वाढत्या वयाचा प्रभाव ठरला जीवघेणा-रेल्वेच्या धडकेने वृद्ध महिला ठार

26

✒️विशेष झरीजामणी(सुनील शिरपुरे)

झरीजामणी(दि.5ऑक्टोबर):-मानवाचं वय जसजसं वाढत जातं तसतसं त्याच्या इंद्रियांवर व अवयवांवर फरक पडायला लागतं. याच फरकामुळे पुढील उर्वरीत जीवन अनेक समस्यांना तोंड देत व्यतीत करावं लागतं. कधी काळी हाच फरक जीवघेणाही ठरू शकतो. ज्यामुळे कल्पनाही नसतांना नाहक जीव गमवावा लागतो.झरीजामणी तालुक्यातून नागपूर-मुंबई हा रेल्वेमार्ग गेलेला आहे. या रेल्वेमार्गावरून नंदीग्राम एक्सप्रेस व इतर दोन-तीन प्रवासी रेल्वे गाड्या धावतात.

या व्यतिरीक्त मालवाहू गाड्या या नेहमीच धावतात. त्यांचा टाईम हा अनिश्चित असतो. याच मार्गावर तालुक्यातील धानोरा येथे रेल्वे स्थानक आहे. आज 11 वाजताच्या सुमारास धानोरा येथील रामक्काबाई देवगा पार्लेवार ही 80 वर्षीय वृद्ध महिला प्रात:विधीसाठी बाहेर पडली. रेल्वे स्थानकावरील रेल्वे क्राॅसिंग पार करण्याच्या प्रयत्नात असतांना त्याचवेळी या मार्गावरून धावणा-या कोळशाच्या मालगाडीची धडक बसली.

या धडकेमुळे ती रेल्वे रुळाच्या बाजूला फेकल्या गेली. आधीच वृद्धापकाळ त्यातही एवढ्या जोरात फेकल्यामुळे तिच्या डोक्याला जबर मार लागला. ज्यामुळे तिला जागीच जीव गमवावा लागला.रेल्वे चालकाने अतिदक्षता दाखवत गाडीचा वेग मंद करून हार्न वाजवत होता. परंतु वृद्धापकाळामुळे श्रवणयंत्रणा मंद पडल्यामुळे तिला कमी ऐकायला येत होतं. ज्यामुळे हार्नचा आवाज तिच्या कानाला छेदू शकला नाही. या घटनेची वार्ता पसरताच गावातील युवकांनी व इतर लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रेल्वे प्रशासन व स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले.