त्याग, समर्पण आणि बलिदान म्हणजेच बाबासाहेब- पी.डी.पाटील सर

  34

  ?महापुरुषांना जातीत विभागून त्यांच्या विचारांची माती करू नका – लक्ष्मणराव पाटील सर

  ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

  धरणगांव(दि.9डिसेंबर):-धरणगाव येथील पिंपरी खु. येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शिक्षक सतिश शिंदे यांनी केले. प्रास्ताविकात बहुजन महापुरुषांची विचारधारा जनमानसात रुजविणारे वैचारिक कार्यक्रम झाले पाहिजेत आणि त्याच उद्देशाने आजचा कार्यक्रम आयोजित केला, असे मत कार्यक्रमाच्या सुरवातीला शिंदे सरांनी व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

  तद्नंतर हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत व त्यांच्या सर्व साथीदारांना सार्वजनिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर प्रमुख वक्ते व अतिथी मान्यवरांचा महापुरुषांचे ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.

  प्रमुख वक्ते पी.डी. पाटील सरांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट व संघर्ष उलगडला. बाबासाहेबांचे चरित्र संघर्षाची मशाल असून आपल्याला ऊर्जा व प्रेरणा देणारे आहे. बाबासाहेब अर्थतज्ज्ञ, इतिहास संशोधक, विचारवंत, राजकीय अभ्यासक, शेतकरी नेते, घटनेचे शिल्पकार असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असल्याचे मत पी.डी. पाटील यांनी व्यक्त केले. प्रमुख वक्ते लक्ष्मणराव पाटील यांनी बुद्ध, कबीर, भिमराव, फुले या धरतीवर जन्मले…. या गीतातून महापुरुषांना वंदन केले. शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर म्हणजेच स्वातंत्र्य – समता – न्याय आणि बंधुता होय. महापुरुषांना जाती – जातीमध्ये भेद करून आपण वाटून घेतले आहे, ही गोष्ट बहुजन समाजासाठी धोकेदायक आहे. बाबासाहेब आंबेडकर, वीर एकलव्य, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याबद्दल पाटील सरांनी माहिती दिली.

  वैचारिक प्रबोधन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंप्री खु. येथील सरपंच सरलाताई बडगुजर होत्या. प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील सर व विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच मंगलआण्णा पाटील , ग्रामपंचायत सदस्य – ज्ञानेश्वर बडगुजर, सरलाबाई लोखंडे, शांताराम मोरे, प्रकाश लोखंडे, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे, ओ.बी.सी मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, राष्ट्रीय किसान मोर्चा धरणगाव चे शहराध्यक्ष गोरख देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रोटानचे कार्याध्यक्ष सतिश शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक लोखंडे, गौतम दोडे, रमेश दोडे, कृष्णा मोरे, राहुल वाघ, राज अहिरे, गणेश अहिरे, मनोज बिजबिरे, सिद्धार्थ लोखंडे, सुशील तायडे, परेश तायडे, योगेश तायडे, शुभम नरवाडे विनोद, बीजबीरे आदींनी परिश्रम घेतले.