पत्रकारांसाठी १ जानेवारी रोजी बारकुल हॉस्पिटल येथे मोफत हृदयरोग तपासणी

34

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

बीड(दि.३१डिसेंबर):-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १जानेवारी रोजी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.अनिल बारकुल सर यांच्या हॉस्पिटल मध्ये पत्रकारांसाठी विनामूल्य हृदयरोग तपासणी आणि बीपी, शुगर तपासणी करण्यात येणार आहे. या आरोग्य सुविधेचा लाभ पत्रकारांनी घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या नेतृत्वाखाली दर्पणदिनाचे औचित्य साधून पत्रकार संघाच्या माध्यमातून यावर्षी आरोग्यावर दर्पण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत हार्ट संदर्भात अनेक समस्या निर्माण होत आहेत. मानसिक दडपण, आर्थिक ताण, अवाजवी काम, अवेळी जेवण, अति जागरण आदी प्रकाराने हार्ट संदर्भातील समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर बीपी आणि शुगर याचे रुग्ण देखील मोठ्या संख्येने वाढत आहेत. या व्याधीने पत्रकारांना भविष्यात ग्रासले जाऊ नये, त्यांना योग्य वेळी, योग्य मार्गदर्शन आणि वेळीच उपचार व्हावेत या उद्देशाने बीड शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिल बारकुल हे स्वतः पत्रकारांसाठी विनामूल्य तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत.

याशिवाय बीपी आणि शुगर देखील विनामूल्य तपासण्यात येणार आहे. सदरील विनामूल्य हार्ट संदर्भातील तपासणी, ईसीजी, बी पी, शुगर विनामूल्य तपासणी फक्त पत्रकारांसाठी असून शनिवार दिनांक १ जानेवारी रोजी सकाळी १०.३०/ ते १२:३० या दरम्यानच सदरील मोफत तपासणी शिबिर पत्रकार संघाच्या पुढाकारातून आयोजित केलेली आहे. वेळेच्या नंतर आलेल्या पत्रकारांना या संधीचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ बीड जिल्ह्यातील पत्रकारांनी 1 जानेवारी रोजी नियमित दिलेल्या वेळेतच घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.

चौकट
सोमवारी मोफत नेत्ररोग तपासणी
स्वर्गीय झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमसेठ खटोड यांच्या पुढाकारातून आनंदऋषीजी नेत्रालय, व्हिजन सेंटर, जालना रोड, बीड. येथे सोमवार दिनांक 3 जानेवारी रोजी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी विनामूल्य नेत्र तपासणी शिबिर पत्रकार संघाच्या पुढाकारातून आयोजित केले आहे. या तपासणीमध्ये जर कोणास चष्मा लागला तर अत्यल्प दरामध्ये त्यांना चष्मा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याच बरोबर जर डोळ्या संदर्भात कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज पडली तर ती देखील अत्यल्प दरामध्ये योग्य त्या ठिकाणी उपचार करून देण्यासाठी पत्रकार संघ पुढाकार घेणार आहे.