दंडारीतून समाज प्रबोधक जिल्हा गडचिरोली!

46

(गडचिरोली जिल्हा निर्माण दिन)

गडचिरोली जिल्हा हा दि.२६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली व सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील जुने तालुके होत. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा जंगलव्याप्त असून नक्षलग्रस्त आहे. तो जवळपास ७६ टक्के जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्षल समर्थक लोक आश्रय घेतात. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनानंतर गडचिरोली भागातील ५ आणि सिरोंचा भागातील ३ तालुके असे मिळून ८ तालुक्यांसह गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली होती. पुढे इ.स.१९९२ला प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आणखी चार तालुक्यांची निर्मिती करण्यात आली. सदर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,४१४ चौ.किमी इतके आहे.

त्यात १) अहेरी, २) आरमोरी, ३) एटापल्ली, ४) कुरखेडा, ५) कोरची, ६) गडचिरोली, ७) चामोर्शी, ८) देसाईगंज-वडसा, ९) धानोरा, १०) भामरागड, ११) मुलचेरा, १२) सिरोंचा या तालुक्यांचा समावेश आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात मोडतो.

लोकजीवन : जिल्ह्यात अनु.जमाती अर्थात आदिवासी जमातींच्या लोकांची संख्या ३,७१,६९६ एवढी असून त्यांचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक आहे. त्याची टक्केवारी ३८.३० एवढी भरते. इतकी मोठी लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची असल्याने हा जिल्हा महाराष्ट्रातला आदिवासी जिल्हा समजला जातो. या जमातीमध्ये मुख्यत्वे गोंड, कोलाम, माडिया, परधान, हलबा इत्यादी जमातीचे लोक आहेत. त्यांच्या बोलीभाषा गोंडी, माडिया, हलबी आदी आहेत. जिल्ह्यात यांशिवाय मराठी, हिंदी, तेलगू, बंगाली व छत्तीसगडी इत्यादी भाषा बोलल्या जातात. जिल्ह्यातील आदिवासीची विशिष्ट अशी संस्कृती आहे. येथील आदिवासी बांधवांचे ‘पेरसा पेन’ हे दैवत आहे. ते शुभकार्याप्रसंगी किंवा पिकांचे उत्पादन झाल्यावर ‘रेला’ नृत्य करून आनंद व्यक्त करतात. ढोल हे त्यांचे आवडीचे वाद्य आहे. होळी, दसरा व दिवाळी हे त्यांचे मुख्य सण आहेत. ही जमात मुख्यतः येथील घनदाट जंगलात वास्तव्य करून आहे. जिल्ह्यातील इतर जातीतील बांधव बैलपोळा, गणपती, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, होळी आदी सण साजरे करतात.

काही भागात या झाडीपट्टीतील प्रसिद्ध दंडार, नाटक, नक्कल, तमाशा इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम दिवाळी ते होळी या कालावधीत होतात. यामुळे झाडीपट्टी नाटकासाठी वडसा हे तालुक्याचे ठिकाण प्रसिद्ध आहे. त्यांचे सणांव्यतिरीक्त मंडई, जत्रा, बैलांचे शंकरपट या निमित्तानेही आयोजन होते. झाडीपट्टी रंगभूमी ही आपले वेगळेपण जपत कार्यशील आहे. या रंगभूमीने हजारो कलावंत घडवले आहेत. या झाडीपट्टी प्रदेशात जवळपास पन्नास नाट्यमंडळे असून, येथे दोनशेहून अधिक नाटकांचे लिखाण झाले आहे. शंभराहून अधिक नाट्यलेखक आपल्या लेखणीद्वारे नाट्यलेखन करीत आहेत.

इतिहास: फार प्राचीन काळी या प्रदेशावर आधी राष्ट्कूट यांचे त्यानंतर चालुक्य वंशाचे व नंतर देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. त्यानंतर गोंड राजांनी राज्य केले. तेराव्या शतकात खंडक्या बल्लाळशाह यांनी चंद्रपूरची स्थापना केली. त्यांनी आपली राजधानी सिरपूर वरून चंद्रपूर येथे हलविली. याच काळात चंद्रपूर प्रदेश हा मराठ्याच्या सत्तेखाली आला होता. सन १८५३मध्ये बेरार हा चंद्रपूर- पूर्वीचा चांदा या प्रदेशाचा भाग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. एक वर्षाने तो बेरार या प्रदेशातील स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. ब्रिटिशांनी सन १९०५मध्ये चंद्रपूर व ब्रह्मपुरीमधील जमीनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तालुक्याची निर्मिती केली. राज्याची पुनर्रचना होण्यापूर्वी हा भाग इ.स.१९५६पर्यंत केंद्रीय अधिपत्याखाली होता. त्यानंतर राज्य पुनर्रचनेनुसार चंद्रपूरला बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले.

इ.स.१९६०मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यांत चंद्रपूर हा जिल्हा समाविष्ट झाला. सन १९८२मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र गडचिरोली जिल्हा हा त्यावेळी भारताचा ५५६वा जिल्हा अस्तित्वात आला. वैनगंगा नदीला सीमारेषा मानून चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.
झाडीपट्टी रंगभूमीचे सामाजिक योगदान: कला आणि समाज या दृष्टीने झाडीपट्टी रंगभूमीचे सामाजिक महत्त्व फार आहे. नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबर सामाजिक प्रबोधन साधण्याचे काम होत आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले जात आहे. अनेकांना रोजगारही उपलब्ध झाले आहे. नोकरीच्या निमित्ताने बाहेर असलेल्या लोकांना नाटकांच्या निमित्ताने गावाची ओढ लागते. त्यांची मातीशी नाळ कायम जुळवून ठेवण्याचे काम झाडीपट्टी रंगभूमीच्या माध्यमातून होत आहे.

गावात पाहुणे येत असल्याने अनेक उपवर मुला-मुलींचे विवाह जुळवून आणण्याचा योग या निमित्ताने साधला जातो. झाडीपट्टी रंगभूमीने आपले वेगळे पण जपत प्रादेशिक भान ठेवून जागतिकीकरणातही आपले स्थान अबाधित ठेवले आहे. झाडीपट्टी रंगभूमी ही महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण अशी रंगभूमी आहे. या रंगभूमीने समग्र भारतीय रंगभूमीला सशक्त कलावंत दिलेले आहेत.भारतीय रंगभूमी समृद्ध करण्यात तिचे योगदान हे अनमोल आहे. या रंगभूमीवर संशोधन होणे ही काळाची गरज आहे.व्यवसाय: हा जिल्हा बांबू व तेंदूपानांकरिता प्रसिद्ध आहे. भात हे येथील मुख्य पीक आहे. याव्यतिरिक्त तूर, गहू, ज्वारी, सोयाबीन, जवस इत्यादी कृषी उत्पादने घेतली जातात. येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. चामोर्शी तालुक्यामध्ये आष्टी येथे पेपर मिलचा कारखाना असून इतर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. यामुळे जिल्हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. भाताचे उत्पादन जास्त होत असल्याने भात गिरण्यांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात कोसाचे उत्पादन होत असून कोसा उत्पादन केंद्र आरमोरी येथे आहे. जिल्ह्यात फक्त १८.५ किमी.लांबीचा रेल्वे मार्ग असून देसाईगंज येथेच रेल्वेचे स्टेशन आहे.

सुगीच्या हंगामात दिवाळीनंतर शेतातील पीक हाती आले की देसाईगंज (वडसा) येथील नाटकांना प्रारंभ होतो. झाडीपट्टी रंगभूमीवर लोककथा, लोकगीते, दशावतार, लळीत, खडीगंमत, दंडार, दंडीगान, गोंधळ, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, कीर्तनेे, भारुड, वासुदेव, तमाशे, वग, विविध नृत्यप्रकार असून, चित्र-शिल्प यासारख्या अनेक लोककलांच्या माध्यमातून लोकरंजनाचे कार्य सुरू असते. लोककलांच्या माध्यमातून झाडीपट्टी रंगभूमीवर सतत विविध प्रकारचे महोत्सव होत असतात. नाटकाचे मूळ भगीसोंग, दंडार, राधा, दंडीगान, खडीगंमत, डाहाका, कथासार गोंधळ, बैठकीचे पोवाडे यांतूनच आढळून येते. लोककलांमधूनच नाटकाची उत्क्रांती झाली आहे, असे म्हणता येईल. झाडीपट्टीत पूर्वीपासून दंडार आणि विविध लोककला सादर होत असत, असा उल्लेखही आढळतो.
प्रेक्षणीय स्थळे: मार्कंडा, चपराळा, आलापल्ली, वैरागड. हेमलकसा, कामलापूर ही मुख्य प्रेक्षणीय स्थळे आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील मार्कंडाचे ऐतिहासिक शिवमंदिर व चप्राळा येथील हनुमान मंदिर ही प्रसिद्ध मंदिरे आहेत. कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथून १० किलोमीटर अंतरावर खोब्रामेंढा देवस्थान असून तेथे खूप मोठी मारुतीची मूर्ती आहे. महाशिवरात्रीला तेथे जत्रा भरतात. मार्कंडा देवस्थान तर ‘विदर्भाची काशी’ म्हणून सुप्रसिद्ध आहे. मी येथे जन्माला आलो, त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो!

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे समस्त जिल्हावासियांना ३८व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलक व शब्दयोजक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे,गुरुजी.मु. पो. ता. जि. गडचिरोली(मो:- ७४१४९८३३३९)