्ञानिक दृष्टीकोनानेच प्राप्त होते! “

सन 2018 पासून नरेंद्र दाभोळकर यांचा हौतात्म्य दिन 20 ऑगस्ट हा ‘वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून पाळाला जातो.यासाठी ‘ ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क ‘ व ‘ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ यांनी पुढाकार घेतला होता. वैज्ञानिक दृष्टी ज्यांमध्ये निर्माण झाली ते आमचे उत्तुंग भविष्य आणि जे सिडीच्या चढणीवर आहेत,त्यांचे स्वागतच!

नरेंद्र दाभोळकर यांनी म्हटल्याप्रमाणे ,” जेवढा पुरावा उपलब्ध,विश्वास हा तितकाच ठेवावा!”

शेवटी, एम.बी.बी.एस., एम.एस.इतके उच्चविद्याविभूषित शिक्षण घेऊन डॉक्टर होणारे, त्यांच्या दवाखान्याबाहेर जर काळी बाहुली,लिंबू व मिर्ची टांगून ठेवत असतील तर वैज्ञानिक दृष्टिकोन कुठल्या स्तरापर्यंत रुजला आहे आणि तो कुठे रुजायला हवा आहे? यावर चिंतन व समीक्षा करणे निश्चितच आजच्या घडीला अगत्याचे होईल.

‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ विषयाचा शेवट माझ्या स्वलिखित कवितेने करणे कसे विजोड वाटेल! पण माझी स्टाईलच ती आहे.म्हणून,

अथांग ज्ञानाचा सागर हा,

सरणार नाही,आजही नाही – उद्याही |

बदलावा लागेल दृष्टिकोन आपला,

ज्ञानाची कवाडे सदासर्वदा ,

आ वासून राहतील गडे ||

धन्यवाद!

✒️लेखक- अमोल चंद्रशेखर भारती(लेखक/ कवी / व्याख्याते, नांदेड)मो- 8806721206

(संदर्भ- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर,दूर शिक्षण केंद्र अंतर्गत- बी.ए. भाग – 1 ( वैज्ञानिक पद्धती )