धास्ती आणि ताणाला थारा नको

33

शत्रूला हरवायचे असेल तर त्याचे मनातून खच्चीकरण केल्यास , शस्त्र हातात न घेता अर्धी लढाई जिंकता येते . शिवतंत्राने जगाला नवा अध्याय दिला आहे . शायीस्ताखानाची फक्त बोटे कापली . धास्तीने शायीस्ताखान सोडा इतर सरदारांनी स्वराजकडे वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत केली नाही . पराभव आधी मनात होतो . कार्याच्या प्रारंभी किंतु परंतूचे भाकड जंजाळ उमेदीची आहुती देते . आपली नकारात्मकता सर्व ऊर्जा आतल्या आत विसर्जित करते . मनातील खेळ ज्या स्फूर्तीचा असेल त्या आवेगाने कार्याची परिपूर्ती केली जाते . ‘ मन करा रे प्रसन्न , सर्व सिद्धीचे कारण .’ तडीस जाण्यासाठी मन प्रवृत्त असावे लागते . जेवण करायचे म्हटले तरी प्रवृत्त मन नसेल , तर जेवणाची गोडी वाटत नाही . अपचनाचा धोका टाळता येत नाही . हाती घेतलेल्या कार्याचे काठिण्य नव्हे तर मनातील ताण उर्मीचा झरा आटवत नेते . रणांगणात उतरण्यापूर्वी तलवार म्यान होण्याचे कारण , मनावर पडलेला ताण .

कामाने कोणी मरत नाही . मनावर आलेले दडपण मरणप्राय यातना देत जाते . सडकेवर खड्डे खोदणारे , काबाडकष्टात दिवसरात्र झिजणारे आनंदाने घास पोटात ढकलत सुखाची झोप घेतात . याउलट साऱ्या सुखसोई असताना मनावर नको तो ताण घेत दवाखान्याच्या चकरा मारणारे कित्येक आहेत . ताणाचे रसायन इतके भयानक असते की , डॉक्टरांचे उपचार थिटे पडतात . मनाला ताण नको वास्तवाचे भान पाहिजे . म्हणजे चालणाऱ्या गाडीचे चाक कोणत्याच चिखलात रुतून पडणार नाही . डोक्यावर जणू पहाड कोसळला ह्या आविर्भावात वावरणारे जमिनीवरील साधा खडा उचलू शकत नाही . कोणतीही भाडभिड न ठेवता , मला मिळवायचे आहे . ही उर्मी पहाडाला जमीनदोस्त करते , हा इतिहास खोटा नाही . आपल्या खेड्यातून शहराकडे जाण्यासाठी पर्वताच्या अनेक अडथळ्यांना पार करावे लागते . यामुळेच आपली पत्नी मरण पावली . यानंतर कोणालाही असा त्रास होऊ नये , म्हणून मांझीने ध्यास घेऊन सतत बारा वर्षे एकट्याने पहाड फोडून रस्ता तयार केला .

 केल्याने होते , आधी केलेची पाहिजे .’ पण आमचे मन तयार नाही . कामाचा नाहीतर फालतूचा ताण घेऊन जगणारा एक दिवस तुटणारच . तुटता कामा नये , लवचिकता टिकली पाहिजे ; तर ताण विसरावे लागेल . नको तो ताण घालून घरात वावरणारी गृहिणी स्वयंपाक बिघडवते . अख्खे कुटुंब त्रस्त होते . ताणाचे परिणाम एकट्याला नाही इतरांनाही प्रभावित करीत जातात . हा भयानक आजार जेवढा दूर ठेवता येईल तेवढे हितकारक आहे . ताण आले की , साऱ्या इच्छा मृतवत होतात . प्रवाहितेला मूठमाती मिळते . नित्यनेमाच्या कामात कोणाच्या पोटात मळमळ तर कोणाचे डोके जडजड होते . हातात हत्यार उचलण्याआधी विचाराने विकारी गर्भगळीत काय तिर मारणार ? हा संशोधनाचा विषय . ध्येय गाठण्यासाठी शरीराचे वारूळ करणारे होऊन गेले . पण माझी शर्टिग बिघडू नये , कपड्याला डाग पडणार नाही , यासाठी चिंतीत असणारे चेहऱ्यावरची माशी उडू देत नाहीत . अशा सुतकी मनःस्थितीचे जीवनमार्गात ठेचकाळत राहतात . ताणात जगू तेवढे आयुष्य निरर्थक . चालत्या गाड्याला खुट मारण्याचे काम ताण करीत असते .

हरण्याचा ताण , पडण्याचा ताण , आईवडिलांचा ताण , समाजाचा ताण , जे ओळखत नाहीत त्यांचा ताण , कोण काय म्हणेल याचा ताण . पण मला काय वाटते , याचा कधीच विचार केला नाही . आयुष्यात कोण कोणाला पुरतो ? कोणासाठी कोणी थांबत नाही . जो तो स्वतःचा विचार करीत असतो . उगाच डोक्यात घेऊन दडपणाचे ओझे वाहण्यात आयुष्याचे खोबरे होते . जिंकायचे आहे , उभे राहायचे आहे , स्वतःचे जग निर्माण करायचे आहे , तर थांबता कामा नये . सातत्याने पाठपुरावा करताना किंतु परंतुला फारकत द्यावी लागेल . किंतु परंतुचे जंतू डोका सडवतात . निरोगी पीक हवे असेल , तर सुपीकता टिकली पाहिजे . हमीचे पीक घ्यायचे , मग जमिनीत कचरा होणार नाही याची दक्षता घ्या . कचरा झाल्यानंतर फवारणी करण्यात शक्तीचा अपव्यय आहे . त्यापेक्षा कचऱ्याचा शिरकाव होऊच द्यायचा नाही .

चिता चिंता समानास्ति , बिंदूमात्रे विशेषीता ।
चिता दहति निर्जीव , चिंता दहति सजीव ।।

चिता आणि चिंता यात एका बिंदूचा फरक आहे . चिता निर्जीवाला जाळत असली तरी चिंता सजीवांचे जीवन जाळत नेते . गरज नसताना चिंतेत पोखरण्यापेक्षा कार्य करण्यात झिजलेल्या देहाचे चीज होते . मनाच्या गाभाऱ्यात सहज साध्य करण्याची वृत्ती वृंद्धीगत होणे गरजेचे . तरच यशाची पताका डौलात फडकेल . चुका होतील होऊ द्या . चुकातून नवे सत्य उजेडात येत असते . एडिसनचे ९९ प्रयोग फसले . म्हणून लागलेला शोध १०० व्या प्रयोगाचा आविष्कार नसून ९९ प्रयोगातून आलेले शहाणपण आहे . फसलेल्या ९९ प्रयोगांनी काय करायला हवे , काय करू नये याचा साक्षात्कार दिला . तेव्हा १०० व्या प्रयोगात यशस्वी होता आले . चुकणार या दडपणात कित्येक गर्भगळीत होऊन बसतात . मग पुढचे पाऊल पडणार कसे ? अपयश आले तरी चुका सुधारण्याची संधी देऊन जाते . हीच संधी विकासाच्या वाटा तयार करीत असते . अपयश येणार म्हणून कच खाऊन मरणप्राय आयुष्याला फरफटत नेल्यासारखे होईल .

भीतीपोटी ताण घेऊन सर्जनाची हत्या करण्यात मर्दुमकी नाही . चुकत चुकत आलेले शहाणपण जगण्याचे धडे देऊन जाते . दडपणात जगण्याआधीच माणूस मरतो . मेलेल्या आयुष्याची औषधपाण्यात बोळवण करून भुईला भार होण्यापेक्षा कार्य करीत शरीराची माती झाली तर कीर्तीचा टिळा यशाच्या भाळावर तेज आणेल . आपल्याला कोणीच अपयशी करू शकत नाही , आपल्या अपयशाचे धनी आपणच असतो . अपयशाला नमवता येते . त्याला हरवण्यासाठी मनाची तयारी हवी . मनातील ताण फेकून सकारात्मकतेची लाट प्रवाहित झाली पाहिजे . माणूस कामाने कमी ताणाने जास्त मरतो . ‘ आनंदाचे डोई आनंद तरंग .’ आनंदी मनाने कामाचा ध्यास घेऊन ताणाला जीवनातून हद्दपार केले त्याने यशाला गवसणी घातलेली आहे.

✒️लक्ष्मण खोब्रागडे(जुनासुर्ला,ता.मूल,जि.चंद्रपूर)मो:-९८३४९०३५५१