गुटखा, मटका व अवैध व्यवसायाचा जिल्ह्यात कळस ; आ. गुट्टे विधिमंडळात गरजले

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.28डिसेंबर):-करोना विघ्नाने सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांना ‘बुरे दिन’चा सामना करण्याची वेळ आलेली असली तरी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मात्र कधी नव्हे असे ‘अच्छे दिन’ बघायला मिळाले आहेत. लॉकडाउनच्या काळातही चोरट्या मार्गाने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री धडाक्यात सुरू असून, या गोरखधंद्यास आळा घालण्यास पोलिस व औषध प्रशासन कमी पडले आहे. गुटखा माफियांसोबतच या दोन्ही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमाई होत आहे. यावर आवर घालावा म्हणून पोलिस अधीक्षक यांच्याकडे गेलेल्या लोकप्रतिनिधी यांना अपमानास्पद वागणूक देऊन बाहेर काढणाऱ्या एस पी जयंत मीना यांच्या वर हक्कभंग दाखल करावा अशी गर्जना आ. रत्नाकर गुट्टे यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनसह संचारबंदी केली होती. या काळात संपूर्ण उद्योग व्यवसाय ठप्प झालेले होते. लॉकडाउनच्या काळात सर्वच छोटे-मोठे उद्योग बंद असताना गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची चोरट्या मार्गाने गंगाखेड सह जिल्ह्यात वाहतूक व विक्री सर्रास सुरूच होती. यामुळे गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची मात्र आर्थिक भरभराट झाली. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांतून रात्रीत गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ विशिष्ट स्थळी पोहचवले जात होते. या व्यवसायातील माफियांनी खोऱ्याने कमाई केली आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक यांच्या कडे दस्तुरखुद्द आ. गुट्टे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी गेले असता त्यांना अपमानित करून एसपी मीना यांनी कार्यालय बाहेर काढले, लोकप्रतिनिधी बाबत ही भूमिका असेल तर तिथे सर्वसामान्यांचे काय ? असा सवाल उपस्थित करून आ. गुट्टे यांनी विधिमंडळ अधिवेशनात सर्वांचे लक्ष वेधले.

जिल्हाभरात अनेक ठिकाणी गुटखा व तंबाखूजन्यपदार्थ खुले आम सुरु आहे.मात्र कोणतीही शासकीय यंत्रणा गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे.शासनाने गुटखा विक्री वर बंदी घातली असली तरी या बंदीच्या आदेशाची पायमल्ली करत तालुक्यात मुक्तपणे गुटखा विक्री व तस्करी होताना दिसून येते.ग्रामीण भागात राज्य माहामार्गाच्या बाजुला पाणटप-या व धाब्यावर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा प्रतिबंधीत गुटखा विकला जात आहे.व मटका खेळला जात आहे . पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा अन्न व औषध प्रशासनाची मेहरनजर या मटका खेळी व गुटखा विक्रेत्यांवर असल्याने बेकायदा विक्री फोफावत चालली आहे. गुटखा बंदीचा कायदा करुन सरकारने गुटखा विक्री तसेच उत्पादन व वाहतुकीवर निर्बंध लादले आहे. उत्पादनावर कार्यवाहीचे आदेश दिले. मात्र हे आदेश झुगारून लावत अर्थपूर्ण संबंध गुटखा तस्करांनी तयार करत अशा उत्पादनांची विक्री सुरुच ठेवली आहे. शासनाने जनहितार्थ मटका खेळ व गुटका बंदी तर केली पण काहि भ्रष्ट अधिका-यांच्या स्वताच्या आर्थीक फायद्यासाठी शासनाला असहकार्या करत असल्यामुळे गुटकाबंदिचा फज्जा उडाला आहे, असेही आ. गुट्टे यांनी म्हंटले .
.