आता आरक्षण हक्क कृती समितीचा मुंबई मंत्रालयावर दि 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारी प्रचंड कार मोर्चा धडकणार

25

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.20डिसेंबर):-भारतीय संविधानाचे शिल्पकार प पू डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानकर्त्यांनी देशातील विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करण्यासाठी मागासवर्गीयांचा भारतीय सत्ता – प्रशासनातील सहभागासाठी व त्यांचे हजारो वर्षापासूनचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण दूर होण्यासाठी दिलेले संविधानिक हक्क व सुविधा जातिवादी, चातूर्वणाने पछाडलेल्या काही आरक्षण विरोधकांनी कटकारस्थान करून , सत्तेचा दुरुपयोग करून मा.सर्वोच्च न्यायालयाने जो अंतिम निकाल येईल त्यास अधिन राहून मागासवर्गीयांचे 33%आरक्षण देण्याचे आदेश दिले असताना व त्याआदेशानुसार केंद्र सरकारनेही परिपत्रक काढून निर्देश दिले.असतांना सुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारने मागासवर्गीयांच्या तोंडातला घास काढून मागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी वरच्या पदावर जाऊ नये म्हणुन त्यांचे 33% आरक्षणच बंद केले आहे.एका समाजाला खूष करण्यासाठी सरकारने मागासवर्गीयांच्या हिताचा बळी देऊन विश्वासघात केला आहे.

तसेच केंद्र व राज्य सरकार बहुमताच्या जोरावर मागासवर्गीय विद्यार्थ्याचे शैक्षणिकशुल्क, शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती व उच्चशिक्षणातील आरक्षण सुध्दा संपुष्टात आणले आहे,सरकारी बँका/ कंपन्या/विभागांचे खाजगीकरण व कंत्राटीकरण करून आरक्षण संपवण्यात येत आहे, नवीन अन्यायकारक कामगार कायद्यानुसार कामगारांना 8 तासा ऐवजी 12 तास वेठबिगारीसारखे काम करावे लागणार, जातीयवाद्याचे मागासवर्गीयांच्यावरील वाढते अत्याचार इत्यादी प्रकारामुळे गोरगरीब, मागासवर्गीयांची चोहोबाजूने मुस्कटदाबी करून प्रगती रोखण्याचे कटकारस्थान सुरू आहे. म्हणजेच मागासवर्गीयांना शिक्षणाची दारे बंद करून सरकारी नोकरीत प्रवेशच करू न देणे, नोकरीत आहेत त्यांना पदोन्नती न देता आहे त्या ठिकाणीच खितपत ठेवायचे आहे.

खाजगी कंपन्यात आरक्षणच नसल्यामुळे मागासवर्गीयांना तेथेही नोकऱ्या मिळणार नाहीत अशी योजनाच आरक्षण विरोधकांनी केलेली आहे असे स्पष्ट होत असल्यामुळे या प्रश्नावर विविध मागण्यांसाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी-26 जून 2021 रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता. त्यानंतर मंत्रालयावर निदर्शने, मागासवर्गीय मंत्री, खासदार, आमदार यांच्या भेटी द्वारे आक्रोश निवेदने देऊन सुद्धा सरकारने , खासदार, आमदार यांनी त्याची योग्य दखल घेतली नाही व आरक्षण हक्क कृती समितीला बैठकीला बोलावले नाही वा विश्वासात घेतले नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात मागासवर्गीयांत अधिक तीव्र असंतोष पसरला असल्याने आता महाराष्ट्रातील सर्व SC, ST, DT, NT, SBC, OBC समाज घटक , विद्यार्थी, कामगार, कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या संघटनांचा प्रचंड कार मोर्चा काढण्याचा निर्णय आरक्षण हक्क कृती समितीची कोअर कमिटी, मागासवर्गीय संघटना प्रमुख पदाधिकारी,राज्य प्रतिनिधी, जिल्हा निमंत्रक व समन्वयक यांच्या दि.17/12/2021 रोजी च्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला.

तसेच कार मोर्चा दीक्षाभूमी (नागपूर), चैत्यभूमी (मुंबई), संभाजी राजे समाधी स्थळ/महात्मा फुले भिडे वाडा (पुणे) , छत्रपती शाहू महाराज राजवाडा चौक (कोल्हापूर), चवदार तळे /छत्रपती शिवाजी महाराज रायगड किल्ला (महाड) या व याप्रमाणे त्यात्या जिल्ह्यातील स्मृती/स्फुर्ती ठिकाणावरून प्रत्येक जिल्ह्यातून 20-25 कार सह जिल्ह्यात ठीकठिकाणी प्रबोधन करून दि.2/2/2022 रोजी मुंबई मंत्रालयावर सुमारे 1 हजार कारचा मोर्चा धडकणार असल्याचे कोअर कमिटी सदस्य तथा राज्य निमंत्रक सर्वश्री हरिभाऊ राठोड,(माजी खासदार ) सुनिल निरभवने, अरुण गाडे, एस. के. भंडारे, सिद्धार्थ कांबळे, आत्माराम पाखरे, संजीवन गायकवाड, डॉ. नितीन कोळी, शरद कांबळे, डॉ. संजय कांबळे बापेरकर, प्रा. मधुकर उईके, अनिलकुमार ढोले, संजय खामकर, फरेन्द्र कुतिरकर, राजकुमार जवादे, डॉ. बबन जोगदंड, सुरेश पवार , शामराव जवंजाळ , अरुण जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.