एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाला गंगाखेड तालुका प्रवासी महासंघाचा पाठिंबा

26

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7नोव्हेंबर):-शहरातील एसटी कर्मचाऱ्यांनी दिनांक 3 नोव्हेंबर पासून स्वयंस्फूर्तीने पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला गंगाखेड तालुका प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी भेट देत कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष गोपाळ मंत्री, संघटक सूर्यमाला मोतीपवळे ,जिल्हा उपाध्यक्ष नारायण मेहता, सदस्य संजय बचाटे आदींनी संपावर असलेल्या जवळपास 360 कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे व शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या या एकमेव मागणीसाठी हे काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याची माहिती एसटीच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

त्याच बरोबर या आंदोलनाची पूर्वकल्पना कनिष्ठ वेतनश्रेणी संघटनेचे अध्यक्ष अजय कुमार गुजर व सचिव शेषराव डोने यांनी शासनाला 14 दिवस अगोदर दिलेली असतानासुद्धा शासनाकडून त्याची कसलीही दखल घेण्यात आलेली नाही .यावेळी प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हा दिवाळी सणाचा कालावधी आहे व यामुळे प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे याप्रश्नी लक्ष वेधले असता कर्मचाऱ्यांनी असे सांगितले की त्यांनासुद्धा हे आंदोलन करण्याची आवड नाही तर केवळ मजबुरी मुळे, कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायामुळे हे आंदोलन नाईलाजाने करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत या सर्व बाबींचा विचार करता शेवटी गंगाखेड तालुका प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपसात चर्चा करत कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असून शासनाने त्याची त्वरित दखल घेऊन त्या पूर्ण कराव्यात यासाठी एसटी महामंडळाच्या कामबंद आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला .यावेळी एसटी चे वाहक, चालक यांच्यासह इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.