अधिसूचनेतील तरतुदी लागू करा- महाराष्ट्र माध्यमिक डी. एड. शिक्षक महासंघ

40

✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वर्धा(11डिसेंबर):- ‌ 8 जून 2020 च्या “क” प्रवर्गासाठी प्रसारित केलेल्या अधिसूचनेतिल तरतुदीनुसार पदवीधर डी एड (दोन वर्षे पाठ्यक्रम ) शिक्षकांचा समावेश सेवाजेष्ठतेच्या प्रयोजनात प्रवर्ग क मध्ये त्वरित करण्याविषयी कार्यवाही लागू करण्यास शासनाकडून होत असलेल्या चालढकलपणाचा महाराष्ट्र माध्यमिक डी.एड. शिक्षक महासंघाने आंदोलन करून निषेध नोंदविला. निषेधाचे निवेदन उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद वर्धा.यांना देण्यात आले. ‌ ‌ राज्यातील माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता ठरविण्यासाठी महाराष्ट्र खाजगी कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये तरतुदी दिलेल्या आहेत.

त्यातील नियम 12 अनुसूची “फ “मधील भाग दोन मध्ये माध्यमिक शाळेतील शिक्षकांची ज्येष्ठता प्रवर्गनिहाय असून त्या त्या प्रवर्गासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्या शिक्षकांना संबंधित प्रवर्गात स्थान देण्यात येते परंतु माध्यमिक शाळातील पदवीधर डी.एड.दोन वर्षे पाठ्यक्रम शिक्षकांच्या प्रवर्गाबाबत नियमावलीत कुठेही स्पष्ट उल्लेख नाही, त्यामुळे अनेक शाळा /संस्था पदवीधर दोन वर्षे पाठ्यक्रम शिक्षकांना प्रवर्ग ड ,इ मध्ये अंतर्भूत करून नियमबाह्य सेवाकनिष्ठ दाखवून पदोन्नती पासून वंचित ठेवतात. पदवीधर डी. एड. दोन वर्ष पाठ्यक्रम शिक्षकांचा प्रवर्ग निश्चित करण्याबाबत शासनाकडे संघटनेच्या वतीने वारंवार निवेदने देऊन मागणी करण्यात आली. अप्पर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी 8 जून 2020 च्या अधिसूचनेद्वारे पदवीधर डी. एड .दोन वर्षे पाठ्यक्रम शिक्षकांना प्रवर्ग क मध्ये अंतर्भूत करून नियमावलीत दुरुस्ती प्रस्तावित केली. प्रस्तावित दुरुस्तीला जवळपास दीड वर्षाचा कालावधी होत असतांना त्यावर कोणताही निर्णय झाला नसल्याने अधिसूचनेची कार्यवाही अद्यापही प्रलंबित आहे.

त्यामुळे आजही माध्यमिक शाळेतील पदवीधर डी .एड. दोन वर्षे पाठ्यक्रम शिक्षकांचा प्रवर्ग निश्चित नाही. पदवीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेतील स्थानाबाबत एकवाक्यता नाही. शासनाकडे संघटनेच्या अनेकदा दिलेल्या निवेदनाद्वारे वारंवार ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. संघटनेच्या निवेदनावरून शिक्षण मंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांनी माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा प्रवर्ग निश्चित करण्याबाबत त्यांचे दालनात शासनाच्या अधिकार्यां समक्ष 7 जानेवारी 2020 ला सभा आयोजित केली होती. सदर सभेमध्ये अधिसूचनेची कार्यवाही पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन संघटनेला अधिकार्यां तर्फे देण्यात आले होते. परंतु जवळपास बारा महिने झाले तरी अधिसूचनेची कार्यवाही पूर्ण झाली नाही.

अधिसूचनेची कार्यवाही पूर्ण व्हावी याकरिता संघटनेतर्फे अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला तरी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून चालढकल केली जात असल्याचे निदर्शनास आले अधिकाऱ्यांच्या चालढकल पणामुळे अनेक पदवीधर डी एड दोन वर्षे पाठ्यक्रम शिक्षक सेवाजेष्ठतेत योग्य स्थान न मिळाल्याने पदोन्नती पासून वंचित राहिले. याचा संघटनेतर्फे आक्षेप नोंदवून निषेध करण्यात आला .8 जून 2020 च्या अधिसूचनेची प्रलंबित कार्यवाही पूर्ण न करणे. शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेतील स्थान निश्चित करण्याबाबत शासनाचे उदासीन धोरणाचा निषेध करण्यासाठी सर्व नियम पाळून महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महासंघाने शासनाच्या विरोधात नारे निदर्शने करून आपला निषेध प्रकट केला. तसेच तरतुदीनुसार पदवीधर डी एड दोन वर्षे पाठ्यक्रम शिक्षकाचा समावेश सेवाज्येष्ठतेच्या प्रयोजनात प्रवर्ग क मध्ये त्वरित करण्याविषयी कार्यवाही करावी अन्यथा संघटना तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष पद्मा तायडे, उपाध्यक्ष राजेंद्र मसराम, जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष रेखा जुगणाके, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा सहसचिव किरण पांडे, अशोक तवले, विजय जुगणाके , राजेंद्र राऊत, जरोदेसर, चलाख मॅडम, कार्लेकर मॅडम, विजया गायकवाड मॅडम इत्यादी पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.