चिमुकल्या ‘नाती’ च्या ‘पाचवी’ ला दारात ‘सफारी’ !

27

🔸मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव : पंकजाताईं कडून अभिनंदन अन् शुभेच्छा

🔹राष्ट्रसंत भगवान बाबांच्या विचारांची फलश्रुति : स्त्री-पुरुष समानतेचा ‘संदेश’ !

✒️विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

बीड(दि.23ऑगस्ट):-जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती जगाला उद्धारी!’ अशी एक प्राचीन म्हण प्रचलित आहे.किंबहूना समाज व्यवस्थेची उत्तम,योग्य जडणघडण होण्यासाठी स्त्री-पुरुष समानता हा नैसर्गिक न्याय आहे.नैसर्गिक रित्या १०० मुले आणि ९८ मुली असा जन्मदर आहे.त्यामुळे स्त्री-पुरुष समानतेची मूल्ये जतन करण्यासाठी कन्येच्या जन्माचा ही उत्सव झाला पाहिजे… या भूमिकेतून बीड येथील सह्रदयी कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केलाच,पण तिच्या ‘पाचवी’ ला चक्क दारात ‘सफारी’ गाडी उभी केली! दरम्यान,या सुखद घटनेची नोंद घेत लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्याकडून खास अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या.

थोर राष्ट्रीय संत भगवान बाबांच्या पवित्र जन्म पुण्यस्थळातील अत्यंत निकटवर्तीय तरुण,युवक,सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर संदेश सानप हे सावरगाव घाट येथील रहिवासी आहेत.वडील आणि चुलते यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने ते बीड येथे राहतात.स्वतः इंजिनियर संदेश सानप हे संत भगवान बाबांच्या विचार आणि कार्याचे पाईक असून त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात दरम्यान,नुकतेच त्यांना कन्यारत्न झाले.मुलगा आणि मुलगी समान मानणाऱ्या या संत भगवान बाबांच्या विचारधारेने प्रेरित झालेल्या सानप कुटुंबीयांनी आपल्या चिमुकलीच्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर थेट टाटा सफारी बुक केली.

परंतु गाडी भेटणे अशक्य असल्याचे पाहून त्यांनी अधिकाऱ्यांशी आग्रह धरला,व विनंती केली.संबंधित अधिकाऱ्यांनीही या चिमुकलीच्या जन्माच्या आनंद उत्सवात सहभागी होण्याची संधी सोडली नाही.त्यांनी तात्काळ ‘पाचवी’ लाच गाडी उपलब्ध करून दिली.सामाजिक बांधिलकीचा नवा अध्याय प्रारंभीत असताना या चिमुकल्या नातीच्या शुभ हस्ते टाटा सफारी गाडीचे पूजन करण्यात आले.स्त्री-पुरुष समानता अर्थात मुलगा- मुलगी समान या पवित्र नात्याला नवी झळाळी निर्माण करून देणाऱ्या सानप परिवाराच्या या सत्कार्याला भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी आवर्जून अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.यावेळी चिमुकलीचे पिताश्री संदेश सानप,आजोबा सुदामराव सानप,प्राचार्य डॉ.वसंतराव सानप आदी उपस्थित होते.