सौ. भारती तितरे यांच्या जीवनगाणे या काव्यसंग्रहाचे चामोर्शी येथे प्रकाशन

🔹जीवनगाणे काव्यसंग्रहातील आशयगर्भ रचना रसिकमनाच्या ठाव घेणाऱ्या – प्रा. डाॕ. चौथाले

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी प्रतिनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.21सप्टेंबर):-झाडीबोली साहित्य मंडळ चामोर्शी शाखेच्या वतीने कवयित्री सौ. भारती तितरे यांच्या पहिल्या जीवनगाणे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. चामोर्शी येथील जि.प. शाळेच्या सभागृहात आयोजित ह्या छोटेखानी कार्यक्रमाचे उदघाटन तहसिलदार जितेंद्र शिकतोडे यांनी केले.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . भाष्यकार म्हणून डाॕ. विठ्ठल चौथाले , डाॕ.सविता साधमवार, जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्रा. पुनित मातकर , चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अरूण झगडकर , गडचिरोली जिल्हाध्यक्ष डाॕ.चंद्रकांत लेनगुरे , संजय तितरे आदींची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती . प्रास्ताविकातून सौ.भारती तितरे यांनी काव्यसंग्रहाच्या निर्मिती बाबतच्या प्रेरणा यावर प्रकाश टाकला. उदघाटक तहसिलदार श्री. शिकतोडे म्हणाले, समाजातील विविध समस्यांच्या अनुषंगाने लेखन करणारे साहित्यिक पुढे आले पाहिजे. भाष्यकार डाॕ.प्रा. चौथाले यांनी जीवनगाणे मधील सर्वच रचना आशयगर्भ लयबध्द असल्याने रसिकमनाच्या ठाव घेणाऱ्या असल्याचे ते म्हणाले.

डाॕ.साधमवार,पुनित मातकर आणि डाॕ.लेनगुरे यांनी कवयित्री सौ.तितरे यांच्या या नव्या काव्यकलाकृतीचे कौतुक केले . ग्रामगीताचार्य श्री.बोढेकर अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, जीवनगाणे काव्यसंग्रहात प्रामुख्याने महिला सक्षमीकरणाचा विचार मांडला गेला असून त्यातील सर्वच रचना मानवी जीवनादर्श प्रकट करणाऱ्या आहे,असे ते म्हणाले.

दुसऱ्या सत्रात निमंत्रित कवीचे काव्यवाचन भूभरीकार अरूण झगडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विनायक धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले .यात सुनिल पोटे,नागेंद्र नेवारे, लक्ष्मण खोब्रागडे ,नंदकीशोर मसराम, ,प्रदीप मडावी, संतोषकुमार उईके,संजिव बोरकर ,दिलीप पाटील,नेताजी सोयाम, प्रशांत भंडारे,प्रमिला अलोणे, संगिता रामटेके ,वामन गेडाम,वृंदा पगडपल्लीवार , विरेनकुमार खोब्रागडे ,मारोती आरेवार तसेच आदींनी आपल्या काव्यरचनांचे प्रभावी सादरीकरण केले.प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन संजय कुनघाडकर यांनी केले तर आभार प्रदीप भुरसे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चामोर्शी शाखेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED