आपल्याच माणसात खेचाखेची…!

26

खेकडा! माहिती असेलच आपल्याला. बहुदा सर्वांनी पाहिला असेल; आणि खवय्यांनी त्याच्या रस्याचा आनन्दही लुटला असेल. असो! या खेकड्याला पाहिल्यानंतर आणि आस्वाद घेण्यापूर्वी फार वर्षांपासून एक गोष्ट त्याच्यासंबंधी जी आपल्या संबंधात (म्हणजे माणसाच्या संबंधात) आहे; ती ऐकत आलो आहे. तुम्हीही ऐकली असेल. ती गोष्ट म्हणजे- खेकडे एकमेकांना पुढे जाण्यापासून रोकतात, खेचतात. त्यांना वाकड्या आकाराचे पाय असतात, जे त्यांना वाकड्यात जायला मदत करतात. त्याचा एक फायदाही त्यांना होतो म्हणा; म्हणजे ते पाण्यातून बाहेर येऊ शकत नाहीत. ज्याने बाहेरील शिकारीपासून त्यांचे संरक्षण होते. ते असे का करतात? हे जलचर प्राणी संशोधक नाहीतर तज्ज्ञांना माहिती असेल. पण, एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मला तरी ठाऊक नाही. मग, माझ्यासारख्याच अनेक व्यक्तींनी या वृत्तीला ‘खेकडवृत्ती’ म्हणून नाव दिले. अर्थात ती वृत्ती आहे खेकड्यांची, पण त्याचा सहसंबंध जोडला गेला माणसाशी! कारण, माणसाला बुद्धी आहे, जो सहसंबंध जोडू शकतो आणि तोडूही शकतो.

इथे विषय आहे तो माणसातल्या खेचाखेचीचा! म्हणजे रस्सीखेच म्हणत नाही मी. तिथे तर स्पर्धेचा निख्खळ आनन्द मिळतो. जिंकले कोण? हे महत्वाचे नाही. रस्सीखेचमध्ये स्वतः जिंकायचे असते; आणि ‘खेचाखेचीत’ दुसऱ्यांना जिंकू द्यायचे नसते. म्हणजे हरवायचे पण नसते बरं! कारण स्पर्धाच असेल तर, समोरच्या व्यक्ती हरला म्हणजे थोडक्यात आपण जिंकलो. इथे जिंकू द्यायचे नसते. भले आपण त्या स्पर्धेत दूर-दूर नसलो तरी! हीच ती ‘खेकडवृत्ती’. आपला वेळातला वेळ काढून लोकांच्या कामात नको तिथे दखल देणे, व त्यांचे काम न होऊ देणे हा प्रमुख उद्देश असतो. मग, लोकांचे नुकसान होताना आपला बहुमूल्य वेळ गेला तर गेला. तुमचे नुकसान झाले तर झाले. इथे तुमच्या वैयक्तिक जीवनाच्या नुकसानीतून खऱ्या अर्थाने तुमचा पराभवच होत असतो. पण, तो कधी पराभव म्हणून आपल्याद्वारे पकडल्या जात नाही. पण, विरोधकाचे नुकसान जर होत असेल, तर तो आपला विजय होतो. मग, तुमचा वेळ जावो की पैसा समोरच्याचे नुकसान होणे आवश्यक आहे.

ही खेचाखेची बहुदा आपल्याच माणसात जास्त होते. कारण, शाहरुख खान सुप्रसिद्ध अभिनेता आहे, तथा मुकेश अंबानी श्रीमंत आहेत. खेकडवृत्ती असणाऱ्या लोकांसाठी त्यांची प्रगती नजरेत जळायला पाहिजे. पण, इथे तसे होत नाही. यांना त्यांचे बरे दिसत नाही की वाईट. कारण, ते यांच्या ओळखीचे नसतात तसेच यांच्या ओळखीतल्या कोणाच्या ओळखीतले नसतात. त्यामुळे त्यांच्यावर जळून उपयोग नसतो. कारण, ते त्यांना आणि त्यांच्या विरोधकांना प्रभावित करत नाहीत. त्यांचा विषयही रोज घरी किंवा परिसरात निघत नाहीत; आणि निघाला तरी त्रयस्थ म्हणून पाच मिनींटात आटोपला जातो. मग, आपल्या माणसात खेचाखेचेची कशी होते? सांगतो!

तुमच्या पाहुण्यातला, मित्रातला, किंवा शेजारी माणूस चार पैसे कमावून गाडी-घोडी, सोने-नाणे घेऊन ‘श्रीमंत’ नावाच्या कॅटेगरीत जात असेल तर तिथून ‘बरे न दिसण्याचा’ व लागूनच ‘खेचाखेची’चा प्रकार सुरू होतो. आता हा प्रकार इथेच का बरं सुरू झाला? कारण तुमच्या परिचयातील तो व्यक्ती तुमच्या परिचयातील इतर व्यक्तींचा म्युच्युअल फ्रेंड असतो. जो त्यांनाही प्रभावित करतो. जो उठ- बस नजरेसमोर असतो. जो नजरेत भरतो पण सळतोही तितकाच! त्यामुळे तो आपले स्थान कमजोर करत असतो. त्याचा मोठेपणा व नावलौकिक आपल्याला सहन होत नाही, पाहवतही नाही. मग, सुरू होते खेचाखेची.

कशी असते ही खेचाखेची? खूप सोपी असते. नुकताच श्रीमंत होत असलेल्या व्यक्तीप्रकरणी फालतू आणि चुकीची ओरड करणे, दोन नंबरचा पैसा म्हणणे, इतर बाजूंनी बदनामी करणे, वैगरे ,वैगरे माणशी खेकड्याची उठाठेव सूरु होते. त्याने इतरांवर काहीही परिणाम होत नाही. हं! जर ते खेकडे नसतील तर! अन्यथा काही इलाज नाही. खेचाखेची करणाऱ्याला यात दुसऱ्याची बदनामी केल्याने अघोरी समाधान मिळते. शांत झोप लागेल वाटते, पण नवनवीन कुरापती करण्यापायी तीही दूर पळते.

आपली माणसे ही संकल्पना आता कल्पना झाली आहे. आपली माणसे ही आता स्वतःच्या मोठेपणाचा बँड ऎकवण्यापुरती शिल्लक राहिली आहेत. कुठे -कुठे आपल्या माणसांना कमी लेखून आपण मोठे आहोत हे सिद्ध करणे यासाठीच ती उरली आहेत. कारण दुसऱ्या माणसात ही चिल्लर असतात; कारण तिथे ठोक भरपूर असतात.

आपली माती, आपली माणसं! म्हणणे सोपे आहे. पण, इथे आपली माणसेच आपली माती करत आहेत. कारण दूरची माणसे त्यांच्या मातीत खुश आहेत. आपणही त्यांना दूरचे मानतो म्हणून तेही जरा मस्त आहेत. पण, ज्यावेळेस ती जवळ येतील, तेव्हा त्यांची माती निश्चित आहे. म्हणून, माणसे ओळखा! आपली दूरची ही कॅटेगरी पाडत बसू नको! कारण त्या कॅटेगरीतच सगळा घोळ आहे.जिथे आपला इंटरेस्ट वाढतो, जिथे तुमची पत कमी झाली वाटते, जिथे शब्दाला वजन कमी होते, जिथे दुर्लक्ष सुरू होते, तिथेच खेचाखेची सुरू होते.

म्हणून अनावश्यक महत्व कोणाला देऊ नका; आणि विनाकारण नको तिथे नाक खुपसू नका. पण, इतके नक्की आहे, खेकडे आजूबाजूला पसरलेले असले तरी त्यांच्या तोंडावर लाथ मारून जिंदगी तर जगणेच आहे.

मी-मी करणारे

म्याव-म्याव करतील

वेळ येईल तेव्हा,

तुम्ही आपले बिनधास्त रहा

जोपर्यंत धसका घेणार नाही

रोज नवा खेकडा

मागे खेचण्याचा…

 

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती,नांदेड(मो:-8806721206)