लातूर येथे होणाऱ्या पत्रकार संघाच्या विभागीय अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष सन्मान

33

✒️विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.17ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अधिवेशन लातूर येथे २८ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे.या विभागीय अधिवेशनात मराठवाड्यातील औरंगाबाद,जालना,परभणी, हिंगोली,नांदेड, लातूर,उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तसेच ज्येष्ठ संपादक यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह,सन्मान प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे.मराठवाड्यातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ पत्रकारांनी सन्मान स्वीकारावा आणि कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा विभाग अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,प्रदेश संघटक संजय भोकरे,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघाचे लातूर येथे मराठवाडा विभागीय पहिले अधिवेशन दयानंद सभागृह,बार्शी रोड,लातूर येथे भव्यदिव्य स्वरूपात होणार आहे.या विभागीय अधिवेशनाला विरोधी पक्षनेते यांच्या सह मराठवाड्यातील सर्व मंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत.या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते मराठवाड्यातील पत्रकारितेमध्ये ३० वर्षे आणि वयाची ६० (साठ) वर्षे पूर्ण केलेल्या सन्माननीय ज्येष्ठ पत्रकारांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.त्याच बरोबर मराठवाड्यातील ज्या स्थानिक वृत्तपत्रांना सलग पंचवीस वर्ष झालेली आहेत अशा सन्माननीय ज्येष्ठ संपादकांचा देखील गुणगौरव करण्यात येणार आहे.पत्रकार संघाच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने पत्रकारांना पेंशन योजना मागील वर्षापासून लागू केली आहे.

या पेन्शन योजनेला पात्र ठरलेल्या मराठवाड्यातील सर्व पेन्शनधारक ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष अतिथी सत्कार करण्यात येणार आहे.तेव्हा मराठवाड्यातील सर्व ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ संपादक आणि पेन्शनधारक ज्येष्ठ पत्रकार यांना विनम्र आवाहन आणि विनंती आहे की,आपण पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या सन्मानाचा स्वीकार करून सत्कार सोहळ्यास सहकुटुंब,सहपरिवार उपस्थित राहावे.आपण आपल्या नावाची कृपया ९८२२६२८५२१ या व्हाट्सअप नंबर वर आपली पासपोर्ट फोटोसह थोडक्यात माहिती पाठवावी.पत्रकार संघाच्या या विभागीय अधिवेशनाला मराठवाड्यातील सर्व पत्रकार,प्रेस फोटोग्राफर,डीटीपी ऑपरेटर,व्यवस्थापक,वितरण जाहिरात प्रतिनिधी,पेपर विक्रेते एजंट,पेपर लाईन करणारे बांधव यांच्यासह प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये विविध विभागात काम करणाऱ्या सर्व सन्माननीय प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.
————-
मागील दोन वर्षात मृत्यू पावलेल्या पत्रकारांची नावे कळवा
मागील दोन वर्षाचा कार्यकाळ वृत्तपत्रसृष्टीला अतिशय कठीण ठरला आहे.या दोन वर्षांच्या कार्यकाळात कोरोना बाधित होऊन मृत्यू पावलेल्या कोरोना योद्ध्यांची नावे तसेच इतर कारणाने मृत्यू पावलेल्या मराठवाड्यातील पत्रकारांची नावे कृपया ९८२२६२८५२१ या व्हाट्सअप नंबर वर पासपोर्ट फोटो सह पूर्ण नाव,गावाचे नाव,तालुक्याचे नाव,जिल्ह्याच्या नावासह संबंधित पत्रकारांच्या नातेवाईकांनी अथवा माहितगारांनी पाठवावीत.या सर्व वीरगणांना अधिवेशनामध्ये प्रकाशित होणाऱ्या स्मरणिके मधून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
————-
पत्रकार कोरोना योद्ध्यांना आवाहन
कोरोना महामारीच्या पहिल्या,दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटे पर्यंत सद्य स्थितीत देखील ज्या पत्रकारांनी आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना बाधितांना वाचवण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या कुटुंबियांना विविध माध्यमातून आधार दिला.अशा सर्व पत्रकारांना पत्रकार संघाच्या विभागीय अधिवेशन व्यासपीठावरून विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.तेव्हा मराठवाड्यातील सर्व कोरोना योद्धा पत्रकारांना विनम्र आवाहन करण्यात येते की,त्यांनी आपल्या कार्याची थोडक्यात माहिती स्वतःच्या पासपोर्ट फोटोसह कृपया ९८२२६२८५२१ या नंबर वर पाठवावी आणि या विशेष सत्कार सोहळ्याला सहकुटुंब,सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.