गेवराई उपजिल्हा रूग्णालयात 15 दिवसापासून डॉक्टर गायब

38

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.2डिसेंबर):-येथील उपजिल्हा रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसांपासून प्रसूती विभागात स्त्रीरोगतज्ज्ञच उपलब्ध नसल्याने, गरोदर महिलांची गैरसोय होत आहे. त्यांना या रुग्णालयातून बीडमधील रूग्णालयात जाण्यास सांगितले जात आहे.

दरम्यान, कोविड काळात चांगली सेवा देणाऱ्या या रुग्णालयाचा कारभार काही दिवसांपासून ढेपाळत चालला आहे. परिणामी रुग्णांच्या आरोग्याचा विषय गंभीर होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या रुग्णालयाबाबत ‘बडा घर अन् पोकळ वासा’ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

पन्नास खाटांचे गेवराई उपजिल्हा रुग्णालय राष्ट्रीय महामार्गावर असून, येथे ट्रॉमा सेंटरची सुविधा आहे. हे रुग्णालय तालुक्याच्या मध्यभागी असल्याने, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तसेच, या रुग्णालयात महिन्याला जवळपास दोनशे महिला बाळंतपणासाठी दाखल होतात.

रुग्णालयातला स्त्री राोग विभाग सुसज्ज असून, काही अडचण आल्यास येथे सिझरचीही सोय उपलब्ध आहे. या ठिकाणी खासगी रूग्णालयांच्या तुलनेत उपचाराचा खर्च कमी प्रमाणात होत असल्याने, गोरगरीब समाजातील महिलांना त्याचा फायदा होतो.

मात्र गेल्या काही दिवसांपासून या रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञच उपलब्ध नाहीत. एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असून, दुसरे वैद्यकीय अधिकारी रजेवर आहेत. त्यामुळे इथल्या परिचारिकाच प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची तपासणी करतात.

या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने येणाऱ्या महिला रूग्णांची संख्या कमी कमी होत आहे. त्यामुळे जिल्ही आरोग्य प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देवून स्त्रीरोग तज्ञांची त्वरित उपलब्धता करणे आवश्यक आहे.