सौ. प्रिती जगझाप यांच्या नंदादीप या काव्यसंग्रहाचे बल्लारपूरात प्रकाशन

51

🔹नंदादीप मधून आलेला वैश्विक शांतीचा विचार महत्त्वाचा – अरूण झगडकर

✒️बल्लारपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बल्लारपूर(दि.4ऑक्टोबर):-झाडीबोली साहित्य मंडळ बल्लारपूर शाखेच्या वतीने आयोजित कवयित्री सौ. प्रिती विलास जगझाप यांच्या नंदादीप या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन काल बल्लारपूर येथे करण्यात आले.कै. मारोतराव हजारे सभागृहात आयोजित ह्या छोटेखानी कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डाॕ. रजनीताई हजारे यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . भाष्यकार म्हणून झाडीबोलीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अरूण झगडकर , डाॕ. अभिलाषा गावतुरे, सोलापूर चे युवा कवी तेजस गायकवाड,झाडीबोली गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.चंद्रकांत लेनगुरे ,पत्रकार वसंत खेडेकर , ॲड.मेघा भाले, शिक्षक संघाचे पुरूषोत्तम गंधारे ,वामनराव जगझाप ,विलास जगझाप आदींची प्रमुख उपस्थिती होती . प्रास्ताविक कवयित्री सौ.प्रिती जगझाप यांनी केले.

भाष्यकार श्री. झगडकर म्हणाले, नंदादीप काव्यसंग्रहातून आपल्या मातृभूमीविषयी असलेली आस्था ,प्रेम आणि देशाभिमान व्यक्त करण्यात कवयित्री सौ. जगझाप यशस्वी झाल्या असून त्यांंनी वैश्विक शांतीचा विचारही प्रामुख्याने मांडल्याचे ते म्हणाले. उदघाटक डाॕ. हजारे म्हणाल्या,झाडीबोली साहित्य मंडळातर्फे बोली संवर्धनासोबतच नवोदित लेखकांना पुढे आणण्याचे जे कार्य सुरू आहे ते कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन करून सौ. जगझाप यांच्या काव्यनिर्मितीच्या यशस्वी सुरूवातीस शुभेच्छा दिल्यात. डाॕ. सौ. गावतुरे झाडीपट्टी संस्कृतीवर प्रकाश टाकत त्या म्हणाल्या ,झाडीपट्टीत कवी लेखकांचा मोठा समुह तयार होत असून त्यांनी येथील जनसामान्यांच्या प्रश्नांवर लेखन केले पाहिजे.
कार्यक्रमाध्यक्ष बंडोपंत बोढेकर म्हणाले, नंदादीप मधून कवयित्रीने आपल्या महान ग्रामसंस्कृतीचे निरामय दर्शन घडविले असून स्त्री मनाचे विविधांगी पदर उलगडून दाखविले आहे, असे ते म्हणाले.

दुसऱ्या सत्रात निमंत्रित कवींचे काव्यवाचन कवयित्री अर्जुमन शेख यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवयित्री अॕड.सारीका जेनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले .यात स्वप्नील मोगरकर,संतोष मेश्राम,परमानंद जेंगठे,संगिता बांबोळे,मनिषा पेंदोर,भारती लखमापूरे,प्रदिप मडावी,सुनिल पोटे,संतोषकुमार उईके ,दिलीप पाटील, वृंदा पगडपल्लीवार , शितल कर्णेवार, सुनिल बावणे, विरेनकुमार खोब्रागडे,प्रशांत भंडारे,आनंदी चौधरी,सविता मालेकर,रमेश भोयर,मधुकर दुफारे,राजेश नागुलवार,सतिश लोंढे,करिश्मा लोडे, महादेव हुलके,सचिन कोडमलवार,सुनील कोवे,गजानन मादसवार आदींनी आपल्या स्वरचित काव्यरचनांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी लक्ष्मण खोब्रागडे आणि सूनिल बावणे यांनी केले तर आभार वंदना राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बल्लारपूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले