पाण्याचा अंदाज न आल्याने गोदावरी नदी पात्रात बुडून तरूणाचा मृत्यू

🔺गेवराई तालुक्यातील सुरळेगावतील दुर्दैवी घटना

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.19ऑक्टोबर):- गेवराई तालुक्यातील सुरळेगावतील एका युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने गोदावरी नदीतील डोहात बुडून एका १७ वर्षीय युवकाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की गेवराई तालुक्यातील सुरळेगाव याठिकाणी आज मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.

तान्हाजी लिंबाजी आरबड (वय १७ वर्ष) रा.सुरळेगाव ता.गेवराई जि.बीड असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. सुरळेगाव हे गोदावरी नदीच्या तिरावर वसलेले गाव आहे. दरम्यान आज सकाळी गावातील काही तरुण रोजच्याप्रमाणे नदीत पोहण्यासाठी गेले होते. यावेळी तान्हाजी लिंबाजी आरबड याला नदीच्या एका डोहातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला.

हि बाब सोबत असलेल्या तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. दरम्यान गावातील पट्टीचे पोहणारे शरद भंडारे या तरुणाने सदरील डोहात उडी मारुन तान्हाजीला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तान्हाजीचा डोहात बुडाल्याने दुर्देवी मृत्यू झाला. मयत तान्हाजी हा नेहमी हसतमुख स्वभावाचा आणि आई वडिलाला एकूंता एक मुलगा होता. त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED