ए.टी.एम मशीनमधे छेडछाड करून सुमारे ४ लाख ५४ हजार रुपये लंपास-आरोपी अटकेत

47

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.३सेप्टेंबर):-स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या हिंगणघाट तसेच समुद्रपुर तालुक्यातील तीन एटीएम मशीनमध्ये तांत्रीक छेडछाड करुन तब्बल ४ लाख ५४ हजार ५०० रुपये लंपास करणाऱ्या आरोपीस उत्तर प्रदेशातील मोहबा येथून अटक करण्यात वर्धा येथील पोलिसांच्या सायबर सेलला यश मिळाले आहे.दिनांक ३० ऑगस्ट रोजी स्थानिक स्टेट बँकेचे व्यवस्थापक विवेक सिंग नारायण सिंग रा. शास्त्री वार्ड हिंगणघाट यांनी अज्ञात दोन इसमांनी स्टेट बॅंकेच्या तीन ए.टी.एम मशीनमधे छेडछाड करून सुमारे ४ लाख ५४ हजार रुपये उडवून नेल्याची तक्रार हिंगणघाट पोलिसांत केली होती.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन हिंगणघाट पोलिसांनी य माहिती तंत्रज्ञान कायदयान्वये गुन्हा नेांद केला होता.सदर गुन्ह्याचा समांतर तपास वर्धा येथील सायबर सेलमार्फत करण्यात आला.सदर गुन्ह्यामध्ये संपूर्ण तांत्रिक माहिती शोधण्यात आली,पोलिसांना मिळालेल्या तांत्रिक माहितीचा सखोल तपास करून यातील आरोपी हे जिल्हा मोहबा राज्य उत्तर प्रदेश येथे असल्याचा पोलिसांनी छडा लावला. मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा तसेच सायबर सेल येथील पोलिस चमु उत्तर प्रदेशातील जिल्हास्थळी मोहबा येथे रवाना झाले.

दिनांक ०१ सप्टेंबर रोजी सदर चमु मोहबा येथे पोचून आरोपी नीरज नाथुराम निषाद(१९ ) तसेच एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले.सदर दोन्ही आरोपी बजरंग चौक, मोहबा, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून वर्धा पोलिसांनी त्या दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले, त्यांचेकडून ४० वेगवेगळ्या बँकेचे एटीएम, ७ मोबाईल व गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन स्विफ्ट डिझायर असा एकुण किमंत ५ लाख ९२ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपिचा हिंगणघाट पोलिसांनी पोलीस कस्टडी रिमांड घेतला असून आरोपींकडून वर्धा तसेच इतर जिल्ह्यातील असेच मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर,अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचे मार्गदर्शनानुसार सपोनि. महेंद्र इंगळे, पोउपनी. गोपाल ढोले, पोलीस अंमलदार स्वप्नील भारद्वाज, दिनेश बोथकर निलेश कट्टोजवार, अनुप कावळे, विकास अवचट,संघसेन कांबळे विशाल मडावी, अक्षय राउत अंकित जीभे, शाहीन सय्यद, स्मिता महाजन सायबर सेल वर्धा यांनी केली.