ब्राम्हणांचे दलाल नारायण राणेंसाठी कुणबी बांधवांचे अश्रू कशासाठी?

30

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गोळवली संगमेश्‍वर येथे अटक झाल्याने कुणबी समाजात स्वत:ला विचारवंत म्हणवणार्‍या लोकांनी (मी त्यांचे नाव घेणार नाही) राणे यांच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट केल्या. पोलीसांनी त्यांच्या अटकेची केलेली कारवाई कशी चुकीची होती अशाप्रकारे पोलीसांवर आगपाखड करणार्‍या पोस्ट होत्या. पोलीस बरोबर आहेत किंवा नाहीत हा मुद्दा न्यायालयासमोर येईल. परंतु नारायण राणे यांनी नियंत्रित सत्ता प्रकारच्या जमिनी, बेदखल कुळांचा प्रश्‍न, श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ आदी प्रश्‍न त्यांनी स्वकर्तृत्वावर मार्गी लावले आहेत. त्यामुळे कुणबी बहुजन समाजात त्यांना खूप मोठे मानाचे स्थान आहे अशा प्रकारे पोस्टमध्ये जो ढोल बडवण्यात आला त्याची कीव येते. नारायण राणे यांचे कुणबी बांधवांसाठी काय योगदान आहे? असा माझा सवाल आहे.

नारायण राणे यांना गोळवली संगमेश्‍वर येथून पोलीसांनी अटक केली. बघा कशी क्रोनोलॉजी आहे ती. गोळवली हे गाव कुणाचे आहे. आरएसएसचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवळकर यांचे ते गाव आहे. म्हणजे राणे आज गोळवळकरी षड्यंत्रकारी विचारांचे वाहक आहेत. ते भाजपमध्ये काम करताहेत याचा अर्थ तोच आहे. माधव गोळवळकर यांच्या वडीलांचा इतिहास कुणबी बांधवांना माहित आहे का? गोळवळकर हे गोळवली या गावावरून आडनाव ठेवण्यात आले आहे. त्यांचे मूळचे आडनाव पाध्ये आहे. याच माधव गोळवलकर यांच्या वडीलांनी कुणबी समाजातील एका महिलेवर बलात्कार केला होता. त्यावेळी कुणबी समाजातील लोकांनी माधव गोळवलकर यांच्या वडीलांची हत्या केली होती. त्या हत्येच्या आरोपातून कुणबी समाजातील लोकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी खटला लढवून निर्दोेष मुक्त केले होते.

आपल्या वडीलांच्या हत्येबाबत कुणीही वाच्यता करू नये म्हणून मूळचे पाध्ये आडनाव लपवून माधव गोळवलकर यांनी गोळवलकर या आडनावाने आपले घोडे दामटले. ते पुढे विदर्भात जाऊन आरएसएसचे दुसरे सरसंघचालक झाले. त्यांचा बंचिंग ऑफ थॉटस हा विचारधन नसून (कु) विचारधन आहे.
नारायण राणे यांनी नियंत्रित सत्ता प्रकारच्या जमिनी, बेदखल कुळांचा प्रश्‍न, श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ आदी प्रश्‍न त्यांनी स्वकर्तृत्वावर मार्गी लावले आहेत. त्यामुळे कुणबी बहुजन समाजात त्यांना खूप मोठे मानाचे स्थान आहे अशाप्रकारे पोस्ट करून कुणबी समाजाता स्वत:ला विचारवंत म्हणवणार्‍या लोकांच्या बुद्धीची कीव येते. नियंत्रित सत्ता प्रकार, बेदखल कुळांचा प्रश्‍न, खोती विरोधी बिलासाठी योगदान आहे ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे. कोकणात रायगड जिल्ह्यातील चरी येथे खोती विरोधी आंदोलन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले.

त्यावेळी नारायण नागू पाटील यांच्यासारख्या महान लोकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सहकार्य केले होते. या आंदोलनामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत खोती विरोधी बिल पास करून घेतले आणि ब्राम्हणांच्या खोती पद्धतीतून कुणबी बांधवांना मुक्त केले. एवढेच नव्हे तर आमचे कुणबी बांधव ज्यांचा दैवत म्हणून उल्लेख करतात त्या श्यामराव पेजे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत खोती विरोधी बिल आणले त्यावेळी विरोध केला होता. अर्थात श्यामराव पेेजे यांनी कॉंग्रेसच्या सांगण्यावरून तसे केले होते. म्हणजे त्यावेळी कुणबी बांधवांविरोधातच एक कुणबी असलेल्या पेजेंचा वापर करण्यात आला होता. तसाच वापर आज नारायण राणेंच्या रूपाने भाजपा करून घेत आहे. त्यावेळी पेजे यांनी ब्राम्हणांच्या कॉंग्रेसची दलाली केली होती आता नारायण राणे ब्राम्हणांच्या भाजपाची दलाली करत आहेत. आज खोतीच्या जमीनी कुणबी बांधवांच्या नावावर आहेत त्याचे सारे श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांना जाते. त्यामुळे नारायण राणे यांचे नियंत्रित सत्ता प्रकारच्या जमिनी, बेदखल कुळांचा प्रश्‍नाबाबत कुणबी बांधवांवर उपकार आहेत हे म्हणणे थोडे धाडसाचे होईल.

नारायण राणे हे केंद्रीय मंत्रीपदावर आहेत आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर आहेत. केंद्रीय मंत्रीपद काय अथवा राज्याचे मुख्यमंत्री पद काय, दोन्हीही घटनात्मक पदे आहेत. त्यामुळे त्या पदांचा सन्मान राखूनच बोलले पाहिजे. आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकदम खालच्या भाषेत बोलत आहोत हे कुठल्या संसदीय भाषेत बसते? आपल्या बोलण्या-वागण्यातून कुणाचाही अपमान होणार नाही अशाप्रकारे मंत्रीपदाची शपथ घेताना बोलत असता. मग येथे तर खुलेआम अपमान करण्यात आला. मग शपथ फक्त तोंडी लावण्यापुरती का? राणे यांनी अनेकदा मुख्यमंत्री ठाकरे यांचा खालच्या पातळीवर जाऊन अपमान केला आहे, त्यांची गेल्या काही दिवसातील वक्तव्ये तपासली तर लक्षात येईल. मी मुख्यमंत्री ठाकरे यांचा काही चाहता नाही अथवा शिवसैनिकही नाही. परंतु बोलताना ज्या काही मर्यादा पाळायला हव्यात हे कुणाच्याही लक्षात येईल, म्हणून त्यावर लिहले आहे. अर्थात राणे यांची भाषा शिवसेनेला शोभणारीच आहे. ज्या मुशीतून राणे यांची कारकीर्द घडली त्या शिवसेनेला अशीच टारगट लोकं हवी होती, त्यामध्ये राणे हे फिट्ट बसले होते. जो टारगटपणा त्यांनी शिवसेनेत केला तोच कॉंग्रेसमध्ये आणि आता भाजपामध्ये ते करत आहेत एवढाच काय तो फरक आहे. त्यामुळे आमच्या कुणबी बांधवांमधील विचारवंतांनी ब्राम्हणांचे दलाल असणार्‍या राणे यांच्यासाठी अश्रू का ढाळावेत असा माझा सवाल आहे.

✒️लेखक:-दिलीप बाईत(मंडणगड जिल्हा,रत्नागिरी)मो:-९२७०९६२६९८