सारी उमर हमे संग रहेना है….!!!

43

🔸शंभर वर्षांत एकही राखीपौर्णिमा चुकली नाही,शंभर राखीपौर्णिमा साजरी करणारे भावंडे

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.22ऑगस्ट):-एक हजारों में मेरी बहना है
सारी उमर हम संग रहना है..हे गाणे कित्येक वेळा आपण पाहिले आहे.लहानपणी अनेक भाऊ – बहीण हे उत्साहात राखीपोर्णिमा साजरी करतात.मात्र,बहिणीचे लग्न झाल्यावर प्रत्येक राखीपौर्णिमला बहीण – भावांची भेट होतेच असे नाही आणि बऱ्याच भावंडामध्ये राखी बांधण्याच्या कार्यक्रमात खंड पडतो.मात्र,गेल्या १०० वर्षांपासून आपल्या लाडक्या भावाला राखी बांधणारी आणि उत्साहाने तिच्याकडून राखी बांधून घेणारे बहीण – भाऊ आष्टी तालुक्यातील आनंदवाडी सारख्या खेड्यातील आहेत.

येथील १०१ वर्षाचे भगवान दशरथ बोडखे यांना राखी बांधण्यासाठी त्यांची रुईनालकोल येथील बहीण छबुबाई माणिकराव धोंडे ही आजही तितक्याच उत्साहाने आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथून आली आणि भावाच्या हातावर राखी बांधताना राखीपौर्णिमेचे शतक या भावंडांनी साजरे केले.भगवान बोडखे यांच्या जन्मानंतर सहा वर्षांच्या असलेल्या छबुबाईनी अगदी त्या पहिल्या वर्षापासून भगवान बोडखे यांच्या चिमुकल्या हातात राखी बांधापला सुरवात केली.

पुढे छबुबाईचा विवाह माजी आ.भीमसेन धोंडे यांचे चुलते माणिकराव धोंडे यांच्याशी झाला मात्र आष्टी तालुक्यातीलच रुईनालकोल हे त्यांचे सासर असल्याने दर राखीपौर्णिमेला छबुबाई धोंडे या माहेरी येतात त्यांना अगदीच शक्य झाले नाही त्यावेळी भगवान बोडखे हेच बहिणीच्या सासरी जायचे मात्र त्यांची राखीपौर्णिमा मात्र अखंडपणे एकत्रित साजरी होत राहिली.भगवान बोडखे यांनी आता वयाची शंभरी पार केल्यावरही दोघांमधील प्रेम तसूभरही कमी झाले नाही आणि राखीपोर्णिच्या सणात खंड पडला नाही.त्यामुळे त्यांची आजची शतकीपार राखीपौर्णिमा हा आष्टी तालुक्यात कुतूहलाचा विषय ठरला आहे.