एक प्रेरणादायी विदर्भीय कन्या कु. आर्या पंकज टाकोणे

35

मुलांचे पाय पाळण्यात दिसतात,’ असं म्हटल्या जाते. याचा अर्थ काय? तर त्यांच्या हावभाव व हालचालींवरून असा भावी अंदाज बांधला जातो की, ते भविष्यात काय अचिव्ह करू शकतात? काय घडवू शकतात? वगैरे…तसेच लहान मुलांमध्ये एक जिद्द असते काही तरी करण्याची किंवा करून दाखवण्याची…याच जिद्दीच्या बळावर ‘मुलांचे पाय पाळण्यात दिसतात’ या लोकोक्तीला सत्यात उतरवून दाखवित वयाच्या तिस-याच वर्षी यशाला गवसणी घातली…पुलगावच्या मातीत रुजलेली, विदर्भातील वर्धा जिल्ह्याची कन्या कु.आर्या पंकज टाकोणे हिने एशिया बुक ऑफ रेकाॅर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये आपल्या नावाची नोंद करत विदर्भासह आपला जिल्हा व जन्मगावचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण अक्षरामध्ये कोरले आहे.

शाळेचा उंबरठा अजूनही न ओलांडणा-या आर्याने आई-वडीलांच्या ममतेच्या छायेत नुकतीच वाढत असतांना व संस्काराचे धडे गिरवत असतांना, पोलीस विभागात कार्यरत असलेल्या आपल्या वडीलांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून, त्यांच्या पाऊलांवर पाऊल टाकत वयाच्या अवघ्या तिस-या वर्षीच आपल्या नावाची नोंद करत तिने हा यशाचा गड सर केला आहे.तिच्या या यशाबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात आपली स्वप्ने रंगवणा-या तरुणाईने नक्कीच तिच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी.
अवघ्या तीन वर्षाच्या आर्या टाकोणे हिने सहा मिनिटांत एक हजार मिटरचे अंतर धावून इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये आपले नाव नोंदविले आहे.वर्ध्यातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सेंट अँन्थोनी इंटरनॅशनल स्कुलपर्यंतचं एक हजार मीटरचे अंतर निर्धारीत करण्यात आले होते.

तिच्या वयोगटात इंडिया बुक ऑफ रेकाॅर्डसाठी एक हजार मीटर अंतर धावण्यास आठ मिनिटे, तर एशिया बुक ऑफ रेकाॅर्डसाठी सात मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. पण आर्याने हे अंतर कमी वेळात म्हणजे केवळ सहा मिनिटांत पूर्ण करून रेकाॅर्डवर आपले नाव कोरले आहे. मागिल दीड वर्षापासून आर्याची तयारी सुरू आहे. पुढे आलिम्पिकमध्ये आपल्याला धावायचे असल्याचे आर्याने आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे.शाळेत अजूनही पाऊल पडलेले नसताना आर्या ही ट्रॅककडे वळली आहे. पुलगावात ट्रॅक नसल्यामुळे शहरालगतचा मातीचा कॅनल रस्ता तिचा ट्रॅक बनला आहे. काही दिवसांपूर्वी तर शहरवासीयांसमोर धावत असतांना पाच मिनिट पन्नास सेकंदातच एक हजार मीटरचे अंतर कापण्यात यश मिळविले होते. यापूर्वी एशिया वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये चीनमधील तीन वर्षीय बालकाने आठ मिनिटांत हे रेकाॅर्ड आपल्या नावे केले होते. परंतु आर्याने हे रेकाॅर्ड मोडीत काढीत चीनलाही नमविले आहे.

इतिहासाची पुन्हा पुन:रावृत्ती झाली आहे. फ्लाईंग सिख मिल्खाने पाकिस्तानीला मागे टाकले. आता फ्लाईंग क्विन आर्याने चीनला मागे टाकले आहे. आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे की, मिल्खा सिंगचा देहांत झाल्याच्या काही वेळातच आर्याचा विश्वरेकाॅर्ड बनला आहे.या छोट्याशा आर्याच्या अद्भूत कार्याने प्रभावित होऊन भारावून गेलेल्या व संपूर्ण जगात अनाथांची माई या नावाने नावलौकिकास असलेल्या जगप्रसिध्द डाॅ.सिंधुताई सपकाळ यांनी स्वगृही बोलावून आर्याचा सत्कार केला व आशीर्वाद दिला. संपूर्ण जगात वर्धा जिल्ह्याचे नाव उंचावणा-या दोन दैविशक्ती अनाथांची माई डाॅ.सिंधुताई सपकाळ आणि विश्वविक्रमी कु.आर्या टाकोणे यांच्या मनोमिलनाने संपूर्ण परिसर हर्षोल्हासित झाला. सिंधुताईच्या या भेटीने साक्षात देवाचेच दर्शन झाल्याचा सर्वांना अनुभूती झाली.सरतेशेवटी आर्याला भावी वाटचालीच्या आशीर्वादासह अगणित हार्दिक शुभेच्छा..!

✒️शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे(कमळवेल्ली, यवतमाळ)भ्रमणध्वनी:-7057185479