ओमायक्राॅनच्या तिव्र प्रसारामुळे शाळांना पुन्हा टाळे लागण्याची शक्यता

26

🔸शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे इशारात्मक प्रतिपादन

✒️सुनील शिरपुरे(झरीजामणी प्रतिनिधी)

झरीजमनी(दि.23डिसेंबर):-कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बराच काळ शाळा बंद होत्या. तो प्रादुर्भाव ओसळल्यामुळे नुकतीच विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु महाराष्ट्र सरकार पुन्हा शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. देशात ओमायक्राॅनची भीती वाढत असताना महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा विचार करू शकते असे म्हटले आहे. देशात सध्या ओमायक्राॅनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील राज्यातील शाळा, महाविद्यालयांना टाळे लागले होते. त्यानंतर आता राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु आता पुन्हा शाळा बंद होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ओमायक्राॅन प्रकरणांबाबत वाढलेल्या चिंतेला उत्तर देताना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही शक्यता असल्याचे म्हटले आहे.

पत्रकारांशी बोलताना गायकवाड यांनी सांगितले की, प्रकरण वाढत राहिल्यास सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते. देशातील एकूण 213 ओमायक्राॅन प्रकरणांपैकी महाराष्ट्रात 54 रुग्णांची नोंद केल्या गेली आहे. ओमायक्राॅनची प्रकरणे वाढत राहिल्यास आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. दरम्यान काही राज्यांमध्ये ओमायक्राॅनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून तिचे पालन करण्याचे निर्देश सर्वच राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

केंद्रिय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्याचं म्हटले आहेत. रुग्णवाढीचा दर अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये विर्बंधासाठी धोरणे राबविण्याच्या शिफारशी केल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवले असून स्थानिक परिस्थितीनुसार काळजी घ्यावी असे सांगितले आहे. तसेच गरज पडल्यास मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावी असेही म्हटले आहे. गेल्या आठवड्यातील पाॅझिटिव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडसाठी 40 टक्के व्याप्ती असेल तर ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले जाऊ शकतात असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.