मेघराजाच्या वीज ओकारीच्या ठिणगीने निष्पाप बळीराजाचा अंत

139

✒️प्रतिनिधी झरीजामणी(सुनील शिरपुरे)

झरीजामणी(दि.2ऑक्टोबर):-काल सायंकाळच्या पूर्वसंध्येला जवळपास 4 वाजताच्या दरम्यान खालच्या पट्टीत म्हणजेच पूर्वेकडील भागात घनघोळ मेघ दाटून आले होते. त्याच्या मनात काय आले कुणास ठाऊक? त्याने आपला प्रवास माघारी घेतला. या परतीच्या प्रवासात पाहता पाहता त्याने अख्या तालुक्याचा परिसर आपल्या छत्रछायेने वेढला होता आणि कुणाला काही कळायच्या आत आपल्या गडगडाट व विजांच्या कडकडाटासह वादळ वा-याला सोबत घेऊन धो-धो बरसायला लागला. त्याच्या या रौद्ररुपाने कुणालाही निवा-याचा आसरा घेण्याचीही संधी मिळाली नाही. त्याच्या या धो-धो बरसण्यासोबतच आपली विजरुपी ओकारी सुरूच होती.

झरीजामणी तालुक्यातील लिंगटी शिवारातील मत्ते यांच्या शेतात अचानक वीज पडली. त्या ठिकाणी 65 वर्षीय शेख जब्बार शेख मैताब व त्यांचा मुलगा रहिम हे दोघेच होते. त्यातील शेख जब्बार शेख मैताब हे घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले. तर त्यांचा मुलगा रहिम याला विजेचा जबर धक्का बसल्याने त्याची शुद्धी हरपली होती.अवकाळी पावसाचे वातावरण पाहून बाप-लेक मक्तेदारीने केलेल्या आपल्या शेतात सोयाबीन झाकत असतांना सदर घटना घडली. काही वेळानंतर रहिम हा शुद्धीवर आल्यानंतर मित्र व नातेवाईकांना फोन करून घडलेला प्रसंग कथन केला. तेव्हा घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गामस्थ व अन्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकरणासंबंधी पाटण पोलिसांना सुचित करताच ठाणेदार संगिता हेलोंडे मॅडम यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून रीतसर पंचनामा केला. पंचनामानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी तर मुलगा रहिम याला पुढील उपचारासाठी वणी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.