NPS खाते काढण्यास सक्ती करण्यात येऊ नये,शिक्षण आयुक्तांचे आदेश

34

🔹आमदार कपिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.23डिसेंबर):-काही जिल्ह्यांत GPF खाते बंद करुन NPS खाते उघडल्याशिवाय पगार पत्रके घेणार नाही अशी पत्रके अधिकाऱ्यांनी काढली आहेत.मुंबईतही अनेक शाळांना NPS खाते उघडल्याशिवाय पगारपत्रके घेणार नाही असे वेतन अधिक्षक तोंडी सांगत असून ही बाब गंभीर असून यासंबंधी काढलेली सर्व पत्रके रद्द करण्यासंदर्भात आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण आयुक्तांना पत्र पाठवून पाठपुरावा केला होता.

आमदार कपिल पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सर्व शिक्षण उपसंचालक,शिक्षणाधिकारी,वेतन अधिक्षक यांना यासंदर्भात निर्देशित केले आहे.मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना NPS उघडण्याबाबत सक्ती करु नये व संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन बंद होणार नाही याची दक्षता घेण्यास शिक्षण आयुक्तांनी बजावले आहे.GPF खाते बंद करुन NPS खाते उघडल्याशिवाय पगारपत्रके घेणार नाही याबाबत संबंधित कार्यालयांनी काढलेली पत्रके तात्काळ रद्द करण्यात यावी व यापुढे अशा प्रकारची पत्रके परस्पर काढण्यात येणार नाही असेही शिक्षण आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावले आहे.

आमदार कपिल पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याबद्दल त्यांचे शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे,राज्य संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर, विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे, जिल्हाध्यक्ष भास्कर बावनकर, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम टोंगे, कार्यवाह राकेश पायताडे, उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर हटवार, सतिश डांगे, प्रशांत सुरपाम, प्रविण पिसे,सुरेश मडावी, दीपक तिवाडे आदींनी आभार मानले आहे.