नवसमाज निर्मितीसाठी :- अलर्ट

40

नव्वदोत्तरीतील एक व्यासंगी,अभ्यासू चिकित्सक आणि उत्कृष्ट लेखक,समीक्षक म्हणून साहित्यक्षेत्रात ज्यांचा गौरवाने नामोल्लेख केला जातो असे कविवर्य प्रशांत नामदेवराव ढोले (देवळी) यांचा “अलर्ट” हा काव्यसंग्रह नुकताच प्राप्त झाला आणि अवलोकन केला.त्यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह असून सुधीर प्रकाशन वर्धा द्वारे प्रकाशित करण्यात आला.तत्पूर्वी सखोल अवलोकन आणि सूक्ष्म निरीक्षणातून “आंबेडकरी जाणीवाचा अक्षरप्रकाश” हा समीक्षाग्रंथ वाचकांच्या सेवेत दाखल झाला आहे.एक शिक्षक म्हणून सुसंस्कारित भावी पिढी घडविण्याची जबाबदारी पेलताना समाजमनही तितक्याच आत्मीयतेने अभ्यासले.कुठलाही आव न आणता किंवा कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात अकारण उभे न करता जे दृष्टीस पडले,अनुभवले तेच त्यांनी “अलर्ट” मध्ये मांडले. वर्तमानातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कायम असलेली आर्थिक-सामाजिक विषमतेची चौकट मोडीत काढण्यासाठी समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्या कवी प्रशांत ढोले यांनी सामाजिक जाणीव आणि नवसमाज निर्मितीसाठी आपली लेखणी झिजविल्याची अनुभूती येते. त्याचीच फलश्रुती म्हणजे “अलर्ट” म्हणावे लागेल. नेमकं काय मांडायचं आणि काय सुचवायचं आहे हे त्यांच्या काव्यसंग्रहाच्या शीर्षकातूनच स्पष्ट होतंय.
कवीला शालेय जीवनापासूनच काव्यरचनेची रुची जडली आणि ती त्यांनी आजतागायत इमानेइतबारे जोपासली.

प्रारंभी वैयक्तिक समाधानासाठी/आनंदासाठी काव्यरचना रचतानाच कालांतराने त्यांच्या लेखणीत समाजभान आलेत. प्रगल्भता आली. त्याचेच प्रतिबिंब अलर्ट मध्ये उमटले. कवींनी अत्यंत संवेदनशीलतेने समाजातील बरे-वाईट प्रसंग अलगदपणे टिपलेत अन काव्यात गुंफले. त्यांची ही काव्यरचना समाजप्रबोधनाशी निगडीत तर आहेच शिवाय समाजाचं वास्तव चित्र रेखाटणारी सुद्धा आहे. विद्यमान स्थितीतील विषमतावादी समाज व्यवस्थेत बहुजन समाजाची कशी घुसमट होतयं याची आवर्जून जाणीव करून देतात.पुरोगाम्यांसमोरील आव्हाने आणि विद्यमान स्थितीत तसेच भविष्यात पुरोगामी समतावादी समर्थकांनी घ्यावयाची भूमिका या बाबतचा वस्तूनिष्ठ लेखाजोखा त्यांनी अलर्ट मध्ये मांडला.समतेचे प्रेरणास्त्रोत,समाज सुधारक विषम समाजव्यवस्था, लोकशाही, शेतकरी पाऊस पाणी, भ्रष्टाचार,दहशतवाद मायबाप, सगेसोयरे अशा वास्तवाशी निगडित विषयावर त्यांनी अचूकपणे भाष्य करतानाच कवी वेगळ्या भूमिकेतून निसर्गाच्या सानिध्यात रमतात.निसर्ग अन समाज व्यवस्थेची अनोखी अशी सांगड घालून समाजातील दांभिकपणावर त्यांनी अलगदपणे बोट ठेवले आहे.समाजातील विघातक अनिष्ट,रूढी परंपरा वरही तितक्याच ताकदीने प्रहार करतात अन विज्ञानाची कास धरायला प्रवृत्त करतात.

बुद्ध,कबीर,चार्वाक शिवराय,फुले,शाहू,आंबेडकर यांचे कर्तुत्व आणि विचारांना प्रेरणास्थानी ठेवून कवीची काव्यरचना पुढे सरकत जाते. तथागतांनी जगाला मैत्री अन शांतीचा संदेश दिला.आज त्यांच्याच देशातील अशांतता, अराजकता बघून कवी अस्वस्थ होतात. आजच्या घडीला बरबाद करणारा दहशतवाद आणि त्यातून कधी न संपणारे दुःख, वेदना, तसेच भरचौकात पडणारे मूडदे,सज्जनांचा रोज होणारा सौदा,सर्वसामान्यांना होणारी मरणयातना आणि तरीही कुणालाही कुणाचा नसलेला लळा बघूनही कवी व्यथित होतात. दुःखी होतात.माणसाने माणसाशी माणसा प्रमाणे/प्रेमाने वागावे. जात,धर्म,पंथ बाजूला सारून सर्वांनी एकोप्याने/गुण्यागोविंदाने नांदावेत अशी कवींची रास्त अपेक्षा आहे.जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध हवे आहेत याची जाणीव करून देतात. मानवतावादी पर्यायाने बुद्ध,शिवराय,फुले शाहू आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत दृष्टिपटलावर आणतात. त्यासाठी कविनी क्रांतीची हाक दिली आहे. “येथे प्रकाशानो” (पृ.क्र.३१) या कवितेत कवी व्यक्त होतात की,

हाती घेऊन ये, क्रांतीचा विचार !
बुद्धाचा आचार, सोबतीला !

समाज शिक्षित झाला पण वैचारिक दृष्ट्या प्रगत झाला नाही. अद्यापही विषम समाजव्यवस्था कायम आहे. सामाजिक-सांस्कृतिक दहशतवाद त्याचे उत्तम उदाहरण आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही विकासाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचली आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल.उलट स्वजाती- धर्मातील सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विषमता नव्या स्वरूपातील वर्णव्यवस्थेला बळ देणारी आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशासाठी ही बाब नक्कीच गंभीर अन तितकीच विघातक आहे. नवसमाज निर्मिती ; त्यात स्नेह, बंधुभाव, समता असेल. त्यासाठी कवीला इमानेइतबारे समाजप्रबोधन आणि जनजागृती करण्याची आवश्यकता वाटते. म्हणून कवी “अंधाऱ्या वाटेवर” (पृ. क्र.२१) या काव्यरचनेत उल्लेख करतात की,

विषम समाजावर
करावे प्रबुद्ध हल्ले
पेटावे त्यातून मोहल्ले
देशभरात——-

सगेसोयरे-आप्तस्वकीयांच्या भावबंधाबाबतही यापेक्षा वेगळी अशी स्थिती कविच्या दृष्टीत पडली नाही.आपणच आपले कसे परके होत चाललेलो आहोत याचा उलगडा करण्यास कवीला यश आले.कटूतेला तडा अन विश्वासार्हतेवर भर देत कवी “लोकशाही”त (पृ. क्र.५४) व्यक्त होतात की,

दूर करा गुलामी
जवळ घ्या नाती
पेटवूया वाती
बंधुतेच्या !

स्वार्थीवृत्ती आणि भौतिक सुखाच्या नादात माणसं भावनाशून्य झाली.माणुसकी नाममात्र राहिली.गळे कापणारी, जखमेवर मीठ चोळणारी, अस्सल नात्याला खोट लावणारी, आभासी नाती जपणाऱ्या माणसाची इथे काही कमतरता नाही. संवेदनशून्य माणसाच्या गर्दीत कवी खऱ्या माणसाच्या शोधात निघालेला आहे. समाज, सुख, आकाशपर्व, येथे, शोधतो मी, कालची जखम,विचार इत्यादी काव्यरचना ह्या समाजातील बदलती प्रवृत्ती आणि माणसाला माणुसकी आणि कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या आहेत.
शेतकरी, पाऊस-पाणी, या विषयावर कवीने वेगळ्या धाटणीतील कविता रचल्या आहेत.बळीराजा राबराब राबतो तरीसुद्धा त्यांचा संसार हा सदा फाटकाच असतो.दुबारपेरणी आणि शेतमालाच्या रास्त भावाबाबत त्यांच्या माथी नेहमीच टांगती तलवार असते.कर्जाचा डोंगरही कधी पाठलाग सोडत नाही. आत्महत्या करी शेतकरी,शेतकरी बाप, सावकारी साप, त्यांच्या गळी, असे पारंपारिक वर्णन त्यांच्या काव्यात आले.पाऊस आणि पाण्याच्या बाबतीत मात्र वेगळ्या पद्धतीने काव्यरचना करताना चांगला कस लागलेला असावा. कवींनी पाऊस-पाण्याशी सामाजिकतेचा अप्रतिम असा सहसंबंध साधला आहे.त्यांच्या या काव्यात क्रांतीची बीजे आहेत.विद्रोहाची आग आहे. प्रस्थापित,धर्मांधता आणि अनिष्ट परंपरा रुढी वाद्यावर जबरदस्त प्रहार आहे. पाऊस आता, पाऊस प्राणसखा,चवदार पाणी, पाणी : काल आणि आज, पाऊस म्हणजे, पाऊस असा पडतो, पाऊस या काव्य रचना प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहे. यात सामाजिक जाणीव आहे. प्रबोधन आहे.विचाराची धगधगती ज्वाला आहे.मागास समाजाचा त्यात वर्तमान,भूतकाळ आणि भविष्यकाळ दडलेला आहे.
कवी व्यक्त होतात की,

आमच्या पिढ्यानपिढ्या
गारद केल्या पावसानं
आम्ही आस लावून आहोत युगा युगापासून
कधी बरसणार मानवतेचा पाऊस——–!!
(पाऊस पृ. क्र.४१)

पावसा पावसा
झिरपत येरे
क्रांती करत ये
दाही दिशा !
(पाऊस म्हणजे पृ. क्र.४६)

गढूळ झालेला समाज
बाबासाहेबांनी
ब्लिचिंग पावडर टाकून
केला निर्मळ
(पाणी काल आणि आज पृ.क्र ७२)

कवींनी प्रेम आणि मैत्रीचे अप्रतिम असे वर्णन केले आहे. आज जगाला याच भूमिकेची नितांत गरज आहे.कवीच्याच शब्दात, प्रेम म्हणजे कबीर वाणी, प्रेम म्हणजे बुध्द वाणी, प्रेम म्हणजे महावीराचे मौन, प्रेम म्हणजे पैगंबरांची शिकवण !, प्रेम असते मानवतेचे अस्तित्व, प्रेम असते शीलतेचे सत्व, प्रेम असते शुद्ध आचरण, प्रेम असते करुणेची गझल, प्रेम असते मातृत्व आचल, प्रेम असते रमा माऊली, प्रेम असते यशोधरा सावली (पृ. क्र.२६) तर मैत्री असते गीत मनुष्याच्या जीवनाचे, मैत्री असते प्रित कबीराच्या गाण्याचे, मैत्री असते बाग अंतकरणाची, मैत्री असते आग शितलतेची, मैत्री असते सदधम्माचे चाक, मैत्री असते स्वार्थाची राख, मैत्री असते येशू अन महावीर,मैत्री असते जगाची जहांगीर, मैत्री असते बुद्धाची करुणा, मैत्री असते जगण्याची प्रेरणा ! (पृ.क्र.६७) एकंदरीत सर्वधर्म समभाव आणि जीवनाचा सार विषद करताना शिवबाला संस्कार देणारी जिजाऊ, स्त्रियांना शिक्षण देणारी सावित्री आणि विश्वाला शांती देणारी मदर तेरेसाच्या रूपात आईची महतीही तितक्याच तळमळतेने/आत्मीयतेने गायिली आहे.सुखी,समाधानी आणि समृद्ध आयुष्याचा सार त्यांनी महापुरुषाच्या विचारात गुंफला आहे. मानवता धर्मापेक्षा कुठलाच धर्म श्रेष्ठ नाही हे त्यांनी आवर्जून सांगितले.
पुरुष प्रधान संस्कृतीत पतीच्या पश्चात पत्नीची होणारी हेळसांड सर्वश्रूत आहे.विकृत समाज वातावरणात पतीविना स्त्रियांना जगणे मुश्किल होऊन जाते. अशा स्त्रियांना नाउमेद न होता कवी लढण्यास प्रवृत्त करतो.जगण्याची ऊर्जा देतो. लढण्यासाठी बळ देतो. “जीवनयुद्ध” (पृ. क्र.२४) मध्ये कवी विषद करतात की,

प्रिये
मी मेल्यावर माझ्या प्रेतावर
अश्रू ढाळू नकोस,
येणाऱ्या संकटांना सामोरे जा
आणि लढ एकटीच जीवनासोबत———-

अनेक समाज सुधारकांच्या अथक प्रयत्नांनी भारतातील विषमतावादी समाजरचना मोडकळीस आली. भारतीय संविधानाने कायद्याच्या चौकटीत आणले. संविधानानेच स्वातंत्र्य, समता,बंधुत्व व न्याय तत्व बहाल केले. अधिकाराबरोबरच कर्तव्यही सांगितले. म्हणूनच बहुजनांना सर्वांगीन प्रगती साधता आली आणि हीच बाब प्रस्थापितासाठी दुखरी नस ठरू लागली. संविधानावर प्रश्नचिन्ह आणि संविधान पूर्वस्थिती आणण्यासाठी प्रस्थापित कुठलीही संधी सोडत नाही. येथील सुपीक बुद्धभूमीत एखादा कांतीकारी भीम पुन्हा उगवू नये याची ते खबरदारी घेत आहे. अशा स्थितीत बुद्ध,शिवराय, फुले-शाहू-आंबेडकरांची शिकवण- विचारधाराच तारणारी आहे.त्यांच्याच विचाराची पेरणी तसेच मानवी समाजाच्या कल्याणासाठी आणि नवसमाज निर्मितीसाठी भारतीयांनी अलर्ट असले पाहिजे असा सूचक इशारा कवी देतात.

हा काव्यसंग्रह आंबेडकरी चळवळीतील सच्या कार्यकर्त्यांस अर्पण केला आहे. यावरून कवीची उंची आणि आंबेडकरी चळवळी प्रति असलेली प्रचंड आस्था अधोरेखित करते. यात एकूण ४९ काव्यरचना आहे. अभंग, मुक्तछंद, गझल, गेय इत्यादी प्रकार त्यांनी उत्तम रित्या हाताळलीत.प्रस्तावनेत प्रा.डॉ. मंगेश बनसोड यांनी कवीचा काव्यप्रवास आणि अपेक्षित समाजरचना उत्तमरित्या रेखाटली.सुधीर गवळी (प्रकाशक) यांनी कवीचे ध्येय आणि भाऊ गावंडे यांनी आहे त्या परिस्थितीत बदल व्हावा ही कवीची इच्छा समर्पक शब्दात मांडली.संजय ओरके यांनी मुखपृष्ठ आणि अंतरंगातील रेखाटने काव्याला नक्कीच बोलके करणारे आहेत.एकंदरीत हा काव्यसंग्रह संग्रहीत ठेवावा असाच आहे. हा काव्यसंग्रह वाचक आणि रसिकांच्या पसंतीत नक्कीच उतरेल असा मला ठाम विश्वास आहे. कविवर्य यांना पुढील सकस साहित्यनिर्मिती आणि यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा………….!!!

कवितासंग्रह :- अलर्ट
कवी :- प्रशांत ढोले
मोबाईल क्र. ९९२३३०८६३८
प्रकाशन :- सुधीर प्रकाशन वर्धा
पृष्टे :- ७४
स्वागतमूल्य :- १०० रुपये
—————————————-
✒️प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे(अर्थशास्त्र विभाग प्रमुख
श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा
तालुका धामणगाव रेल्वे,जिल्हा अमरावती)मोबाईल:- ९९७०९९१४६४
—————————————-