नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांचे जनता दरबाराचे आयोजन !

29

🔹आजपासून सोमवारी वरुड आणि मंगळवारी मोर्शी येथे भरणार जनता दरबार !

🔸स्तरातील नागरिकांनी या जनता दरबारात सहभागी होण्याचे आवाहन !

✒️मोर्शी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मोर्शी(दि.10ऑक्टोबर):-सर्वसामान्य जनतेला त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. कुणाकडे रेशनकार्डसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत तर कुणाला अपंगत्वाचा दाखला देण्यास टाळाटाळ केली जाते. कुणाला संजय गांधी योजनेसह अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही, तर कुणी खासगी शाळांच्या जाचाने त्रासले आहेत. अशा अनेक कामासाठी हेलपाटे मारावे लागतात पण समस्या निकाली निघत नाही. स्थानिक पातळीवरची समस्या असतांना त्रास होतो. यामुळे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबारात गाऱ्हाणे मांडण्याची संधी तुम्हाला चालून आली आहे. मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक सोमवारी शेतकरी भवन वरुड येथे सकाळी १२ ते ५ वाजेपर्यंत आणि प्रत्येक मंगळवारी कामगार भवन मोर्शी येथे १२ ते ५ वाजेपर्यंत हा जनता दरबार होणार आहे.

त्यामध्ये सरकारी कार्यालयात कामे अडकलेले नागरिक गाऱ्हाणे मांडू शकणार आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना व्यवस्थित वागणूक मिळत नाही. अशा नागरिकांची कामे मार्गी लावावीत यासाठी आमदार देवेंद्र भुयार स्वत: अधिकाऱ्यांशी बोलून पाठपुरावा करणार आहेत.सकाळी १० वाजता तक्रारदारांच्या नाव नोंदणीला सुरुवात होणार असून, प्रत्येक नागरिकाला त्याची समस्या मांडण्याची संधी दिली जाणार आहे. तक्रारीचे निराकरण व्हावे यासाठी पाठपूरावा करणार आहेत. नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात करून सामान्य नागरिकांसह अपंग, विधवा, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, शेतकरी, विद्यार्थी असे सर्वच स्तरातील नागरिकांनी या जनता दरबारात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे.

सामान्य माणसाचे जनता दरबाराच्या माध्यमातून समाधान करणे, आपले काम होईल या अपेक्षेने आलेल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणे हे आमचे कर्तव्यच असल्याची भावना आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली.आमदार देवेंद्र भुयार यांनी त्यांच्या मतदार संघामध्ये जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करून हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ‘घंटो का काम मिनिटोमें’ अशा घोषणेसह ग्रामस्थांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.