बेस्ट टर्निंग पॉइण्ट : भारताची जगभर कीर्ती!

30

[मेजर ध्यानचंद जयंती: राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष]

आजचा दि.२९ ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिन होय. हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद सिंग यांचा गौरव हा दिवस ‘राष्ट्रीय क्रीडादिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण केले जातात. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवनगौरव पुरस्कार म्हणून २००२पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. आपल्या कारकिर्दीत खेळात असामान्य कर्तृत्व दाखविणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणाऱ्या क्रीडापटूला ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्यांचे मोठे भाऊ रूपसिंग हेसुद्धा हॉकीचे खेळाडू होते. त्यांचे वडिल सामेश्वर दत्त सिंग हेही ब्रिटीश सैन्यात असून हाॅकी खेळत होते. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले होते.

उत्तरप्रदेशातील अलाहाबाद येथे दि.२९ ऑगस्ट १९०५ रोजी मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सोमेश्वर दत्त सिंग हे आर्मीमध्ये असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत. वडिलांच्या निवृत्तीनंतर इ.स.१९२२ साली वयाच्या १६व्या वर्षी ते स्वतः आर्मीत दाखल झाले. त्यावेळी ते आर्मीच्या रेजिमेंटमध्ये होणाऱ्या हॉकी सामन्यात खेळताना त्यांचे हॉकीतील कौशल्य पाहून मेजर बाले तिवारी यांनी त्यांना हॉकीमधील बारकावे शिकवले. ते त्यांचे हॉकीमधील गुरु होते. पुढे मेजर ध्यानचंद हे हॉकीमध्ये इतके रमले की हॉकी म्हणजे त्यांचा जीव की प्राण ठरला. त्यांनी सन १९२२ ते १९२६ या कालावधीत रेजिमेंटच्या विविध स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखवले. हॉकीतील त्यांच्या कर्तृत्वामुळे न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या इंडियन आर्मीच्या संघात त्यांची निवड झाली, तो दौराही त्यांनी गाजवला. या दौऱ्यात त्यांनी आपल्या संघाला १८ विजय मिळवून दिले होते. त्यातील दोन लढती बरोबरीत सुटल्या तर फक्त एका लढतीत पराभव स्वीकारला. हा दौरा त्यांच्यासाठी ‘बेस्ट टर्निंग पॉईण्ट’ ठरला. या दौऱ्याने त्यांना जगभर कीर्ती मिळवून दिली. त्यानंतर त्यांना लान्स नायक म्हणून बढती मिळाली.

केवळ भारतच नाही तर जगातील अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्या खेळाच्या प्रेमात पडले. ध्यानचंद यांचे हॉकी खेळण्याचे कौशल्य अफलातून होते. चेंडूवरील ‘जादूई नियंत्रण’ ही त्यांची खासियत होती. चेंडू त्यांच्या ताब्यात असताना ‘सद्या मैदानावर कोणीही खेळत नाही’ असेच वाटायचे. चेंडू त्यांच्या स्टिक जवळून हलतच नसे, म्हणून त्यांच्या स्टिकमध्ये चुंबक बसवला आहे, अशी अफवा तेंव्हा पसरवली जात होती.हॉकी हा सांघिक खेळ, तो संघभावनेनेच खेळला पाहिजे, असे त्यांचे मत होते. म्हणूनच चेंडूवर अफलातून नियंत्रण असूनही ते आपल्या सहकाऱ्यांना अचूक पास देत असत. हॉकीतील त्यांच्या या कौशल्यामुळेच त्यांना ‘हॉकीतील जादुगार’ असे म्हटले जात होते. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या जादुई खेळाने देशाला सन १९२८मध्ये अँमस्टरडॅम, सन १९३२ साली लॉस अँजिलीस आणि सन १९३६मध्ये बर्लिन अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमधील हॉकीच्या खेळात भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. इ.स.१९३६मधील भारत व जर्मनी यांच्यातील ऑलिम्पिकच्या अंतिम लढतीत त्यांच्या हॉकीतील कौशल्याने जर्मनीचा हुकूमशहा एडॉल्फ हिटलर यांनाही वेड लावले होते.

त्यांच्या या असामान्य कौशल्याने भारावलेल्या हिटलर यांनी त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचीही ऑफर दिली होती. मात्र देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली होती.लॉस अँजिलीसमध्ये खेळलेल्या भारतीय संघाचे वर्णन एका अमेरिकन पत्रकाराने ‘पूर्वेकडील वादळ’ असे केले होते. ध्यानचंद हे सन १९५६मध्ये निवृत्त झाले, त्याचवर्षी भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन गौरवले. निवृत्तीनंतर पटियाला येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेत मुख्य प्रशिक्षक राहून त्यांनी तरुण खेळाडूंना प्रशिक्षित केले. वयाच्या अवघ्या ७४व्या वर्षी त्यांनी क्रीडाजगताला पोरके करून दि.३ डिसेंबर १९७९ रोजी जगाचा निरोप घेतला. भारताला सुवर्णयुगाची अनुभूती देणाऱ्या या महान हॉकीच्या जादूगाराला मरणोत्तर भारतरत्न गौरवाने सन्मानित करावे, अशीच समस्त भारतीय क्रीडा रसिकांची इच्छा आहे आणि ती यथोचितच!

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे आजच्या क्रीडादिनी मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी(भारताच्या गौरवशाली इतिहासाचे गाढे अभ्यासक व मराठी साहित्यिक.)मु. एकताचौक, रामनगर, गडचिरोली.जि. गडचिरोली (४४२६०५)व्हा. नं. ९४२३७१४८८३.