पुण्याच्या सौंदर्यवती सुवर्णा झोरे-कोद्रे ठरल्या मिस अँड मिसेस महाराष्ट्र-२०२१’च्या विजेत्या

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.4नोव्हेंबर):- पुण्याच्या सुवर्णा झोरे-कोद्रे नुकत्याच नवी मुंबई येथे झालेल्या ‘डायडेम मिस अँड मिसेस महाराष्ट्र २०२१’च्या विजेत्या ठरल्या आहेत. शारीरिक सौंदर्यासोबतच बौद्धिक, मानसिक सौंदर्याच्या स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवत झोरे यांनी ‘मिस अँड मिसेस महाराष्ट्र २०२१ – ब्युटी विथ पर्पज’ हा किताब पटकावला. महिलांच्या बाबतीतील ‘मासिक सत्य’ या विषयावर जागृती व मदत करण्याच्या उद्देशाने नुकतीच ही स्पर्धा पार पडली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कम्प्युटर सायन्समध्ये पदवीचे शिक्षण घेतलेल्या झोरे यांनी आयटी क्षेत्रात विविध पदांवर काम केले असून, सध्या त्या जर्मनीमध्ये व्होडाफोन कंपनीत सॉफ्टवेअर प्रोग्राम मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक कार्यात झोरे यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. मुलींचे शैक्षणिक पालकत्व, सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेतील मुलींना मदत व मार्गदर्शन, बालग्राम संस्थेला देणगी स्वरूपात त्या मदत करतात.

यावेळी बोलताना झोरे म्हणाल्या, “सामाजिक भावनेतून ही स्पर्धा होत असल्याने त्यात सहभागी झाले. जवळपास १८०० महिला यात सहभागी झाल्या होत्या. अंतिम फेरीत एकूण ३७ स्पर्धक निवडण्यात आले होते. या यशामुळे वेगळी ओळख मिळाली. त्याचा उपयोग महिलांच्या मासिक पाळीचे प्रश्न सोडवणे, सॅनिटरी नॅपकिनचा वापर वाढवणे, यासाठी करणार आहे. मानसिक दृष्ट्या कमकुवत मुलांसाठी मला काम करायचे आहे. समाजातील गैरसमज, रूढी-परंपरा याबाबत जागृती करून महिलांना सुरक्षित आरोग्य देण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करणार आहे.

पुणे, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED