संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा

32

🔸विनाविलंब नुकसान भरपाई देण्यात यावी

✒️झरीजामणी प्रतिनिधी(सुनील शिरपुरे)

झरीजामणी(दि.8ऑक्टोबर):-मागिल दोन वर्षाचा दैनंदिन आढावा आपण सर्वांना माहितच आहे. कोण, कोणत्या परिस्थितीतून निघालेला आहे? हे सांगायची आवश्यकता आहे असं वाटत नाही. याही परिस्थितीत बिचारा शेचकरी हा दलालाकडून, सावकाराकडून कर्ज काढून आपल्या शेतात पिके उभी केली आणि ती पिके आनंदाने डोलूही लागली होती. त्यांच्या या डोलण्यामुळे शेतकरी हा अतिशय सुखावला होता. कारण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटायचं की, यावर्षी भरघोष उत्पन्न होईल.परंतु निसर्गाला हे बघवलं नाही की, मग त्याला कोणतं दु:ख होतं? हे न उलगडणारं कोडंच आहे. तो यावर्षी जरा जास्तच ढसाढसा रडायला लागला. त्याच्या या रडण्याने शेतक-यांचं होतं नव्हतं स्वप्न त्याच्या अश्रूच्या ओघात वाहून गेलं आणि परत एकदा कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला. त्याच्यावरचं हे ओझं कमी करण्यासाठी शासनाने संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना मदत द्यावी.

सरकारी नियमांनुसार पावसाची टक्केवारी जेव्हा शतक पार करते, तेव्हा ओला दुष्काळ जाहीर केला जातो. जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. अति पावसामुळे शेतक-यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सोयाबीनला कोंब फुटले, बहुतांश शेतक-यांचे सोयाबीन सडून गेले. कापसाचे बोंड सडून गेले व फुटलेला कापूस वाया गेला आहे. या आस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग मोठ्या विवंचनेत सापडलेला आहे. तसेच नदी-नाल्याकाठी असलेली सर्व शेती खरडून गेली. अशाप्रकारे शेतक-यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

शिवाय जिल्ह्यातील अनेक गावात अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. तरी पण जिल्हा प्रशासन पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाच्या गंभीर बाबींकडे लक्ष देत नसल्याने शेतकरी पुन्हा उघड्यावर येण्याची शक्यता आहे.शेतकरी व शेतीवर अवलंबून असणा-या नागरिकांनी जगायचं कसं? हा प्रश्न त्यांच्यापुढे येवून ठेपला आहे. शेतक-यांच्या या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी शेतक-यांकडून मागणी होत आहे. तसेच झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतक-यांना दिलासा देण्यासाठी विनाविलंब नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.