फडणवीस आणि कंगना संघ शाखेतल्या वैचारिक हागणदारीचे वारस

31

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

या आठवड्यात दोन वक्तव्ये गाजली. एक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांचे तर दुसरे अभिनेत्री कंगना राणौतचे. फडणवीस यांनी ट्विट करत, “आपण डूकराशी कुस्ती खेळत नाही !” असे म्हंटले. गेले अनेक दिवस त्यांचे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे घमासान सुरू होते. आरोप-प्रत्यारोप सुरू होते. यात नवाब मलिकांच्या तडाख्याने फडणवीस तोंडावर पडले. ब-यापैकी फजिती झाली. शेवटी, “नाक कापलं तरी भोक आहे !” या प्रवृत्तीचा प्रत्यय देताना “मी डूकराशी कुस्ती खेळत नाही !” असे वक्तव्य केले. अभिनेत्री कंगना राणौतने हा तमाशा जारी ठेवत लगेच दुसरे वक्तव्य केले. नुकतीच तिला केंद्र सरकारने पद्मश्री दिली. लगोलग तिने केंद्र सरकारने तिला पद्मश्री देण्याचा निर्णय का घेतला असावा ? याचा प्रत्यय दिला. देशाला स्वातंत्र्य भिक म्हणून मिळाले आहे आणि खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले असल्याची टिका केली आहे. कंगना आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचीही वक्तव्ये अतिशय निंदाजनक, सुमार आणि विकृत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि कंगना राणौत या दोन प्रवृत्ती संघ शाखेतल्या वैचारिक हागणदारीचे वारस असल्याचे समोर आले.

संघ शाखेतल्या संस्कार वर्गात असलाच गैरसमज, विषारी प्रचार, विकृती पसरवल्या जातात. समाज तोडणारे विष तिथून पसरवले जाते. कंगना सुमार आणि विकृत आहेच हे तीने अनेकवेळा सिध्द केले आहे. पण ती संघाची प्रॉडॉक्ट असावी. तिला संघानेच तालिम दिलेली असावी. त्या शिवाय तिच्या मनात इतका वैचारिक आंधळेपणा, विषाक्त प्रवृत्ती असू शकत नाही. कंगनाने जी गरळ ओकली आहे तेच संघ शाखेवर नित्य बरळले जाते. हेच नव्हे तर अशा अनेक विकृत गोष्टी सांगितल्या जातात. सेवेचा आणि राष्ट्रभक्तीचा बुरखा पांघरूण ब्राम्हण्यवाद रूजवताना स्वयंसेवकांची मस्तकं विषारी विचारांनी भरली जातात. जाती-जातीत, धर्मा-धर्मात तेढ कशी निर्माण होईल ? याची पध्दतशीरपणे विषपेरणी केली जाते. गांधी-नेहरूंच्या, आंबेडकरांच्याबाबत जाणिवपुर्वक पण नकळत विषारी प्रचार केला जातो. केवळ कंगनाच नव्हे तर अनेक स्वयंसेवकांना हेच सांगितले जाते. गांधींनी कशी वाट लावली ? त्यांनी कसा अन्याय केला ? इंग्रजांशी कशी हातमिळवणी केली ? त्यांनीच फाळणी कशी केली ? वगैरे वगैरे धादांत खोट्या विकृती पसरवल्या जातात. खोटा इतिहास शिकवला व सांगितला जातो. जे तिथे सांगितले जाते तेच कंगनाने जाहिरपणे बोलून दाखवले इतकेच.

जर हे सरकारला किंवा संघाला मान्य नसते तर सरकारने तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यायला हवा होता. कारण कंगणाचे वक्तव्य तमाम स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणारे आहे. हागल्या-मुतल्यावर प्रवचने झोडणा-या सर संघचालक मोहन भागवतांनी या बाबत सरकारचे कान उपटत तिचा पुरस्कार काढून घ्यायला सांगायला हवे होते. पण असे काही झाले नाही आणि होणारही नाही. ना सरकार तिचा पुरस्कार काढून घेईल ना भागवत सरकारचे काय उपटतील. या दोघांनाही कंगनाच्या विषारी शेरेबाजीने गुदगुल्याच होत असतील हे नक्की. कारण कंगना राणौत त्यांच्या मनातलेच बोलली आहे. त्यासाठीच तिला पद्मश्री देवून गौरविले आहे. अन्यथा तिला पद्मश्री पुरस्कार देण्याइतके तिचे अभिनयातले योगदान काय ? तिला पद्मश्री देण्याचा निर्णय का झाला ? याचे उत्तर तिच्या विकृत पिचकारीने समजते. संघवाल्यांच्याकडे जोवर अक्कल गहाण असते, मेंदूवर त्यांचा जोवर ताबा असतो तोवर ते म्हणतात तेच खरे वाटते. देशाच्या स्वातंत्र्यात कधीही सहभाग न घेणारा, त्यासाठी कसलेही योगदान न देणारा संघ महान देशभक्त वाटतो. संघाच्या देशविघातक उचापती महान वाटतात. त्या देशभक्तीचा अविष्कार वाटतात. कंगना राणौत हे एक असलेच प्रॉडॉक्ट आहे. केवळ कंगणाच नव्हे तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही याच संघाचे पिल्लू आहेत. त्यामुळे कंगनाचे वक्तव्य त्यांनाही खटकणार नाही. ते जगभर जातात. बाहेर गेले की जगाला बुध्द आणि गांधी सांगतात. देशात आले की ते आणि त्यांची मातृसंस्था बुध्द आणि गांधी विचार तोडण्याचे काम करतात. हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

संघाची पिलावळ हेच काम करणार, असेच काम करणार मग ते कुणीही असो. कारण विषाक्त वैचारिक हागणदारीतून निर्माण झालेली प्रवृत्ती अमृत ओकू शकत नाही. विषाने भरलेल्या मस्तकात अमृत येणार कोठून ? एका मोठ्या राज्याचे सात वर्षे विरोधी पक्ष नेतेपद, मुख्यमंत्रीपद भुषवेले देवेंद्र फडणवीस जे बोलले ते ही भयंकर आहे. इतक्या मोठ्या पदावर काम करून विरोधकांना डूक्कर म्हणण्याची प्रवृत्ती त्यांनी दाखवली हे उगाच नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात आजतागायत इतका वैचारिक तमाशा कुणी केला नाही तेवढा फडणवीसांनी केला आहे. भाजपाच्या राजकारणाची सुत्रे जशी फडणवीसांच्या ताब्यात आली आहेत तसे या विकृतीला उधाण आले आहे. गरळ ओकणारांची टिम बांधून फडणवीसांचा वारू सुसाट सुटला आहे. कसेही कुणावरही तोंड टाकले जात आहे. राजकारण म्हणजे “वैर” असल्यासारखे वातावरण निर्माण केले आहे. गल्लीतल्या टूकार पोरांची भांडणे ज्या लायकीची असतात त्या लायकीवर फडणवीसांनी राज्याचे राजकारण आणून ठेवले आहे. याची सुरूवात खरेतर मोदी आणि शहा यांनी केली आहे. विरोधी विचाराचे लोक वैरी असल्याचे वातावरण तयार करत त्यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जात टिका केली जाते. त्यांची आई-बहिण काढली जाते. या विकृत प्रचार प्रसाराचा इतका प्रभाव पडला आहे की आता सगळेच त्या थराला जावू पहात आहेत. जशास तसे (Tit for tat) या न्यायाने सगळेच या लायकीला उतरू लागले आहेत. इतर पक्षियांनाही हा तमाशा बरा वाटू लागला आहे. या आधी महाराष्ट्रातले सामाजिक व राजकीय वातावरण असे नव्हते.

महाराष्ट्रात फडणवीसांनी याची सुरूवात केली आहे. मी डूक्कराशी कुस्ती खेळत नाही असे त्यांनी बर्नाड शॉ यांचा संदर्भ देत सांगितले असले तरी गेली सात वर्षे त्यांनी स्वत:च तसे वर्तन केले आहे. त्या थराला जावून राजकारण केले आहे. त्यामुळे नेमके डूक्कर कोण ? याचे चिंतन त्यांनी स्वत:च करायला हवे. त्यांनी व त्यांच्या टिमने राजकारणाचे गटार केले आहे. या गटारात लोळून लोळून आपणच राड होतोय हे लक्षात आल्यावर त्यांना बर्नाड शॉ आठवला हे बरं झाले. फडणवीसांना बर्नाड शॉ आठवला आहे. त्यामुळे ते किमान इथून पुढे तरी सुधारतील का ? ते २०१४ पुर्वी जसे होते तसे होतील का ? हा खरा प्रश्न आहे.