महाराष्ट्रातील लोककलेच्या कोंदनातला अष्टपैलू हिरा

30

२८ व्या झाडीबोली साहित्य संमेलनात मिळालेल्या स्फूर्तीची ऊर्जा सोबत होती . मुर्झा पारडी येथून मी आणि झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर (ग्रामीण)चे अध्यक्ष भुभरीकार अरुण झगडकर व ताटवाकार संतोष मेश्राम स्वगावी निघालो . वाटेत झाडीबोली समृद्ध करणाऱ्या नाट्यमंडळाची मांदियाळी असलेल्या वडसा येथे पोहचलो . आरमोरीवरून आम्हाला घ्यायला आलेले आमचे संगी , इतिहाससंशोधक , गायक , वादक , गजलकार ,नाट्यकलावंत , अष्टपैलू व्यक्तीमत्व नंदकिशोर मसराम होते . वडसा येथे आल्या आल्या मनात घर करून असलेल्या व ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्यामुळे अधिक जवळ आलेल्या झाडीच्याच नाहीतर महाराष्ट्राच्या हिऱ्याची आठवण झाली . आमची गाडी राजसा रंगभूमीच्या कार्यालयाजवळ थांबली . भुभरीकार अरुण झगडकर यांनी विनोदाचा बादशहा हिरालाल पेंटर (सहारे) यांचा नंबर डायल करून भेटायचं आहे असे कळवले . कामाच्या व्यस्ततेत असूनही आम्ही आल्याचे कळताच , काम बाजूला सारून पाच मिनिटात कार्यालयात पोहोचले . लोककला जोपासत समाजप्रबोधन करणाऱ्या हिऱ्याच्या चैतन्यमय सहवासात जवळपास एक तास घालवला . चर्चेत पूर्वी माहीत असलेल्या अनेक पैलूपेक्षा हिराच्या अंतरात वाहणारी प्रतिभा , निगर्वी मन , कार्याप्रति असलेली निष्ठा , कृतज्ञतेचा झरा , सात्विकता , प्रेमळ ओलावा , विचाराची स्पष्टता , विद्रोह , आत दडलेला कवी अधिक उलगडत गेला .

मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या झाडीबोलीला जिवंत ठेवण्यासाठी नाटकांच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील जीवनपद्धती मांडण्याचा वसा घेतलेला हिरालाल पेंटर नावाचा वादळ . केवळ विनोदी शैलीतून लोकांचे मनोरंजन करीत नाही , तर पडेल त्या भूमिकेतून स्वतःला सिद्ध करतो .प्राथमिक शिक्षणाच्या पुढे मजल मारता आली नाही , पण प्रतिभशक्तीच्या जोरावर अनेक कसदार नाटकांचे लेखन त्यांच्या हातून घडत आहे . लिहायचे म्हणून लिहिणारे खूप भेटतील , पण यांनी समाजातील ज्वलंत समस्यांचा अभ्यास करून जागृतीचा वणवा पेटवलेला दिसतो . हृदयाची भाषा हृदयाला भिडते म्हणूनच हा हिरा लोकांच्या हृदयात घर करतो . रसिकांचा प्रचंड प्रतिसाद घेऊनही मातीशी नाळ जुळलेला हिरा कधी गर्वात वाहत गेला नाही . सामाजिक भान असल्याने जमिनीवर पाऊल ठेवून समाज उद्धारासाठी झटताना दिसतो . कलावंत म्हणून लोकांनी आपल्या गळ्यातला ताईत बनवलेला हा हिरा समाजउद्धाराचा मुकुटमणी आहे .

प्रसिद्धी मिळावी म्हणून सवंग विषयाला कवटाळत न बसता त्याला बगल देत उदात्त भावनेने जाती-पातीचे भीषण वास्तव , व्यसन , आदिवासींच्या समस्या , अंधश्रद्धा , भ्रष्टाचार , पोकळ कल्पना यावर सडसडून टीका करीत हल्ला चढवित आहे . मनोरंजनातून नितीमत्तेला जागवण्याचे पवित्र कार्य हाती घेऊन हा हिरा चंदनाप्रमाणे झिजून समाजनिर्मितीचा सुगंध देत आहे . मिरवण्यात फुशारकी न मारता , रात्रीचा दिवस करून वर्षभर नाटकातून समाजप्रबोधन करताना दिसतो . त्यासाठी त्यांच्यात असलेला तेज तरुण पिढीला लाजवेल . उत्तरोत्तर वाढत जाणारी चमक त्यांच्या आत्मविश्वासात अनुभवायला मिळते . स्वतःचे चारित्र्य जपताना सन्मार्गाची कास धरलेला हा अवलिया अद्वितीय . राष्ट्रसंताची शिकवण असल्याने राष्ट्रनिर्माणासाठी निरोगी समाजाचा ध्यास असल्याने लेखनातून चारित्र्याची जोसापना करण्याचा आग्रह धरतो . झाडीच्या उज्ज्वल संस्कृतीला शिखरावर नेणारा कळस म्हणून आमचा हिरा पात्र आहे . आदर्शाच्या खाणीतून निघालेला हिरा इतरांना मिसाल बनावा असा स्वयंप्रकाशित तारा .
विक्रमासाठी वाटेल त्या थराला जाऊन झटणारे खूप भेटतील . सन्मार्गाने समाजाला जागवत स्वतःचा विक्रम तयार करण्यासाठी झिजणारा हिरा अमूल्य . विविध समस्यांत हात घालून स्वतः लिहिलेल्या नाटकांचे २०० च्या जवळपास प्रयोग करूनही न थकणारा वाटाड्या . महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनमानसाच्या काळजावर अधिराज्य गाजवत आहे . हाताळलेले विषय आणि शब्दांची बांधणी इतक्या ताकतीची की , काही ठिकाणी एकाच नाटकाचे दोन दोन प्रयोग प्रयोग झाले . हा हिरा स्वतंत्र प्रवृत्तीचा असून कलेच्या आड येणाऱ्या कोणाचीही भिडमुर्वत ठेवत नाही .

याचा अनुभव कित्येकांना आला असेल . कलेशी तादात्म्य पावलेल्या हिराचा तेज कलाकारांच्या पंखात बळ देत जाते . हळव्या मनाची प्रामाणिकता खळ्यांसाठी कठोर होत जाते , हे हिराचे बलस्थान आहे . ही प्रेरणा नाट्यरंगभूमीच्या कृतीतून दिसून येते . वाईटाशी दोन हात करण्यासाठी शब्दांना धार चढवणारा हिरा काव्यातून सृजनाची अपेक्षा करतो , हे कित्येकांना माहीत नाही . त्यांचा नवा पैलू अनुभवायचा असेल तर , त्यांच्या कवितांची दखल घ्यावीच लागेल . नदीला कोणता पहाड अडवू शकत नाही . तसा हिराने मनातील निर्मळ भावनांचे दमन केले नाही . मनात उठणारे भाव त्यांनी काव्यबद्ध केले . त्याचे उपयोजन ते नाटकातून सातत्याने करतात . त्यातील उच्चकोटीचा भाव समाजजागृतीची पकड घेते . आशय सोज्वळ भाववृत्तीचे दर्शन देते .

राष्ट्रसंताचा वारसा लाभल्याने , ‘जळती हे जन ,देखवेना डोळा ‘। म्हणून कळवळा असलेला हिरा कीर्तनाच्या माध्यमातून समाजमन सुपीक करतो . सुपिकतेत भरभराट महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे . न्यूनगंडाच्या छायेत कित्येक रोपटे कोमेजले . पण आपल्या कमी शिक्षणाचा बाऊ न करता ,स्वजाणिवेतून स्वतःला पैलू पाडणारा हिरा कीर्तनातून चैतन्य अधिक खुलवत गेला . संतविचाराची माळ घालून विचाराची शेती फुलविणारा हिरा महाराष्ट्राचा खरा भूषण . हिराचे कित्येक पैलू सांगावे . महाराष्ट्राला लाभलेल्या या हिऱ्याजवळ जितके जाल तितके पैलू उजेडात येत जातात . आमचा हिरा जादूगर पण आहे . मायाजालात लीलया दोन तास अंधश्रद्धा पळविण्यासाठी प्रयोग करतो . डोळ्यावरील भ्रमाची झापड उघडण्यासाठी ढोंगाचा पर्दापाश करतो . या महान कार्यासाठी हिराचे जीवन सत्कारणी लागत आहे , हा पुरोगामी महाराष्ट्राचा अभिमान आहे .

जीवनाच्या वाटेवर हिराचा आणखी एक पैलू शिरपेचात मानाचा तुरा रोवते . त्यांची चित्रकला . नाटक , विनोद , कीर्तन , लेखन , काव्य आणि जादू यातून समाजाचे चित्र रंगवणारा हिरा ,आपल्या कुंचल्यातून चित्रांना जिवंतपणा देतो . त्यांना कोणत्याही कामाची लाज वाटत नाही . हाती पडेल त्या कामाला पूर्णत्व देणे इतकंच माहीत . एकदा मुलीकडे दिल्लीला गेले . त्यांची हुन्नर पाहून चार ते पाच बिल्डिंगच्या सजावटीचे काम मिळाले . त्यांनी आनंदाने स्वीकारून दिल्लीकरांचे मन जिंकले . उत्कृष्ट निर्माता , दिग्दर्शक म्हणून कित्येक कलावंताच्या आयुष्याला कलाटणी देऊन ओळख दिली .लोककलेच्या संवर्धनासाठी स्वतःच्या मुलाला तयार केले . अशा अनेक पैलूंचा हिरा , पुरस्कारासाठी भांडला नाही . जमिनीवर पडलेले चांगले असेल ते आपण उचलून घेतोच . कार्य प्रामाणिक असेल त्याची कदर होतेच .

महाराष्ट्राच्या या अष्टपैलू नायकाने स्वतःच्या कसबीवर अनेक पुरस्कार मिळवले . पण कधी गर्व केला नाही . कार्याची दखल झाल्याने आज चंद्रपूर जिल्ह्याचे लोककलावंत मानधन समितीचे अध्यक्ष आहेत . या माध्यमातून कित्येक कलावंतांना न्याय देत आहेत . न्यायाची चाड ,अन्यायाची चीड असल्याने गरजूंनाच लाभाचा प्रवाह मिळाला आहे . त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या लोककला समितीच्या सदस्यपदाची धुरा यशस्वी पेलत आहेत . सातत्याने प्रसारमाध्यमात झळकणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व , पण अहंपणाचा लवलेश नाही . प्रसिद्धीच्या झोतातही इतकी सौजन्यशीलता बाळगत भेट देऊन आम्हाला उपकृत केले . धन्यता वाटली . या हिऱ्याचा शासनदरबारी उचित गौरव होऊन पुढील पिढीसाठी आदर्श मिळावा ही अभिलाषा बाळगून कृतज्ञ मनाने निरोप घेतला . या भेटीत महाराष्ट्राचा मुकुटमणी जवळून अनुभवता आला .

✒️लक्ष्मण खोब्रागडे(जुनासुर्ला,ता.मूल,जि.चंद्रपूर)मो:-९८३४९०३५५१