कोलाम गुड्यांवरील वाचनालय/अभ्यास केंद्र बनले डिजिटल

30

🔸महसूल कर्मचारी संघटनेचे सहकार्य

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.5नोव्हेंबर):-तालुक्यातील कोलाम गुड्यांवरील शिक्षण म्हणजे अवघड प्रश्न. विद्यार्थ्यांना मराठी समजेना अन् शिक्षकांना कोलामी समजेना. अशा अवस्थेत सुरू असलेला शिक्षणाचा खेळखंडोबा थांबावा यासाठी सुरू असलेल्या कोलाम विकास फाऊंडेशनच्या प्रयत्नाला महसूल कर्मचारी संघटनेने बळ दिले आणि कोलाम गुड्यांवरील एका झोपडीत सुरू असलेले वाचनालय/ अभ्यासकेंद्र डिजिटल बनले. आता सचित्र अभ्यासाची सुविधा झाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

पाटण ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या सितागुडा या कोलाम गुड्यांवरील मागील तीन वर्षांपासून कोलाम विकास फाऊंडेशन व्दारा विर शामादादा कोलाम वाचनालय/ अभ्यासकेंद्र चालविले जात आहे. आदिम कोलाम समुदायाच्या नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण मिळावे व त्यांना विकासाच्या मुळ प्रवाहात सामील करून घेणे सोपे व्हावे यासाठी कोलाम विकास फाऊंडेशन कसोशीने प्रयत्न करीत आहे. विर शामादादा कोलाम वाचनालय/अभ्यासकेंद्राकरिता लक्ष्मीबाई आत्राम या कोलाम भगिनीने पुढाकार घेऊन आपल्या झोपडीची एक खोली उपलब्ध करून दिली. रोज सायंकाळी कोलामांची इवलीशी ४२ मुले/ मुली या केंद्रात अभ्यासाला एकत्र जमतात.

लक्ष्मीबाई ची मुलगी कर्णिबाई दररोज सायंकाळी या विद्यार्थ्यांकडून अभ्यास करवून घेते. मात्र पुस्तकातील धडे समजतांना विद्यार्थ्यांना अवघड जात असल्याचे पाहून कर्णिबाई हतबल होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर मदतीला धावून आली आणि त्यांनी या अभ्यासकेंद्रातील विद्यार्थ्यांना गणवेष, रजिस्टर, पेन, पेन्सिल, खोडरबर, मार्करपेन, नकाशे, व्हाईट बोर्ड या शैक्षणिक साहित्यांसह दर्जेदार असे स्क्रीन प्रोजेक्टर उपलब्ध करून दिले. यामुळे विद्यार्थ्यांना सचित्र शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. कोणत्याही कोलामगुड्यावर असलेले हे पहिले डिजिटल वाचनालय/अभ्यासकेंद्र बनले आहे.

बुधवार (दि.३) ला झालेल्या एका समारंभात संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजु धांडे यांनी कोलाम विकास फाऊंडेशन चे अध्यक्ष विकास कुंभारे व गाव पाटील भिमराव आत्राम यांना स्क्रीन प्रोजेक्टर व इतर साहित्य सुपुर्द केले. याप्रसंगी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शैलेश धात्रक, सचिव मनोज आकनुरवार, उपाध्यक्ष अजय मेकलवार, महिला उपाध्यक्ष संजना झाडे, जिल्हा संघटक अमोल आखाडे, सहसचिव नितीन पाटील, प्रसिद्धी प्रमुख हेमंत उमरे, दत्तात्रय वनकर, सुनिल चांदेकर, प्रतिक राठोड, मीना सिडाम, स्नेहा तामगाडगे यांचेसह नानाजी मडावी, देवराव कोडापे, समस्त गावकरी उपस्थित होते.या वेळी कोलाम बांधव आणि बहिणींनी कोलामी पारंपारिक नृत्य सादर करून पाहुण्यांचे जोरदार स्वागत केले.