दौरा महमहीमांचा.. आणि अनुभव विलास दरडेंचा

30

🔹विचारशून्य गुलाम मेंदूच्या हिरड्यांची औलादी होत्या.??

🔸हा देश माणसांचा की हैवानांचा.. ?

🔹दौऱ्यामुळे अधिकाराचे हनन.? गरिबांच्या पोटावर कशाला मारता?

✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.12आक्टोबर):-माहित नाही मी माणूस आहे की हैवान! पण ह्या देशात माणसांपेक्षा हैवानांचा स्तोम प्रचंड प्रमाणात माजलेला आहे .जिकडे पाहावे तिकडे लांडग्यां- कोल्यांचाच राजरोसपणे वावर सुरू झाल्याचे मी उघड्या डोळ्यांनी बघत आहे .त्यामुळे मन उद्विग्न होवून विचारांची ज्वाला उरामध्ये धगधगत आहे. अन्याय करायचा म्हणजे नेमका किती करायचा?, आणि अन्याय सहन करायचा म्हटले तरी तो किती सहन करायचा ? याचे काही निश्चित मापदंड आहे काय? की असायला हवे ! याबाबत अनभिज्ञ आहे.

खरं सांगायचे म्हणजे मी ज्या गोंडवाना विद्यापीठ परिसरात राहतो त्या भागातील ही खरी घटना आहे.घडलं असं की म्हणे येत्या 12 ऑक्टोबर 2021 ला या राज्याचे महामहिम राज्यपाल विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.बरं वाटलं यासाठी की गडचिरोली सारख्या अतिदुर्गम अतिसंवेदनशील अगदी राज्याच्या एका टोकावर असणारा आपला जिल्हा आणि अशा जिल्हात राज्याचे राज्यपाल येणं म्हटलं की थोडं बरंच वाटणार!पण यांना महामहिम का म्हणतात याचा अर्थ मात्र मला नीटसा कळला नाही..पेपरमध्ये वाचले म्हणून महामहिम …

पण या महामहिम साहेबांच्या दौऱ्यामुळे कुणाचे काय हाल झाले? हे एक सुजाण नागरिक म्हणून विचारात घेणे आवश्यक आहे.घडलं असं मी शुक्रवार दिनांक 8 ऑक्टोबर 2021ला जवळपास साडेचार पाचच्या सुमारास शाळेमधून घरी जात होतो. बघतो तर काय पन्नास साठ पोलिसांचा फौजफाटा घेवून तहसीलदार साहेब, एस डिओ साहेब ,ठाणेदार साहेब यांची रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाश्त्याची दुकाने, चहाची दुकाने ,गाडी दुरुस्तीची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने हे सर्व तोडफोड करण्याची मोहीम सुरू झाली होती. आणि त्यातच एक चहाची दुकांनवाली बाई हात जोडून रडून रडून त्यांना विनंती करीत होती. साहेब माझे दुकान तोडू नका.आज नाही पण उद्याला मी माझ्या दुकानाचे पूर्ण सामान काढते ! मोठया कष्टाने एक एक खुर्ची , छत,एक एक टेबल, एक एक कप असं सारं साहित्य जमविले आहे साहेब ! मी विधवा आहे माझी लहान लहान दोन लेकरं आहेत!याच धंद्यावर जे काही पाच पन्नास कप चहा विकते त्यातून खर्च वजा जाता संभर दीडशे रुपये मिळतात त्यावर माझी मुलं आणि मी उदरनिर्वाह करतो.

साहेब तुम्ही छताला लावलेली जाळी जरी फाडली तरी ती दुसरी घेण्याची माझी लायकी नाही साहेब! नका फेकू साहेब सामान ! नका फेकू! मी हात जोडते अशी गयावया करून पोटतिडकीच्या आकांताने ती रडत होती. पण निर्ढावलेल्या या मदमस्त लांडग्यांना थोडी लाज किंवा शरम वाटत नव्हती. कारण यांची मानसिकता गुलामीच्या दोरखंडात जखळलेली होती. बहुतेक खऱ्या माणुसकीचे , माणसांना माणसाप्रमाणे वागविले पाहिजे .याचं समाजशिक्षण यांना मिळालं नसावं. यांना फक्त शासनाचा आदेश पाळायचा होता.” विचार शुन्य गुलाम मेंदूच्या हिजड्यांची औलादी होत्या” की काय कुणास ठावूक!माणसाच्या माणूसपणाचा जराही मला लवलेश त्यांच्यात दिसला नाही.मी गाडी बाजूला लावून हे सारं चित्र उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. रागाचा पारा शंभरच्या वर चढला होता.पण बुद्धांना स्वीकारल्यामुळे काही करता येते नव्हते.माझ्याच्याने राहून झालं नाही आणि मी साहेबांना म्हणालो साहेब ती विधवा महिला आहे. एवढी गयावया करून विनंती करीत आहे. ती उद्याला सर्व आपलं साहित्य काढणार आहे.

महामहिम साहेबांना यायला आणखी चारपाच दिवस बाकी आहेत थोडे थांबा! कशाला गरिबांच्या पोटावर मारता.थोडा विचार करा. असं बोलताच ते साहेब माझ्यावर जरा खेकसले! आम्हला जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश आहे. आम्ही काही बी करू शकतो . हे ऐकताच माझ्या मेंदूची कंपने अधिकच वाढत होती मग मी माझ्या मूळ वृत्तीवर उतरलो. साहेबांना म्हणालो साहेब तुम्हाला जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश आहे. हे जरी खरं असेल पण त्याहूनही आम्हाला आमच्या संविधानाने मूलभूत हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. मग या देशातील नागरिक कुठेही संचार करू शकतो, कोणताही व्यवसाय करू शकतो, भाषण देवू शकतो, लेखन करू शकतो, संपत्ती गोळा करू शकतो असे अनेक अधिकार भारतीय संविधानाने दिलेले असतांना कुणाच्या दौऱ्यामुळे तुम्ही त्या अधिकाराचे हनन करू शकत नाही.आणि अशा प्रकारे तुम्ही जर अधिकाराचे हनन केलात तर तुम्ही गुन्हास व शिक्षेस पात्र ठरू शकता.असं बोलल्याबरोबर ते अधिकारी थोडे नरमले.आणि मला विचारू लागले आपण कोण आहात ,काय करता मी उत्तरलो मी प्रथम भारतीय आहे आणि अंततः भारतीयच आहे.त्यांच्या डोक्यात विचार चक्र सुरू झाले. दुकानामधली सामानाची फेकफेकी करणे त्यांनी थांबविले तोपर्यंत लोकांची गर्दी फारच जमली लोकं ओरडू लागली.

मी साहेबांना विचारलं महामहिम साहेब विद्यापीठाच्याच कार्यक्रमाला उपस्थित। राहणार की आणखी कुठं दौरा आहे काय? साहेब म्हणाले चातगाव सर्च ला पण डॉ बंग साहेबांसोबत दोन तीन तासांची चर्चा आहे.मग मला बोलायला आणखी मार्ग मोकळा झाला मी साहेबांना म्हणालो जर तुम्ही इथे शहरातील माणसांची दुकाने तुडवीत आहात तर गडचिरोली ते चातगाव मार्गावर खूप जंगल आहे. मग तुम्ही रोडपासून दहा दहा मीटर जंगल तोडणार आहात काय? की कसे करणार आहात महामहिम साहेबांना सुरक्षा तर देणं आहे ना तुम्हाला!..लोकांची खूप आरडाओरड सुरू झाली आता आपलं काही जमणार नाही म्हणून अधिकारी वर्ग निघून गेले.

आणि रात्रीचा फायदा घेवून सगळीच्या सगळी दुकाने उधळून टाकली छत, बल्या, टेबलखुर्च्या, सगळ्या सामानाची धूळधाण करून टाकली.
सकाळी पाहतो तर निरव शांतता पसरली होती. आपल्या झालेल्या नुसकाणीची चिंता करीत सगळी दुकानदारमंडळी डोक्यावर हात ठेवून डोळ्यातील अश्रू पुसीत बसली होती.आता आणखी किती दिवस आपलं दुकान बंद राहणार! झालेली नुकसान कशी भरून काढावी रोजच्या रोज हातावर घेवून खाणाऱ्यांची काय अवस्था झाली असेल त्यांचे त्यांना माहीत.. !मला पोलीस यंत्रणेने महामहिमांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या योजने विषयी काहीच बोलायचे नाही. आपल्या राज्याचे राज्यपाल आहेत. त्यांची सुरक्षा केलीच पाहिजे! यात दुमत नाही पण सुरक्षेच्या नावाखाली तुम्ही गरिबांच्या पोटावर लाथा मारता हे कितपत योग्य आहे. ही अतिशय घृणास्पद मानवी मनाला न पटणारी गोष्ट आहे. यावर चिंतन मनन होणे गरजेचे वाटते. आणि तसेही महामहिम साहेब पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात हवेतूनच येणार आहेत.

मग कोणत्यातरी सुरक्षा कवच असलेल्या आडी ,मर्सिडीज, गाडीतुन विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्याच्यासोबत शे-पाचशे पोलीस अधिकाऱ्यापासून तर स्पेसियल कमांडो फोर्स राहणारच आहे. चारपाच दिवसापासून लहान लहानशी दुकाने चाय टपऱ्या बंद करण्याचा सुरक्षेशी काय संबंध?आज तर हदच झाली लांजेडापासून तर इकडे विद्यापीठापर्यँत सगळीच दुकाने बंद दिसली.मला काहीच कळत नव्हतं महामहिम तर उद्या येणार आहेत आणि आजपासूनच दुकाने बंद ! म्हणजे या देशात लोकशाही आहे की हुकूमशाही ! आजच दृश्य बघून निश्चितच हुकूमशाही सुरू झाली असं म्हंटले तरी काही वावगे होणार नाही.

याहूनही पुढचं मला असं वाटते महामहिम साहेबांना रस्त्याच्या कडेला असलेली चाय टपरी तिथे काम करणारी माणसे किंवा नास्ता-बनवून विकणारी माणसे किंवा बकुरकुरे विकणाऱ्या लोकांचे दर्शन घडवावयला पाहिजे! त्यांना आपल्या जिल्ह्यात ही परिस्थिती आहे! इथे एवढी बेकारी आहे.इथल्या युवकांना काम नाही .अशाही परिस्थितीत जीवन जगत आहेत याचे महामहिमाना यथार्थ दर्शन घडवायला पाहिजे. पण असं न करता त्यांची रोजीरोटी आपण हिरावून घेत आहोत गेल्या चार दिवसांपासून सगळी लहानमोठी दुकाने बंद केल्याचे चित्र दिसत आहे.गरिबांच्या डोक्यावरील लोणी खात असंल्याचाच हा प्रकार आहे.मला गुप्त गोठातून अशी माहिती मिळाली महामहिम साहेब दीक्षांत समारंभात फक्त अर्धा ते पाऊण तास थांबणार आहेत.हे निमित्य मात्र आहे. खरी चर्चा तर सर्च शोधग्राम मध्ये होणार आहे.चर्चेअंती सर्च शोधग्रामला दोन चार कोटीची मदतही देवून टाकतील. धनाढ्य लोकांना आणखी धनाढ्य बनविन्याची अगदी सोयीस्कर पणे केलेली ही नवी संकल्पना आहे !.

आणि आम्ही मात्र आमच्याच रोजीरोटी करणाऱ्या लोकांची दुकाने बंद करून त्यांची लक्तरे वेशीवर टाकणार!.हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण सद्सद्विवेकबुद्धीने विचार करून अन्यायाचा प्रतिकार करायला शिकलं पाहिजे. पण हे होतांना दिसत नाही.नवीन काही प्रसविण्याआधीचआमच्या कुशी वांझ झाल्या की काय?असं काहीसं चित्र दिसत आहे. अन्याय सहन करून मारण्यापेक्षा अन्याचा प्रतिकार करून मेलेलं कधिही गौरव वास्पदच असते!म्हणून एक होवून नेकीने कार्य केलं पाहिजे ! तरच टाळूवरच लोणी खाणाऱ्या शंड औलादीना आपणाकडून माणुसकीचा धडा आपण शिकविनार आहोत हे मात्र सूर्यप्रकाशा एवढे खरे आहे !नाही तर एका वेळेस दहा पंधरा किलो जनावरांचं मास खाणारी लांब टोटक्याची गिधाडं आपलेही लचके तोडल्याशिवाय राहणार नाही.हे माझं उरोबुरो सांगणं आहे. ( लेखन- विलास ललिता-मानिराम दरडे मु जांभळी जि प प्रा शाळा उदेगाव
प स धानोरा जि गडचिरोली)